Tuesday, 31 December 2019

३१ डिसेंबरच्या रात्री

तो दिवस होता ३१ डिसेंबरचा दिवस म्हणणण्यापेक्षा रात्र म्हणलेली बरी !!तर रात्र ,तीच  नियोजन काही ठरलं न्हवतं पण काहीतरी करायच हे निश्चित होतं कारण आमचं पुण्यातलं पहिलच वर्ष होतं त्यामुळं उत्सुकता शिगेला पोहोचली होती!त्या दिवशी मी आणि सुहास जरा लवकरच रुमवर आलो !रोजच्यासारखाच दिवस होता !विशेष काही घडतच न्हवतं !तरी आमची (सुहास,मंग्या,बोक्या ,माऊली नि मी ) पुण्यातल्या MPSC शांघायच्या शेजारी होती! त्यामुळं तिथ राहण्याचा सुद्धा एक वेगळाच थरार होता त्याबरोबर ऐतिहासिक आंबिल ओढ्याचा सहवास तो तर वेगळाच!  त्याचा गंध थेट आमच्या खोलीपर्यंत यायचा.तिथं पाणी वेळेवर येत नसे म्हणुन टाकीत वरून पाईप टाकुन पाणी भरावं लागत होत.एकसलग तीन खोल्या अशी त्या सदविकेची रचना होती आत प्रवेश केला तरी तिसऱ्या खोली तील दृश्य दिसत असे.त्या दिवशी सुद्धा आम्ही पाईप टाकित टाकला होता.बघता बघता संध्याकाळ झाली. पाऊणेआठ वाजता जेवण करायला गेलो कारण लवकर गेल्या की चपात्या गरम असायच्या आणि तो दिवसही वेगळा.जेवण करून तसंच हा नाय हा नाय करत आम्ही तसंच FC Road ला गेलो.निर्णय होत न्हवता कारण आम्ही पाच जण होतो नि मोटारसायकली दोनच ,१ जण जास्त होत होता तरी आम्ही डेरिंग करून पोलीसांना न घाबरता पोलिस आपल्याला काय करणार आहेत या अविर्भावात आम्ही  कुणीतरी सांगितलं होत की तिथ डॉल्बी लाऊन नाचतात म्हणुन !पण तिथ गेल्यावर वेगळीच परिस्थिती होती ,येशु ख्रिस्तांचे सगळे भाविक भक्त तिथ गोळा झाले होते त्यात भावी कुटुंब असलेल्यांचा जास्त सहभाग होता.आम्ही भारतीय संस्कृतीचे रक्षणकर्ते म्हणुन त्यांपासुन जरा लांबच आणि त्यात भिकारी या व्यवसाय क्षेत्रात मोडणारी लहान बालकांपासुन तर अजुनच लांब पण चमकणारी हिरवळ देखील तिथं जास्त होती ,फुगेवाल्यांची रेलचेल होती मध्येच आमच्या सारखे कॉलेजकुमार तोंडात भोंगा वाजवत फिरत होते तशी हळुहळु गर्दी होत चालली होती.आम्हाला तिथुन निघावसं वाटत होतं पण तेव्हढ्यात आमच्या लक्षात आलं की आपल्या जुन्या वर्गमैत्रिणी याच परिसरात राहतात त्यांच भेट कम दर्शन होण्याची शक्यता होती. पण आमच्या नशिबानी आम्हाला गणपती आणि दहिहंडी अशा दोन्ही वेळी हुलकावणी दिली होती परंतु त्या दोघी तथाकथित आधुनिक विचारांच्या असल्यामुळं आज दर्शन होण्याची शंका बळावली होती.त्यामुळं आम्ही आमच्या दुचाक्या  कॅफे गुडलकच्या अगदी समोर जिथे मुलींचे टॉप ५०/- रू.प्रतिनग मिळतात त्याच्या बाहेर लावल्या नि पर्यटनाला निघालो रुपाली ,वैशाली करत ‍FC College च्या मुख्यदरवाजाशी पोहोचलो तिथं एस.पी.कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा चमु नृत्य करत होता.ते पाहुन आम्ही पुढच्या आडवाटंनं जंगली महाराज रस्त्यावर गेलो पण तिथं सुद्घा काहीही दिसलं नाही (इथं काहीही चा अर्थ कुणीही असा घ्यावा) आमच्या मंग्या बोक्याचा हिरमुड झाला ,त्यात बोक्या आणखी थांबायला तयारच न्हवता(नेहमीप्रमाणे).कर्वेनगरला डॉल्बी असतो हे आता आम्हाला नवीन कळलं त्यामुळं आम्ही आमचा मोर्चा तिकडं वळवला.मंग्या आणि बोक्या परत खोलीवर गेले.प्रभात रोडनी जायचा विचार होता पण गर्दी पाहून कर्वे रस्त्याची वाट धरली आणि व्हायच न्हवतं तेच घडलं .खंडोजीबाबा चौकात आमच्या समोर पोलिस उभे राहिले त्या वेळेस कदाचित ११ वाजले होते ,आमच्या कपड्यांचा ग्रामीण बाज अन् हिरवळीकडे बघणारी आमची गावरान नजर त्यावेळेस आम्हाला बेवडं सिद्ध करत होती.त्यांनी आमची गाडी बाजुला घ्यायला लावली नि लायसन्स मागितलं नेहमी प्रमाणे आम्ही ते रुमवरच ठेवलं होत.आम्ही फोटो दाखवण्याचा प्रयत्न केला तर ते म्हणाले फोटो चालत नाही .हे ऐकुन आमचे मित्र माऊली कोकडे यांच्यातला भावी अधिकारी तथा स्पर्धा परिक्षा विद्यार्थी जागा झाला नि पोलीस मामांनाच कायदा शिकवु लागला .त्यामुळे पोलीस शिपाई अधिकच भडकले त्यांनी आमच्या कडे १७०० रू पावती मागितली आमची अक्कल तिथेच बंद पडली.माऊल्याचा अतिशहाणपणा नेहमीप्रमाणेच चांगलाच नडला होता काय कराव ते सुचत न्हवतं तेव्हढ्यात आमच्या न्हावरे  गावातल्या API साहेबांची आठवण झाली पण त्यांचा मोबाईल नंबरच माहित न्हवता मग आम्ही त्यांच्या फेसबुक खात्यावरून त्यांचा नंबर घेतला ,करू का नको करू का नको असं करत एकदाचा त्यांना फोन लावला त्यांनीही लगेच आमचा फोन उचलला हे महत्वाचे !त्यांच बोलण त्या पोलीस शिपायाशी करूनदिल तरी पण ते ऐकत न्हवते.त्यांनी बळेच १२ वाजेपर्यंत ताणुन धरलं कारण १२ वाजल्या पासुन हेल्मेट सक्ती होती .आमचं Happy New Year तिथच साजरं झालं .परत हेल्मेटचा दंड भरावा लागला.असं निराश मन घेऊन आम्ही तिघं (सुहास,माऊल्या नि मी) रुमवर पोचलो .तर तिथं आणखी मोठं दिव्य पार करायच होत.पाण्याचा नळ बंद करताच आम्ही निघुन गेलो होतो त्यामुळं पाणी टाकीच्या बाहेर येऊन पुर्ण तीन खोल्यांत गच्च भरलं होत आमच्या गाद्या भिजल्या होत्या दप्तर ,वह्या पाण्यात पोहत होत्या ,नशिब म्हणुन लॅपटाॅप उंचावर ठेवला होता म्हणुन बचावला .मंग्या आणि बोक्या पाणी बाजुला करत होते.कशीबशी रूम स्वच्छ झाली होती.पण झोपायचा यक्ष प्रश्न आमच्या समोर होता.निमओल्या चादरी आम्ही अंथरूण म्हणुन टाकल्या होत्या.तसच रात्री कुडकुडत आम्हाला झोपाव लागलं याचा परिणाम दुसऱ्या दिवशी अंगाात कणकण भरली.३१ डिसेंबर होऊन दोन दिवस झाले तरी त्या दिवसाचा हँगआऊट उतरला न्हवता
टीप:फोटो त्यारात्रीचा अर्थात ३१ डिसेंबर २०१८ चा फ.म.रोडवरची आहे
ताक.-त्या दोघी फक्त काल्पनिक आहेत.


