Sunday 8 August 2021

हांडे देशमुखांच्या शोधात



मला जसं जसं कळु लागलं तसं तसं माझे आजोबा कै. दादाराव हे मला आमच्या घराण्याविषयी ,घराण्यातील चालीरितींविषयी माहिती देत असायचे. गावातील मंडळी माझ्यासकट आमच्या कुटुंबातील व्यक्तींना 'राजे' या नावाने संबोधत असत.त्यामुळे मला सुरूवातीपासुन या गोष्टीबद्दल कुतुहल आणि  वाटत होता. त्यामुळे या सर्व ऐतिहासिक गोष्टीत मला रुची होती. या गप्पा सुरू झाल्या की आपोआप माझे कान टवकारले जात.
             आमचे आजोबांनी मला सांगितलेल्या गोष्टी,
"शिरुर तालुक्यातील कर्डे हे आमचं मुळगाव. तिथं आज ज्या जागी हायस्कुलची इमारत उभी आहे त्याजागी आमची गढी होती. गढीत मुंजाबा, जेवत्या आणि मारूती अशा देवतांची मंदिरे होती.त्याचबरोबर पाण्यासाठी आड , कैद्यांना डांबुन ठेवण्यासाठी तळघरे देखिल होती. आमचे पणजोबा कै.कोंडीरामराजे यांना विजयादशमीच्या वेळी शमीपुजनाचा मान असायचा.सन १९५२ पर्यंत आमच्या कुटुंबाला पेन्शन मिळत होती.मावळात गेल्यावर पहिल्या पाटाचा मान हांडे देशमुखांना आहे." 
            या सर्व गोष्टी ऐकल्यामुळे माझ्या मनाला सतत उत्सुकता असायची आपण कोण आहोत ? कुठुन आलो? आपल्या पुर्वजांनी नेमकं काय केलं? याचा शोध घेण्यासाठी वृद्ध व अनुभवी व्यक्तींच्या संपर्कात रहायचो.माझ्या वडिलांच्या जन्मापासून आम्ही मौजे आंबळे गावी वास्तव्य करून आहोत. तिथे आमचा ३६० बिघे म्हणजेच २०८ एकर जमीन देशमुख इनाम आहे. त्याला आजही इनाम या नावाने संबोधतात. थोड्या कळत्या वयात आल्यानंतर मी त्याची कागदपत्रे तहसिल कार्यालयातुन मिळवली.पण मला हवी तशी माहिती मिळत न्हवती. त्याच काळात माझ्याकडे 'स्मार्टफोन' आला , एकप्रकारे संपुर्ण जग माझ्या हातात आलं होतं. जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा तेव्हा मी गुगलवर 'हांडे देशमुख' इंग्रजीत कधी  मराठीत शोधत होतो.त्यात मला दोन ठिकाणी संदर्भ मिळाला.त्यातल्या एकात पेशवे दफ्तरातुन माहिती मिळाल्याचा उल्लेख होता. पुन्हा इंटरनेटवर पेशवे दफ्तर शोधलं. तिथं गेल्यानंतर मला जी माहिती त्यातुन मी योग्य रस्त्यावर असल्याचं जाणवलं.हे साल होत २०१६.मी नुकताच १२ वी पास होऊन प्रथम वर्षात गेलो होतो.
माझा आणि मोडी लिपीचा परिचय लहानपणापासूनच होता परंतु आता कागदपत्रांमुळ मोडीची गोडी लागली होती. मी मोबाईल च्या माध्यमातून मोडी शिकलो.आणि त्याच दरम्यान फेसबुकच्या माध्यमातून विविध व्यक्तींशी माझा परिचय झाला. त्यांची मला मोठ्या प्रमाणात मदत झाली. श्री संतराज बापु साठे यांच्यामुळे पारसनीस कृत 'सनदपत्रांतील माहिती' या पुस्तकातील हांडे देशमुख कैफियत वाचणात आली आणि बरेच मार्ग मोकळे झाले. आतापर्यंत मिळालेले धागे दोरे जुळु लागले. मला सर्व हांडे देशमुख भावकी एका छताखाली आणायची होती सर्वांचा एकमेकांशी परिचय करून द्यायचा होता. पण संधी मिळत न्हवती. पण त्यात पुणे येथे शिवजयंती निमित्त भव्य कार्यक्रम होतो आणि तिथं ऐतिहासिक घराण्यांचे रथ समाविष्ट होतात हे कळलं. दुसरीकडे मी फेसबुक वर दिसेल त्या हांडे, देशमुख आणि हांडे देशमुख व्यक्तीला रिक्वेस्ट पाठवत होतो. ते माझ्याशी जोडले जात होते. शिवजयंती ला आपल्या घराण्याचा रथ समाविष्ट करायचा हे मनाशी पक्कं केलं आणि सर्व हांडे देशमुख बांधवांच्या अहोरात्र मेहनतीनं साकार झालं. परंतु मी माझ्या शोधात अजुन होतो काय करू? काय नको करू ? हे प्रश्न मला पडत होते. शेवटी मी पुणे पुरालेखागार येथे अभ्यास करण्याची परवानगी मिळवली.तिथुन अनेक रुमालांमधील कागद हाताळले आणि अजुन हाताळायचे बाकी आहेत. तरी वरील जवळपास ५-६ वर्षाच्या काळात थोडी माहिती माझ्याकडे गोळा झाली आहे ती खालीलप्रमाणे

