.आमचा शिरूर तालुका पूर्वेकडे घोड कुकडी तर पश्चिमेकडे भीमा नदी या दोन नद्यांमधला प्रदेश.आज हा भाग पंचतारांकित रांजणगाव एमआयडीसी क्षेत्र तसेच चासकमान डावा कालवा तसेच डिंभा कालव्यामुळे संपन्न झालेला आपल्याला पाहायला मिळतो.प्रत्येक मनुष्य दोन वेळेस सोन्याचा घास खाऊ शकतो एव्हढी आर्थिक सुबत्ता प्रत्येकाकडे आहे.या भागाचा इतिहास समजावा म्हणून आजचा लेख लिहिण्याचा माझा बालिश उपद्व्याप आहे.
शिरूर तालुक्याला इतिहास नेऊन सोडतो आपल्याला थेट ताम्रपाषणयुगीन कालखंडात.घोडगंगेच्या तीरावर असलेले 'मौजे इनामगाव' हे शेतकऱ्यांच्या आद्य वसाहती पैकी एक.या गावाने ताम्र पाषाण युगातील इतिहास संशोधनाला वेगळं वळण दिलं. एक दीड वर्षापूर्वी मौजे तळेगाव ढमढेरे येथील एका वाड्यात १३व्या शतकातील शिलालेख सापडला त्यातून हा भाग त्या काळात पारनेर च्या अख्यात्यारित येत असल्याचे समजले.त्याच दरम्यान यादव काळात पश्चिम पट्ट्यातील मौजे केंदुर या गावी कान्होराज महाराज पाठक हे संत होऊन गेले.नंतरचा जवळपास ३ शतकांचा इतिहास मला तरी ज्ञात नाही. नंतर येतो मग निजामशाहीचा कालखंड.याच कालखंडात या भागाला विशेष स्थान प्राप्त झाल्याचे दिसून येते. निजामशाहीच्या काळात ५ पिरांची स्थापना झाली. ते पिरसाहब करडे, निर्वी ,न्हावरे ,दहिवडी , पारोडी, उरळगाव या गावांमध्ये आहेत. आपल्या भौगोलिक स्थानामुळे करडे आणि पाबळ या गावांना परगण्याची अथवा तर्फेची गावे होण्याचा मान मिळाला.या सततच्या राजकीय स्थितंतराच्या काळात या भागाला हाल सोसत असताना आपली धार्मिक ओळख विसरावी लागली अनेक मंदिर याच काळात नामशेष झाली.नंतर हा भाग फर्जंद शहाजीराजे भोसले सरलष्कर यांच्या जहागिरीचा भाग होता.त्याचवेळी या भागाला राजकीय वजन प्राप्त होण्यास सुरुवात झाली.मात्र शककर्ते राजा शिवछत्रपती यांचा कैलासवास होईपर्यंत या भागाचा राजकीय उल्लेख फारसा आढळत नाही पण मराठेशाहीच्य. इतिहासातील सोनेरी पान असलेल्या सरदार ढमढेरे घराण्यातील बाबाजी ढमढेरे हे राजा शिवछत्रपती यांचे अंग रक्षण करत होते.प्रतापगड मोहीम राबवली जात होती त्यावेळी कान्होजी जेधे यांच्या कुटुंबाची जबाबदारी याच तळेगाव ढमढेरे च्या ढमढेरे कुटुंबावर होती.संत तकोबारायांच्या समकालीन संतोबा पवार नावाचे क्षत्रिय परमार कुळातील एक संत या नागरगावात जन्मले त्यांनी मुळा-मुठा-भीमा संगमावर त्यांची समाधी आहे.'पवारांचे वंशी उजळला दीप ।नरदेहा येऊनी सार्थक केले।।' अशा प्रकारे तुकाराम महाराज याांचे पुुत्र नारायण बुआ देहुकर यांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे. पुढे छ्त्रपती संभाजी महाराजांच्या कालखंडात इ. स.१८४-८५ च्या दरम्यान मराठा सैन्याने या भागातील मुघल सैन्यावर हल्ला करून त्यांची पळता भुई थोडी केली होती.या दरम्यान अनेकदा समोरासमोर येऊन लढाई झाल्याचे उल्लेख आपल्याला पाहायला मिळतात. छत्रपती संभाजी महाराज यांना कैद केल्यानंतर पेडगावतील बहादूरगड पासून ते तुळापूर पर्यंतचे हाल आणि औरंगजेबाचे क्रौर्य याच मातीने पाहिले आणि ते पचवले. स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींना अग्निसंस्कार देखील याच मातीत मिळालेहे या भूमीच दुर्भाग्य !नंतरच्या काळातला इतिहास आपल्याला स्पष्ट पणे वाचायला मिळतो तो केवळ त्या घटनेच्या मागोव्यामूळे कारण दस्तुरखुद्द आलमगीर औरंगजेब या भागात वस्ती करत होता. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तो तांदळी - इनामगाव - शिरसगाव - निर्वी - न्हावरा- उराळगाव- दहिवडी या मार्गे दोनदा मार्गस्थ झाला. याच काळात करडे परगण्यातील मौजे शिरूर या गावात संत निळोबा राय होऊन गेले.पण हा भाग अजूनही स्वराज्यात न्हवता शंभूपुत्र शाहू महाराजांच्या काळात हा भाग मराठेशाहीत आला. बाळाजी विश्वनाथ पेशवे यांना हा भाग जहागीर म्हणून देण्यात आला होता. पेशव्यांनी आपले बस्तान पुण्याला मांडल्यानंतर या भागावर पेशव्यांचे लक्ष अधिक झाले हा भाग पेशव्यांच्या अगदी जिव्हाळ्याचा होता.या प्रदेशाचा न्याय , महसूल देवस्थान आदी कामे करण्यात पेशव्यांना हुरूप येई. मराठा सैन्यात लष्कर भरती देखील याच भागातून होई.
