Wednesday, 18 March 2020

समतेचा पुरस्कर्ता वारकरी संप्रदाय

भारतीय राज्यघटनेच्या पंधराव्या कलमानुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला केवळ धर्म , वंश,जात ,लिंग किंवा जन्म ठिकाण या कारणांमुळे राज्य कोणत्याही नागरिकाविरुद्धा भेदभाव करणार नाही अशी तरतूद करण्यात आली नि भारताला सामाजिक समतेची कायदेशीर देणगी मिळाली.परंतु सामाजिक समतेची खरी सुरुवात वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून झाल्याचं आपल्या सर्वांना पाहायला मिळतं.शिंपी समाजात जन्म घेतलेले संत नामदेव महाराज यांना अभंगाचे प्रणेते मानलं जातं .समाजातील जातिव्यवस्थे मुळे निर्माण झालेली माणसांमधील दरी त्यांनी ओळखली होती.त्यांना स्वतः याचा फटका बसलेला असणार त्यामुळं संत नामदेव महाराज म्हणतात;

कुत्थळ जागी उगवली तुळशी ।अपवित्र तयेशी म्हणू नये ।
नामा म्हणे आता जातीचा मी शिंपी ।उपमा जातीची देऊ नये।।

संत नामदेव महाराजांनी भारतभ्रमण करून भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन भागवत धर्माचा प्रसार केला तो थेट पंजाब पर्यंत. पंजाब मधील घुमान येथे त्यांचे मंदिर आहे .त्याची कवणे शीख धर्मग्रंथ असलेल्या गुरूग्रंथसहेब यात देखील आहेत. त्याच काळात अत्यंत हीन समजल्या जाणाऱ्या महार समाजात सुद्धा वारकरी संप्रदायातील संत निर्माण झाले त्यात संत चोखा मेळा अग्रगण्य. ते निरक्षर असल्या कारणाने त्यांचे अभंग अनंतभट या व्यक्तीने लिहिले.समाजातील आपल्या स्थानाला उद्देशून संत चोखामेळा म्हणतात ;

ऊस डोंगा परि रस नव्हे डोंगा। नदी ढोंगी परि जळ नव्हे डोंगे ।
चोखा डोंगा परि भाव न्हवे डोंगा ।काय भुललासि वरलिया रंगा।।

 या सर्व उहापोहात त्यांच्या पत्नीने देखील अभंगरचना केली. संत नामदेव आणि संत चोखामेळा हे दोन्ही खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीत जन्माला येऊन सुद्धा वारकरी संप्रदायाच्या आणि त्यांच्या अभंग रचनेच्या माध्यमातून त्यांना वेगळ्या उंचीवर नेलं.पंढरपूरला भगवान पांडुरंग परमात्म्याचे दर्शन घेण्याअगोदर या दोन्ही संतांचं दर्शन घ्याव लागत यातून आपल्याला वारकरी संप्रदायाची समता लक्षात येते.
वारकरी संप्रदायाचे शिरोमणी आणि अवघ्या मानव जातीचे 'माऊली' कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानदेव महाराज देखील सांगतात 

"जे जे भेटे भूत । ते ते मानिजे भगवंत।"

एव्हढेच नाही तर १६ व्या शतकात होऊन गेलेले संत शेख महम्मद हे मुस्लिम समाजातील संत देखील वारकरी संप्रदायाने स्विकारून आपली सहिष्णुता दाखवली.

संत तुकाराम महाराज म्हणतात " कोणा ही जीवाचा न घडो मत्सर ।वर्म सर्वेश्वर पुजनाचे।।
शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील वारकरी संप्रदायाच्या याच समतेच्या वृत्तीचे अनुकरण करत " अठरा वर्ण ,चाऱ्ही जाती यांस आपआपले धर्मा प्रमाणे चालवून त्यांचा संघह करून ठेवावे" असा मनसुबा केला आणि तो तडीस नेला. सतराव्या शतकात अवघ्या अठरा अलुतेदार, बारा बलुतेदार समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली एकत्र करणारा जरीपटका या मराठी मुलखात प्रथम कुणी रोवला असेल तर तो वारकरी संप्रदायाने. 

दरवर्षी तुकाराम बीजेच्या वेळी काही पुरोगामी म्हणवणाऱ्या लोकांकडून ब्राह्मण समाजाला कलंकित करण्यासाठी वावड्या उठवल्या जातात परंतु संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनानंर तुकाराम महाराजांचा धावा करणारे हे संत निळोबा राय हे ब्राम्हण जातीत जन्म घेणारे होते हे विसरता कामा नये.
अशा प्रकारे ब्राम्हणापासून मुसलमानांपर्यंत सर्वसमावेशक असलेला वारकरी संप्रदाय आपल्याला सर्वप्रथम सामाजिक समतेचा पुरस्कर्ता वाटतो. भगव्या पताकेच्या मागे एकटवलेला वारकरी हा प्रत्येक दुसऱ्या वारकऱ्यास माऊली म्हणुनच संबोधतो.

#रामकृष्णहरी🚩

✍️सोनबाराजे तथा हर्षद रमेश हांडे देशमुख
#क्षत्रियबाणा

No comments:

Post a Comment

हांडे देशमुखांच्या शोधात

मला जसं जसं कळु लागलं तसं तसं माझे आजोबा कै. दादाराव हे मला आमच्या घराण्याविषयी ,घराण्यातील चालीरितींविषयी माहिती देत असायचे. गावातील मंडळी ...