" जुन्नर तालुक्यातील उंब्रज हे हांडे परिवाराच मुळगाव. तिथला एक पुरूष देवराव हांडे याने तलवारीच्या जोरावर देशमुखी मिळवली व मौजे नळवणे ता.जुन्नर या गावी कोट बांधुन देशमुखी करू लागला.नळवणे येथेच आमचे कुलदैवत श्री मार्तंड यांचे देवालय आहे. या देवराव हांडे देशमुख याने 'पातशहाची पिछाडी मारली व मालकावर वार केला' अशा प्रकारचा उल्लेख वंशावळींमध्ये आहे. देवराव हांडे देशमुख यांच्याबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. इ.स. १६५७ साली औरंगजेबाचा सरदार मुर्शीदकुलीखान याने जाखोजी हरजी हांडे देशमुख यांना जुन्नर सरकारमधील १७ तरफांतील ३५९ गावची देशमुखी दिल्याचा उल्लेख आहे. छत्रपती शाहु महाराज यांच्या काळात देखिल रायाजी हांडे या लढाऊबाण्याच्या व्यक्तीचा उल्लेख आढळतो. सन १८१८ साली हांडे देशमुख घराण्याकडे ५६२ गावची देशमुखी असल्याचे संदर्भ आहेत आणि ती पुणे , नगर व नाशिक जिल्ह्यात आहेत. त्याचबरोबर मौजे उंब्रज ,मौजे पिंपळगाव जोगा व मौजे रिसे येथील पाटिलक्या हांडे घराण्याकडे होत्या. त्याचबरोबर जुन्नर ,करडे व पुणे पुरालेखागार येथुन वंशावळी प्राप्त झाल्या आहेत.त्यानुसार माझ्यापर्यंत २४ पिढ्यांची वंशवेल उपलब्ध झाली आहे. मौजे नळवणे येथे देवराव हांडे देशमुख यांची समाधी आहे.तसेच पारनेर व पळवे येथे देखिल समाध्या आहेत"

ही माहिती टाकण्याचा उद्देश असा की अजुनही माझा शोध संपलेला नाही.मला तुमच्या सर्वांच्या मदतीची व मार्गदर्शनाची  गरज आहे.

तुम्ही ही पोस्ट वाचली असेल तर कृपया शेअर करा!

✍️ हर्षद रमेश हांडे देशमुख 
मो.नं.८२०८५०९१५५

फोटो- १) देवराव हांडे देशमुख समाधी
            २) हांडे देशमुख वंशवेल
            ३) गणपतराव रामचंद्र हांडे देशमुख सरकार जुन्नर

Tuesday 25 May 2021

तुकाराम बापु

आंबळ्याचा ९० वर्षाचा तरूण पैलवान!💪

 

त्याकाळी आंबळे गाव हे असं गाव होतं जिथं एकही व्यक्ती असा न्हवता की ज्यानं अंगाला कधी लंगोट लावला न्हवता ,खायला चटणी भाकरी का असंना पण कुस्ती करणार ते म्हणतात ना डीएनए वगैरै तोच पैलवानकीचा डिएनए आंबळे करांच्या रक्तात  होता.मी मागं सांगितल्याप्रमाणे पैलवानकीची ही गाथा सुरू होते ती थेट ६-७ पिढ्या पुर्वी पासुन म्हणजे कै.भगाजी बेंद्रे यांजपासुन!

