Tuesday, 5 November 2019

कुठं गेले बापुराया



बाप करी जोडी।लेकरांची ओढी।
आपुली करवंटी वाळवुनी।।

आमचे आजोबा राजश्री यधोराव उपाख्य बापुराय कोंडीराम हांडे देशमुख सरकार जुन्नर परगणे कर्डे निमोणे, करडे परगण्यातील ८४ गावचे मुख्य वतनदार कोंडीरामराजे यांचे थोरले अपत्य.त्यांचा जन्म १९३६ सालचा  आमच्या आजोबांच खरं नाव यधोराव त्यांच्या चुलत्यांच्या नावावरून ठेवलेलं पण 'कोंडीरामराजांच लेकरू' म्हणुन लोक त्यांना लाडाने 'बापुराया' म्हणत असत.आमच्या आजोबांच लहानपण त्यांच्या आजोळात गेलं म्हणजे भांबर्ड्यात,भांबर्डे गावचे कारभारी सखारामबापु पवार पाटील हे आमच्या आजोबांचे मामा ते पुढे भांबर्डे गावचे आजीवन  ३५ वर्षे सरपंच राहिले.पाटलाचा भाचा म्हणुन म्हणुन लाडाने त्यांना बबड्या म्हणतात नि बबड्याचा पुढे झाला बबनराव अन् समस्त भांबर्डेकरांचे ते झाले  बबनदाजी.इंग्रज सरकारच्या राज्यात मिळणारा देशमुखी पेन्शन १९५२ साली बंद झाली अन् त्याच वर्षी आमच्या परिसरात मोठा दुष्काळ पडला आमच्या कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी सिंहगड पायथ्याशी  स्थलांतर कराव लागलं,नि कशीबशी पोटापाण्याची सोय झाली.दुष्काळाच्या काळात २-३ वर्षे तिथच काढावी लागली. पुन्हा करड्याला आले तरी परिस्थिती बेताचीच होती. कसेबसे शेती करत दिवस काढत होते नंतर सर्वांच्या संमतीने १९५८ च्या आसपासनपुण्याला गेले पण १९६२ साली पानशेत धरण फुटलं नि आमचे आजोबा पुरग्रस्त झाले होत तेव्हढं ते सगळं मुठाआईने तिच्या पदरात घेतलं पुन्हा पहिल्यासारखीच परिस्थिती आली.१९६७  साली पुन्हा पोटापाण्यासाठी स्थलांतर कराव  लागलं पण यावेळी ठिकाण होतं माळेगाव (शरद पवारांच).शरद पवारांची  पहिली निवडणुक कशी होती ते अगदी रंगवुन सांगत.पुन्हा गावाकडे आले.करड्यावरून आंबळ्याला शेतात  काम करायला येणं अवघड होऊ लागलं होतं.त्यामुळं ते आंबळ्यात कायमस्वरूपी वास्तव्यास आले.तिथ त्यांना गोलेकर अण्णा नि विलास दादा ही जिवाला जीव देणारी माणसं भेटली.गोलेकर अण्णांनी विचारलं "तुम्हाला घरात कोणत्या नावाने हाक मारतात" ते म्हणाले "मला सगळे दादा म्हणतात" अण्णांनी उत्तर दिलं "मग आजपासुन तुम्ही दादाराव" दादाराव म्हणलं की आडनाव सांगायची गरज न्हवती.आमचे वडील,चुलते जसजसे मोठे होऊ लागले तसं पैशांची चणचण अधिकच भासु लागली तरी आमच्या आजोबांनी धीर सोडला नाही. दहावीत चांगली मार्कं पडल्यामुळं आमच्या वडीलांचा १९९३ साली डीएड् ला नंबर लागला नि आजोबांनी सुटकेचा निश्वास सोडला तरी वाट सोपी न्हवती बाहेरगावी राहणंसुद्धा खिशाला परवडणारं न्हवतं पण आमच्या आजोबांचे साडु गाडेकर सर (पुढे ते रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे इन्सपेक्टर झाले) त्यांनी आमच्या वडीलांचा शैक्षणिक खर्च उचलला नि तिथुन पुढं आमची गाडी रूळावर आली.
आमच्या आजोबांच पोट हातावर असताना सुद्धा त्यांनी आपली देशमुखी संभाळणाऱ्या  तत्त्वांशी कधीही तडजोड केली नाही.मला म्हणायचे "भावड्या,शिळी भाकरी शिळं कालवण खा पण कधी कुणाबरोबर लबाडी करु नकोस, देव तुझं भलं केल्याशिवाय राहणार नाही." त्यामुळं त्यांच्या या शिकवणीमुळं मी केवळ दादारावचा नातुच नाही तर दादारावचा पठ्ठ्या सुद्धा झालो.माझे विचार जुन्या माणसांसारखं असण्याचं हेच कारण आहे.मला ते सांगायचे "भाऊ,आपण ९६ कुळी " मी म्हणायचो "९६ कुळी म्हणजे काय?" ते  म्हणायचे "पिव्वर मराठा" मी म्हणायचो "पिव्वर मराठा म्हणजे काय" माझ्या अजाणतेपणाला पाहुन ते हताश व्हायचे.आंबळे गावातवारकरी संप्रदायाची स्थापना करण्यात ते संस्थापक सदस्य होते.
आमचे वडील नोकरीला लागल्यापासुन सर्व काही आलबेल होतं पण गेल्या वर्षी मुत्रपिंडानी त्यांच्या शरिराची साथ सोडली अन् अंथरूणाला खिळले. 'तुका म्हणे मायबाप केवळ काशी तेणे न जावे तिर्थासी' या उक्ती प्रमाणे आमच्या वडिलांनी तन,मन,धनानी आजोबांची सेवा केली पण परमेश्वराचा सांगावा कुणी टाळु शकत नाही गेल्या १७ तारखेला त्या़ची प्राणज्योत मावळली.आमची आजी नवीन असताना करड्यातली माणसं "कुठं गेलं बापुराया" असं म्हणुन आमच्या आजीला चिडवत असत.आज ते त्यांची ४५ वर्षाची वारकरी संप्रदायाची सेवा केली म्हणुन नक्कीच वैकुंठात गेले असतील.
त्यांच्या अंतयात्रेला आणि दशक्रिया विधीला लोटलेली अफाट जनसागर हे त्यांच्या आयुष्याचं संचित आहे.

#दादारावचानातु

🖋 सोनबाराजे तथा हर्षद रमेश हांडे देशमुख
Harshad Deshmukh

No comments:

Post a Comment

हांडे देशमुखांच्या शोधात

मला जसं जसं कळु लागलं तसं तसं माझे आजोबा कै. दादाराव हे मला आमच्या घराण्याविषयी ,घराण्यातील चालीरितींविषयी माहिती देत असायचे. गावातील मंडळी ...