त्याच फळ म्हणून या भागातील अनेक अस्सल क्षत्रिय घराण्याच्या तलवारी अधिक तळपू लागल्या.त्यात तळेगाव च्या ढमढेरे घराण्याचं नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल बाबाजी ढमढेरे पासून जयसिंगराव ढमढेरे पर्यंत असंख्य वीर या ढमढेरे घराण्याने मराठी दौलतीला दिले. साताऱ्यातील अपशींगे मिलिटरी या गावातून जसा सैनिक जन्माला येतो तसा तळेगावात एकेकाळी वीर जन्माला येत होते.त्यापैकी नारायणराव ढमढेरे या सरदारांनी अनेक गावचे मोकासे मिळवले. मुखईच्या बाळोजी पलांडे इनामदार यांनी लाल किल्ल्याची किल्लेदारी केली.त्यांच्या मुखई या गावी त्यांना शाहू महाराजांनी इनाम दिलेला आहे. रांजणगाव चे संताजी रणदिवे पाटील हे पानिपतच्या तिसऱ्या युध्दात भाऊसाहेबांच्या सैन्यात होते.त्याचबरोबर आलेगावचे वाघचौरे, न्हावऱ्याचे निंबाळकर, निर्विचे सोनवणे ,मांडवगणचे फराटे , वडगावचे शेलार , शिरसगाव चे कदम , पिंपळयाचे धुमाळ यांनी देखील आपल्या तलवारीची धार दुष्मनाना दाखवली होती.त्यात मलठणच्या पवारांनी विशेष पराक्रम करून मध्यप्रदेशात आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं.इनामगाव येथील मालजी माचाले यांना देखील मोकासा होता. पेशवाईच्या काळात अनेक मंदिरांचा जिर्णोद्धार झाला त्यात शिरूरचे रामलिंग, न्हावरा येतील मल्लिकार्जुन , कारेगवचा कारेश्र्वर यांचा समावेश होतो. थोरल्या बाजीराव पेशव्यांनी केन्दुर व पाबाळ ही दोन गाव मस्तानीला जहागीर म्हणून दिली होती.त्याच पाबळला मस्तानीची समाधी आहे.मौजे आलेगाव पागा हे पेशव्यांच्या गृहकलहाचे साक्षी आहे. रांजणगाव गणपती येथील महागणपतीच्या मंदिराचा जिर्णोद्धार देखील पेशव्यांनीच केला.मराठेशाहीच्या अस्ताला कारणीभूत ठरलेली भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक लढाईला देखील हीच भूमी साक्ष आहे.
इंग्रज काळात रघुजी भांगरे या कोळी युवकाने घोडनदी गावात इंग्रज अधिकाऱ्याच्या खून केला. सावकारकीला कंटाळून पेटून उठेलेल्या शेतकऱ्यांनी इ. स.१८७५ साली जगाला दखल घ्यायला लावणारे दख्खनचे दंगे याच शिरूर तालुक्यातील करडे गावात सुरू झाले त्याच लोण संपूर्ण दक्खन प्रांतात पसरलं.
लोककला विश्वात सुद्धा विठाबाई नारायणगावकर, जगताप पाटील पिंपळे कर यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे.अशा प्रकारचं आमच्या तालुक्याच्या पूर्वजांचा पराक्रम आणि कर्तृत्व आहे ते अबाधित राखण्याची जबाबदारी आमच्या तालुक्यातील तरुणांवर आहे.
धन्यवाद🙏
©सोनबाराजे तथा हर्षद रमेश हांडे देशमुख
टीप :- यामध्ये काही चुका अथवा दुरुस्ती असल्यास अवश्य कळवा.