 

तर एकदा काय झालं , इंग्रजांचा काळ होता ,असेल १९०० च्या आसपासचा या भगाजी बेंद्रेंना अटक करण्यासाठी घोडनदीवरून पोलीस आले होते. पण अटक कशासाठी करणार होते त्याच कारण मात्र मला माहित नाही.पोलीस आले मग त्यांनी चौकशी केली आणि भगाजींना म्हणाले "चला", भगाजी म्हणाले" थांबा गणसपट्टीवरून हुरडा खाऊन जाऊ" गावात गणेशपट्टी नावाचे शेत आहे.तिथं हुरडा खाल्ला भगाजी बेंद्रे जायला निघाले मात्र पोलीस म्हणाले " बेड्या घालाव्या लागतील" भगाजी म्हणाले"आवं, काय बी उप्योग नाही त्याचा" तरी त्यांनी बेड्या घातल्या आणि भगाजींनी त्या साधा जोर लाऊन कडकड मोडल्या ! एव्हढी ताकद त्यांच्या शरिरात होती .शिरुर तालुक्यात त्यांना तोड नव्हती.

 

आज आपण भगाजींच्या नातवाची गोष्ट सांगणार आहे आज त्यांचा नातु फक्त ९० वर्षांचा आहे. पै.तुकाराम कोंडीबा बेंद्रे हे त्यांच नाव पण सगळे त्यांना तात्या किंवा बापु म्हणतात.कै.पंढरीनाथबुआ,कै.दत्तुभाऊ,कै.आनंदराव अण्णा , कै.बबन नाना आणि तुकाराम बापु हे एका पिढीतील पैलवान .सायकलीवरून आखाडे करणारे ते पण एकाच दिवशी तीन -तीन आखाडं असा त्यांचा शिरस्ता असायचा. असं म्हणतात की तुकाराम बापु जेव्हा दंड मारत तेव्हा त्यांच्या पाठीची दोन हाडं एकमेकांना चिटकायची तेव्हा टॉक टॉक असा आवाज यायचा.खाली तुम्ही फोटोत पाहताय तसा त्यांचा पाठीच्या आणि छातीच्या मधला भाग वरवंट्यासारखा तर छाती पाट्यासारखी मजबुत होती. १९५६ साली सुरत येथे तत्कालीन मुंबई राज्य चॅम्पियन ना त्यांनी पाडलं होतं.किस्से मात्र त्यांच्या आखाड्यातल्या कुस्त्यांचे सांगितले जातात .

 

एकदा न्हावरे येथे आखाडा होता.सांगली जवळच्या विटा वरून 'नामा' नावाचा नामवंत पैलवान त्याच्या पठ्ठ्याला घेऊन आला होता.बराच वेळ त्याला जोड मिळत न्हवती खरं सांगायच तर पैलवान त्याला घाबरत होते.मात्र तुकाराम बापुंनी हिम्मत केली आणि समोरच्या राक्षसासारख्या दिसणाऱ्या पैलवानांना त्यांनी क्षणार्धात दुहेरी पट टाकुन गारद केलं.गावकऱ्यांनी त्यांची मिरवणूक काढली.तेव्हापासुन तुकाराम बापुंना लोक 'दुहेरी पटाचा बादशाह' म्हणु लागले.१९५१ ते १९६० हा बापुंचा ऐन उमेदीचा होता.मात्र आज वयाच्या ९० व्या वर्षी देखिल त्यांचा उत्साह तरुणाला लाजवणारा आहे. आजही तालमीत आल्यानंतर त्यांनी घातलेली पकड सहजासहजी सुटत नाही.पैलवान हा आजिवन पैलवानच असतो हे बाप्पुंनी दाखवून दिलंय.

एखाद्याच्या घरात चार पिढ्या पैलवानकी चालली की कायम टिकते आज त्यांच्या घरातील लागोपाठ पाचवी पिढी तालमीत घाम गाळताना दिसत आहे. हे बापुंच्या कष्टाचे फळ आहे असं म्हणावं लागेल.आंबळे गावच्या पैलवानांची कहाणी म्हणजे आंबळे गावची वैभवगाथा आहे.

 

क्रमशः

 

✍ सोनबाराजे तथा हर्षद रमेश हांडे देशमुख.

#क्षत्रियबाणा

 

कै.पंढरीनाथ बुआ यांची कहाणी:

 

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2646807772235014&id=100007174505257

 

#पैलवानांच_आंबळे

#तुकारामबापु

भिमाजी शिंदे

#आणि_तीने_त्याला_मिठीच_मारली..... 
 
हे शिर्षक वाचुन तुम्ही जरा गडबडला असाल नाहीतर मनात आलं असंल की दादारावचा नातु बावचाळला काय ? पण तसं काही नाही हा प्रोपगंडाही नाही आणि मी पुर्ण शुद्धीत आहे .आश्चर्य वाटेल पण ही गोष्ट देखिल एका पैलवानाची आहे. हो !पैलवानाचीच तुम्ही बरोबर वाचलय. 
 
