*शिरूरचा आमदार न्हवं सालकरी*
पुणे - अहमदनगर रस्त्यावरून प्रवास करत असताना रांजणगाव गणपती जवळ आपल्याला एक इमारत दिसते. ती म्हणजे बाबुराव दौंडकर स्मारक समिती.माझ्या वयाच्या अनेकांना प्रश्न पडत असेल की ही काय भानगड आहे? त्यांचही बरोबरच आहे म्हणा काळ लोटला की काळाबरोबर माणसं देखील विसरली जातात म्हणुन त्यांच स्सरण राहण्यासाठी आणि त्यांचं कार्य निरंतर चालु राहण्यासाठी स्मारक उभी करावी लागतात. दिवंगत आमदार बाबुराव दौंडकर हे देखील त्यातील एक! संत एकनाथ महाराजांनी सांगितल्याप्रमाणे " सगुण चरित्रे परम पवित्रे| सादर वर्णावी||" म्हणुन कै.बाबुराव दौंडकर यांच्या कार्याचा व जिवन चारित्र्याचा घेतलेला संक्षिप्त आढावा.
भारत देश स्वतंत्र झाला आणि भौगोलिक सीमांनुसार शिरूर तालुक्याची निर्मिती झाली.चार चार नद्या असुन देखिल मागास आणि दुष्काळी होता.राजकीय आणि वैचारिक दृष्ट्या विचार केला तर सत्यशोधक समाजाचा जबरदस्त प्रभाव होता.
याच सगळ्या काळात प्रामुख्यानं कॉंग्रेसचं वर्चस्व असणाऱ्या भागातील करंजावणे गावात बाबुराव दौंडकर यांचा जन्म झाला.जेमतेम चौथीपर्यंत शिक्षण घेतलं.घरी जमीनजुमला भरपुर आणि गावात प्रतिष्ठित कुटुंब त्यामुळं त्यांना गावच्या राजकारणात भाग घेतला. तत्पुर्वी ( इ.स.१९५७ साली श्री.संभाजीवराव पलांडे आणि श्री.रामराव पलांडे यांनी शिरुर येथे जनसंघाच्या शाखेची स्थापना केली. पिंपळे खालसा गावचे श्री.बबनराव धुमाळ यांची जनसंघाच्या तिकीटावर लढुन जिल्हा लोकल बोर्डावर निवड झाली होती.)जनसंघाचे जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्य बबनराव धुमाळ हे बाबुराव दौंडकर यांचे मामा होते. मामांबरोबर ते पुण्याला येत असत त्यामुळं त्यांचा पुण्यातील जनसंघाच्या लोकांबरोबर संपर्क झाला आणि १९६४-६५ सालापासून त्यांनी जनसंघाच्या कामाला सुरुवात केली.
१९६७ साली प्रथमत: ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पंचायत समिती सदस्य झाले.पाच वर्षांचा काळ गेला आणि दुष्काळ पडला तोच हा कुप्रसिद्ध १९७२ चा दुष्काळ! आधीच तालुक्यात पाण्याची टंचाई त्यात या दुष्काळाची भर!परंतु दुष्काळ निवारणासाठी बाबुराव दौंडकर यांनी अनेक प्रयत्न केले जागोजागी तलाव बांधण्यासाठी मागणी असो अथवा दुष्काळग्रस्तांच्या हातांना काम असो बाबुराव दौंडकर कायम आघाडीवर राहिले.
१९७२ साली दिवसामागून दिवस जात होते पण आशेचा किरण दिसत न्हवता.शेवटी बाबुराव दौंडकर अनंत चतुर्दशीला पुण्याला गेले तिथं गणपती विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर लक्ष्मी रोडला त्यांनी स्टॉल लावला आणि सबंध पुणेकरांपुढे मदतीची याचना केली. कुणी साड्या दिल्या, कुणी कपडे दिले,कुणी अन्नधान्य तर कुणी पैसे.याच काळात श्री. बिंदुमाधव जोशी यांचा त्यांच्याशी परिचय झाला आणि त्यांना प्रोत्साहन दिलं.त्याच्या मदतीने दुष्काळग्रस्तांच्या उदरनिर्वाहासाठी अनेक योजना सुरू झाल्या होत्या मात्र कधी कधी त्यांना पगार वेळेवर मिळत नसे. एकदा तर संपुर्ण महिनाभर पगार झाला न्हवता.दुष्काळग्रस्तांचे जीव मेटाकुटीला आले होते. मग बाबुराव दौंडकर यांनी शेवटी तहसिल कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग स्विकारला.उपोषणाच्या दिवशी नेमकी एकादशी होती.उपोषणकर्त्यांनी भजन करत उपोषण केले आणि शिरुर तहसिल कार्यालया समोर उपाशी विठ्ठल मंदिराची स्थापना केली. उपोषणाची बातमी शासनापर्यंत पोहोचल्यानंतर तिसऱ्याच दिवशी दुष्काळ निवारणाच्या कामावर असलेल्या लोकांचे पगार झाले.बाबुराव दौंडकरांची जनसामान्यात वेगळी प्रतिमा झाली.
पुढे १९७५ साली आणीबाणी जाहीर झाली.जनसंघातील सर्व कार्यकर्त्यांनी आणीबाणीला विरोध केला आणि त्यांची सगळ्यांची रवानगी तुरुंगात झाली.बाबुराव दौंडकर देखिल त्यात होते ,त्यांनी पुर्ण वेळ शिक्षा भोगली.
बाबुराव दौंडकरांच कार्य सर्व जनता पाहत होती बघता बघता १९७८ साल उजाडलं.विधानसभेची निवडणूक लागली होती.चार पक्षांच्या विलिनीकरणातून तयार झालेला जनता पक्ष हा कॉंग्रेसचा तगडा विरोधक मानला जात होता.सुरुवातीला जनता पक्षाचा उमेदवार हा वेगळा जाहीर झाला होता मात्र बिंदुमाधव जोशींनी दिल्लीपर्यंत फिल्डींग लावली आणि बाबुराव दौंडकरांना तिकिट मिळालं!
बिंदुमाधव जोशींनी संपुर्ण प्रचार यंत्रणा ताब्यात घेतली! संभाजीराव पलांडे आणि बिंदुमाधव जोशींनी आख्खा तालुका पिंजुन काढला आणि अखेर बाबुराव दौंडकर यांचा विजय झाला.
आमदार झाला तरी बाबुरावांचा पिंड बदलला नाही.ते रांजणगाव वरून शिरुरला एस.टी बसने येत आणि स्टॅंडवरून तहसिल कार्यालयात पायी जात असत.तहसिल कार्यालयात आलेल्या व्यक्तींची कामे मार्गी लावत असत.त्यांच व्यक्तीमत्व अष्टपैलू होतं. भजनात गेलं की भजन्या अन् शेतात गेलं की शेतकरी! ते जनतेला म्हणायचे तुम्ही मला निवडलं म्हणजे मला सालानी ठेवलय! पडेल ते काम सांगत जा.म्हणुन बिंदुमाधव जोशींनी त्यांना शिरूरचे सालकरी ही उपाधी दिली.
✍🏼हर्षद रमेश देशमुख.
(अॅड ्.अशोकराव पलांडे आणि अॅड्.सुमिता दौंडकर यांनी अनेक अनुभव आणि किस्से सांगतले आहेत ते आपण पुढच्या भागात पाहु)