इंग्रजांचा काळ होता. साधारण १९२०-३० च्या काळात या पैलवानाचा सुवर्ण काळ होता.तस या पैलवानाच कुटुंब गुलबर्गा जिल्ह्यातील शाबाजवाडीच.पण पोटापाण्यासाठी आंबळ्यात आले आणि इथंच स्थायिक झाले.वडार समाजातील कुटुंब होतं.दगडी फोडली तरच भाकर तुकडा मिळत होता.अशा परिस्थितीत देखिल त्या कुटुंबानी  आपल्या पोराला पैलवान करायचं ठरवलं 
 
आणि केलं सुद्धा आणि असं केलं की ज्याचं नाव ते थोडक्यात बाहुबली! पण देह उगं बारका साधा ५ फुट पण नसंल. काळं कुट्ट शरीर पण ताकद हे अफाट आणि गोटीगत शरीर हे दगडावानी .असं म्हणतात की बेंबीत तेल सोडलं तरी वाटीभर तेल बसायचं आणि वडाऱ्याच काम करायला लागला की हत्ती एव्हढाले दगड एकटा फोडायचा‌.हातावरल पोट अन् निऱ्ह दुधाचा खुराक तरी एव्हढी प्रगती की जुन्नर खेड पासुन ते थेट कडा आष्टी पर्यंत नाव झालेल. अजुनही म्हणतात की असा पहिलवान होणे नाही 
 
एव्हढी त्यांनी जबर पगडा बसवला होता 
 
त्यात त्यांची एक कुस्ती फार गाजली ती देखील इंग्रजांच्या काळातील.त्यावेळी इंग्रज अधिकाऱ्यांचा भारतीय जनतेवर बऱ्यापैकी वचक होता.गांधीजींचे विचार तळागाळात पोचले न्हवते त्यामुळे रयत इंग्रजांना घाबरून असतं त्यामुळे तसा तो बर्यापैकी शांततेचा काळ होता. सासवड या ठिकाणी आखाडा भरला होता.आणि त्या काळात स्पर्धा कमी असल्यामुळे आखाड्यांना मान होता.त्याच आखाड्यात एक पंजाबी पैलवान आला होता त्याला जोड सापडणं कठीण होत 
 
पण या पैलवानाला जोड दिली ते आंबळ्याच्या वडार समाजातील या ठेंगण्या पोरान.लोकांना कुस्तीचा निकाल स्पष्ट दिसत होता तो पंजाबी सहज कुस्ती मारणार हे स्पष्ट होत. पण आंबळ्याचा हा गडी मात्र अंगावर वाघाचे पट्टे काढुन हे आख्ख्या आखाड्यात कोलांट्या मारीत होता.आखाडा पहायला अफाट गर्दी झाली होती कारण तो आखाडा पहायला इंग्रजांची कुठलीतरी बाई आली होती. तीला मेमसायेब का काहीतरी म्हणत असत कारण तसा तीचा दर्जा वरच्या स्तराचा होता.आजही आखाड्यात सहसा महिला येत नाहीत तर त्या काळातल्या लोकांना तोंडांत बोट घालण्याजोगी गोष्ट होती. 
 
कुस्ती सुरू झाली, मात्र सुरूवातीला एकतर्फी वाटणरी ती कुस्ती क्षणार्धात बदलली आणि एका मराठी मुलखातल्या एका ठेंगण्या पोरान त्या बलदंड पंजाब्याचा कोल्या केला होता सारा आखाडा स्तब्ध होता कारण तो पंजाबी पैलवान मातीवर आदळल्यावर माती फाकली होती आणि यावर कळस म्हणुन की काय ती लुसलुशीत देहाच्या आणि गोऱ्यापान बाईन त्या मराठमोळ्या पोराला आपल्या मिठीत घेतलं होतं .सगळीकड आरोळ्या उठत होत्या त्या मेमसायेबीनीण त्यांना त्या काळात १६ रू.बक्षिस दिलं आणि मिरवणूक काढली. 
 
पण अरे हो या सगळ्या नादात त्याच नाव सांगायचं राहिलं त्याच नाव भिमाजी शिंदे सगळे त्यांना भिमशा वडारी म्हणतात.पुढे अनेक वर्ष त्यांनी लाल मातीची सेवा केली.अनेकांना पैलवान केलं. अखेरच्या काळात बैलानं त्यांची मांडी फाडली होती तरी त्यांनी ते सहज पचवल कदाचित ते बैलाला देखिल म्हणाले असतील , 
 
'थांब तुझा कोल्याच करतो!' 
 
✍सोनबाराजे तथा हर्षद रमेश हांडे देशमुख 
#क्षत्रियबाणा  
मार्गदर्शन:- दत्तात्रेय मुरलीधर बेंद्रे 
#पैलवानांच_आंबळे

शिवाजी पवार (गोपाळ)

#खालील_चित्रात_दिसणारी_गदा_साधीसुधी_नाही

गदा म्हंल की आपल्यासमोर येतो तो राभभक्त हनुमान आणि महाबली भीम अर्थात गदा म्हणजे ताकदीचं चिन्ह.कुस्ती क्षेत्रात गदेला फार महत्व आहे.आज वेगवेगळ्या स्पर्धांमधल्या गदा फार मानाच्या समजल्या जातात.
खालील फोटोत दिसणारी गदा देखिल अशीच मानाची गदा आहे.पुर्वी आंबेगाव तालुक्यातील अवसरी या गावात आखाड्यात ही गदा बक्षीस म्हणुन ठेवली जात होती.पण तीला जिंकणं फार अवघड होत कारण तीला जिंकण्यासाठी अट फार अवघड होती.ती अशी की जो पहिलवान सलग तीन वर्ष निकाली कुस्ती करील तो ती गदा जिंकणार होता.परंतु गेली ५० वर्ष ती गदा अजिंक्य होती.

एक दिवस असा आला की सलग दोन वर्ष एक पैलवान निकाली कुस्ती केली होती तोच गदा नेणार अशी चर्चा होती.पण त्याच वर्षी आंबळ्याच्या पैलवानांचा चमु अवसरीत आला होता आणि आंबळेकरांना अशीच संधी हवी होती.आतापर्यंत आंबळ्यात कुणी गदा आणली न्हवती कारण दुष्काळी परिस्थिती होती लोकांना आणि पैलवानांना सुद्धा मानपानापेक्षा पोटापाण्याचा प्रश्न महत्वाचा होता.पण यंदा गदा जिंकण्यासाठी सुवर्ण संधी चालून आली होती.

आंबळे करांनी शिवाजी पवार नावाच्या पैलवानाला उतरवण्याचा निर्णय घेतला आणि गेली दोन वर्षे सलग जिंकणाऱ्या पैलवानाला चितपट केलं.दुसऱ्या वर्षी परत आखाडा भरला पुन्हा एकदा शिवाजी पवारांनी कुस्ती निकाली केली.आता गावकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या मात्र शिवाजी पवारांची आर्थिक परिस्थिती ढासळली होती त्यात लग्न झालं होत म्हणुन उदरनिर्वाहासाठी गाव सोडलं होत पण त्यांचे बंधु संभाजी पवार यांनी प्रयत्न करून परत गावात आणलं ,शेवटचे दोन महिने राहिले असताना परत तयारी केली आणि सलग तिसऱ्या वर्षी कुस्ती निकाली केली.५० वर्षांचा इतिहास बदलला ,शिवाजी पवार इतिहासकर्ते झाले आणि त्यांनी आंबळे गावासाठी पहिली गदा आणली.आणि त्यांनी ती स्वत: साठी न ठेवता श्री नाथसाहेब चरणी अर्पण केली कारण त्यांनी देवाला सांगितलं होत की जर मी गदा जिंकली तर तुझ्या चरणी अर्पण करील.दरवर्षी जेव्हा छबिना निघायचा त्यावेळेस श्री नाथसाहेबांबरोबरच या गदेची देखिल ग्रामप्रदक्षिणा होत असे.
✍️सोनबाराजे तथा हर्षद रमेश हांडे देशमुख.

 
#पैलवानांच_आंबळे

दिनकरराव संकपाळ

#शिक्षकांच्या_गावचा_शिल्पकार

मी ज्या शाळेत शिकलो त्या आमच्या गावातील प्राथमिक  शाळेची इमारत एकाच रेषेत सलग ७ वर्गखोल्या असणारी होती आणि बरोबर मध्ये मुख्याध्यापक कार्यालय होतं आणि त्याला पुर्व पश्चिम अशा दोन्ही बाजुला दारं होती.आणि त्यातल्या पुर्वेकडच्या दरवाजावर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा फोटो लावलेला होता आणि त्याखाली लिहिलेलं होतं श्री.दिनकर ज्योतिबा संकपाळ (माजी मुख्याध्यापक) यांजकडुन.
आता तिथं त्या जागेवर ते कार्यालय राहिलं नाही कारण ती इमारत कधी ना कधी पडणार होती  मात्र त्या फोटोत असणाऱ्या आणि फोटो लावणाऱ्या दोन्ही व्यक्तींच कार्य हे अमुर्त स्वरूपातलं आहे त्यातल्याच दिनकर गुर्जी अर्थात दिना मास्तर यांच्या कार्याचा घेतलेला संक्षिप्त परिचय.सर्वत्र दुष्काळी आणि मागास समजल्या जाणाऱ्या शिरुर तालुक्यातील आंबळे या गावात एका शेतकरी कुटुंबात दिनकर गुरूजींचा जन्म झाला. उत्तम शेती मध्यम धंदा आणि कनिष्ठ नोकरी असा एक समज जनसामान्यात रूजला होता.अशा परिस्थितीत देखिल या आंबळे गावात एक 'जिजाऊ' होती आणि योगायोग म्हणजे खरोखरच त्या मातेच नाव जिजाबाईच होत.शिकुन काय मास्तरकी करायची का ?असा हीन सवाल त्यावेळी विचारला जात असत. अशा वेळी देखिल आपल्या मुलाला शिकवण्याचा विडा त्यावेळी मातोश्रींनी उचलला आणि खरा करून दाखवला.आणि त्यावेळेस काही ४-५ बहुजन मंडळी  संपुर्ण शिरुर तालुक्यातुन शिकली त्यातले एक म्हणजे दिनामास्तर.त्यांच वर्णन करायच म्हणजे फाटकं पण स्वच्छ धोतर ,काखेत  पटका आणि पायी प्रवास तो ही इतका की आंबळे ते तळेगाव रोज ३० किमी ही त्यांची ओळख.सुरूवातीला पाटस मग शिरुरचं पंजाब समजलं जाणाऱ्या मांडवगणमध्ये आणि नंतर संपुर्ण आयुष्य कर्मभुमी आणि स्वभुमी असणाऱ्या आंबळे या गावात.पण आंबळ्यात जिल्हा लोकल बोर्डाची शाळेसाठी स्वतंत्र इमारत न्हवती कुठं धर्मशाळा, मुरली पाटलाचा वाडा ,चावडी मारुती मंदीर इ. ठिकाणी वर्ग भरत असे.मात्र विद्यार्थ्यांची उपस्थिती नगण्य होती कारण शेतीच्या कामांना प्रथम प्राधान्य असायचं.परंतु दिनामास्तर इराद्याचे पक्के होते त्यांनी विद्यार्थी संख्या वाढवण्याच्या हेतुने नाना तऱ्हेचे प्रयत्न केले. अगदी पोऱ्ह गुराकडं तर दिनामास्तर गुरांकडं! विद्यार्थ्यांची जित्राबं स्वतः वळली आणि आणि पोरांना शाळेत पाठवलं तर कधी पोरांना उचलून शाळेत आणत मग पोरांनी नाकानं सदरा भरवला तरी बेहत्तर .मग त्यांना शाळेत बसवण्यासाठी कुठं खडीसाखर ,फुटाणं आणि रेवड्या यांच आमिष दाखवणं इ.गोष्टी चालायच्या.अस करून करून सुरवातीला त्यांनी ६ शिक्षक घडवले आणि नंतर सर्व एकुण मिळुन तब्बल ८०!८० पोरांना त्यांनी त्यावेळच्या भाषेत मास्तर केलं.आंबळं मास्तरांच गाव म्हणुन प्रसिद्ध झालं. पोरांचा घरी अभ्यास होत नसे म्हणुन रात्रशाळा सुरू केली . आंबळं खरं तर पैलवानांच गाव होतं पण दिनामास्तरांनी गावाला मनगटाबरोबर लेखनीची ताकद दाखवुन दिली.आंबळ्यात अगदी आमदार पोपटराव कोकरे ,आंदु महाराज आणि विठ्ठलभाऊ जगदाळे यांनी शिक्षण घेतलं.त्यावेळेस इतरत्र कुठंही आसपास शाळा न्हवती.नंतर त्यांना जिल्हा लोकल बोर्डाने attendance ऑफिसर नेमल पण त्यांचा मुळ पिंड शिक्षकाचा होता आणि पुन्हा तळेगावला शिक्षक म्हणुन नियुक्त झाले.शिक्षक असताना स्वत: शाळा झाडुन घेत असत .त्यांना शिक्षणाचा खरा अर्थ समजला होता आणि शिक्षण क्षेत्रात काम करताना निरपेक्ष पद्धतीने काम करत होते, आंबळे गावात हायस्कुल व्हावं म्हणुन स्वतःची २४ एकर जमीन शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाला द्यायला तयार झाले होते , अगदी विद्याधाम प्रशालेच्या बांधकामावेळी सुद्धा दगडी वाहुन नेण्यात सिंहाचा वाटा दिनामास्तरांचा होता.मी वर उल्लेख केलेल्या शाळेचं बांधकाम त्यांनी १९४८ साली दत्तोबा पाटील निंबाळकर यांच्या मदतीन पुर्ण केल.त्यांच्या कार्याच वर्णन करत असतना माझे शब्द तोकडे पडतायेत कारण त्यांच कार्य इतकं मोठं आहे की ते शब्दात व्यक्त करू शकत नाही मात्र या माध्यमातुन त्यांच्या कार्याची उजळणी करु शकतो. 

दिनामास्तर निवत्त झाल्यानंतर आंबळे गावचे १० वर्षे बिनविरोध सरपंच होते आणि जिल्हा परिषदेची निवडणुक देखिल त्यांनी लढवली होती मात्र शिक्षकांच्या गावचा शिल्पकार याखेरीज दुसरं वर्णन त्यांच होऊ शकणार नाही.

✍️ सोनबाराजे तथा हर्षद रमेश हांडे देशमुख.

टीप: ग.ह.पाटील नामक व्यक्तीने देखिल त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन तो एका शैक्षणिक अंकात प्रसिद्ध देखिल केला आहे मात्र तुर्तास तरी तो माझ्या वाचनात नाही.

बाबुराव जी पाचर्णे वाढदिवस

#HAPPY_BIRTHDAY_SAHEB
आपल्या सर्वांना माहित आहे की यशस्वी व्हायचं असेल तर एक गोष्ट फार महत्त्वाची आहे ती म्हणजे सातत्य! मी जेव्हा शिरुर विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तेव्हा त्या सगळ्यात एका व्यक्तीनं आपला वेगळा उमटवल्याच मी पाहिलं ती व्यक्ती म्हणजे आदरणीय लोकनेते बाबुरावजी पाचर्णे.

 सन१९५२ पासुन सन २०१९ पर्यंत एकच उमेदवार असा आहे की ज्याने आतापर्यंत विधानसभेच्या ६ निवडणुका लढवल्यात आणि त्यात विजयी किंवा दुसऱ्या क्रमांकावरील सर्वाधिक मते मिळवणारा उमेदवार ठरलेत.खरतर माझ्या सारख्या आज विशीत असणाऱ्या तरुणांचा जेव्हा जन्म झाला त्याआधी २० वर्ष पाचर्णे साहेबांनी आपला राजकीय प्रवास सुरू केला होता. त्यांचा प्रवास सुरू झाला तो तर्डोबाचीवाडी या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबातुन ! त्यामुळे गरिबी अगदी जवळुन पाहिली.मित्रांबरोबर सायकलवर बसुन शाळेत गेले , दुनियादारी पाहिली.

माझ्या माहितीप्रमाणे ते सरपंच झाले, मार्केट कमिटीचे चेअरमन झाले पण त्यांचं खरं लक्ष्य होतं ते म्हणजे विधानसभा.१९९५ साली अपक्ष उभे राहिले अगदी हातावर मोजण्या इतक्या मतांवरुन पराभव स्विकारावा लागला.टरत १९९७ साली जिल्हा परिषद सदस्य झाले.१९९९ साली पुन्हा विधानसभेला पराभव झाला.पण ते म्हणतात ना "सक्सेस मतलब क्या? Failure के बाद का नया चॅप्टर " असं म्हणण्याची वेळ आली म्हणजे सन २००४ साल उजाडलं . 

१९८० साली पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बाबुराव दौंडकर यांनी लावलेल भाजपाचे  रोपटं कै.संभाजी अण्णा भुजबळांनी मोठं केलं होतं , पाचर्णे साहेबांनी तालुक्यातील जनतेचा भाजप विषयीचं प्रेम ओळखलं आणि त्याच वेळी कै.गोपीनाथराव मुंडे यांच्याशी संपर्क आला आणि २००४ साली पाचर्णे साहेब आमदार झाले. बाबुराव दौंडकर यांनी सुरू केलेंल वर्तुळ हे बाबुराव पाचर्णे यांनी पुर्ण केलं होतं.
या सगळ्यात मला एका गोष्टीचं फार कुतूहल वाटतं शिरुर तालुक्यात असं एक गाव नाही जिथं पाचर्णे साहेबांचा मित्र नाही, हीच गोष्ट त्यांना लोकनेता करते.

राजकीय नेतृत्व म्हणलं की विरोध हा आलाच पण साहेबांचा कुणीही व्यक्तिगत विरोधक नाही ही त्यांची जमेची बाजु आहे.

आज साहेबांचा वाढदिवस आहे साहेबांबद्दल लिहू तेव्हढ कमी आहे तरी माझ्या तर्फे
शिरूर तालुक्याच्या लोकनेत्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

©✍ हर्षद रमेश देशमुख
मु.पो.आंबळे ता.शिरुर जि.पुणे.

उमेश रणदिवे

#शाळेतल्या_पुस्तकात_उद्या_या_माणसाचा_धडा_येईल!

लोकं या व्यक्तीला येडा म्हणतात ,कुणी म्हणतय याच्या डोक्यात फरक झालाय म्हणुन मी याची चौकशी केली तर खरंच हा येडा निघाला पण आपल्या ध्येयाबद्दल ! शहाणी लोकं याला रांगडा मर्द म्हणतात .खाली लिहिल्याप्रमाणे याची कहाणी.

पै.उमेश रमेश रणदिवे हे या रांगड्या मर्दाच नाव! रांजणगाव सांडस यांच गाव! घरी बागायती शेती,गड्याचा लहानपणापासून पैलवानी पिंड!स्वभावानं अत्यंत भोळा ,अगदी श्रीसांबसदाशिव. गावातच जेमतेम  शिकला आणि नंतर तालमीत गेला. घरी बागायत असल्यामुळे आपणच पिकवायच आणि आपणच खायचं अस समाधानी जीवन त्यामुळे बाहेर नोकरी करायची गरज भासली नाही.
हळुहळु भिवरेच्या तीरावर फिल्टर पाण्याच प्रस्थ वाढलं , फुकट मिळणाऱ्या पाण्याला मोल द्यावा लागलं.तव्हा याच्या डोक्यात टुप पेटली , यानं विचार केला आज पाणी विकत घ्यावा लागतय उद्या आॅक्सिजन विकत घ्यावं लागंल. या विचाराने त्याला ४ रात्री झोप आली नाही.यानं झाडं लावायचं ठरवलं पण याचा प्रवास सोपा न्हवता ,याला लोकांनी येडं ठरवलं कुणी वाया गेलेलं म्हणलं पण हा गडी मागं हटला नाही आपलं काम करत राहीला. सगळ्या अडथळ्यांवर कळस म्हणजे याला मारहाण करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला तरी हा आपलं काम करतच राहिला.तुम्हाला विश्र्वास बसंल की नाही माहित नाही पण याने एक-दोन नाहीतर  गावभर लावलेली तब्बल १०,००० झाडं वाढवून दाखवली आहेत याशिवाय ५० एकरात रानभाज्यांसमवेत जंगल उभारण्याचा प्रयत्न केलाय.नुसती झाडं लाऊन तो थांबला नाही गावात फिरती लायब्ररी सुरू केलीय, उन्हाळ्यात पाणपोई चालवतो याच्या वरची पायरी की गेले १२० आठवडे हा गावात स्वच्छता अभियान चालवतो आणि सायकलिंग करून विविध गावांत जाऊन व्यायामाच महत्त्व पटवून देतो.या सगळ्या कामांत त्याच्या पत्नीची त्याला विशेष साथ आहे हे महत्त्वाचं.

उद्या या माणसामुळं संतराज महाराजांच रांजणगाव या नावलौकिकाबरोबरच उमेश रणदिवे यांचं रांजणगाव असा गवागवा होणार आहे .आज जी लोकं ठेवतात त्यांचं या जगात काहीच राहणार नाही मात्र पै.उमेश रणदिवे अमर होणार आहे.वेडी माणसंच इतिहास घडवतात असा इतिहास आहे.असा हा येडा माणुस भविष्यात आपल्या शाळेतल्या पुस्तकात धड्याच्या रुपात भेटला तर नवल वाटून घेऊ नका! कारण या माणसाचा नादचं खुळा आहे

#वृक्षपुरूष 
✍️सोनबाराजे तथा हर्षद रमेश हांडे देशमुख 

उमेश रणदिवे --- 93593 67215

हांडे देशमुखांच्या शोधात

मला जसं जसं कळु लागलं तसं तसं माझे आजोबा कै. दादाराव हे मला आमच्या घराण्याविषयी ,घराण्यातील चालीरितींविषयी माहिती देत असायचे. गावातील मंडळी ...