--सोनबाराजे तथा हर्षद रमेश हांडे देशमुख

Sunday, 15 December 2019

निंबाळकर पाटलांची हकिकत

पाटीलकी.....

राजेभोसले घराण्याने सुद्धा छत्रपती झाल्यानंतर देखील अभिमानानं चालवलेलं वतन,यावरूनच आपल्याला पाटील या शब्दाचा आवाका लक्षात येतो आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणात देखील महाराष्ट्रात विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर सुद्धा पाटलांचीचदादा’गिरी असल्याचे लक्षात येते.महादजी बाबा शिंदे पाटील अलिजाबहाद्दर यांना 'हिंदुस्थानचे पाटील' म्हणून गौरवण्यात येते. .इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनांमधून पाटील या शब्दाची जादू दाखवून देतात एवढा हा आपल्या समाजातील जिव्हाळयाचा शब्द. समाजमाध्यमांवर आणि लग्नपत्रिकेत पाटील शब्दाचीच रेलचेल दिसून येते . आज देखील प्रत्येक जण स्वतःला पाटील म्हणून घेऊ इच्छितो .कारण पाटील या शब्दाला इतिहासच फार मोठा आहे .सरकार आणि सामान्य रयतेमधील दुआ म्हणजे पाटील . गावाच्या मिरासदारांपैकी प्रमुख अथवा वरिष्ठ घराण्याला पाटीलकीचा बहुमान मिळत असे . काही गावांमध्ये एक पेक्षा अधिक पाटीलकीच्या तक्षिमा असत तेव्हा पाटीलकीच्या मानाच्या वाटण्या होत असत.होळीची पोळी,पोळ्याचा बैल , लग्नाची वाटी ,मांडव टिळा ,दसऱ्याचा मान ,पासोडी ,राबता महार, चांभाराकडून जोडे,तेल्याकडून तेल, देवाकडे बकरे पडतात त्याची मुंढी अशा प्रकारचे मान गावाच्या पाटलांना असत ,प्रत्येक गावानुसार पाटलाचा मानपानात थोडा फार फरक होत असे. मौजे रांजणगाव सांडस तर्फ कर्डे ,येथे रणदिवे पाटील बंधूंमध्ये पाटीलकीच्या वडिलपणावरून वाद होऊन थेट पेशव्याच्या दरबारात गेल्याचे आपल्याला पाहायला मिळते. यात आपली सत्यता सिद्ध करण्यासाठी दिव्य करावे लागले होते . अनेक मजहरांमध्ये अनेकदा साक्षीदार म्हणून विविध गावाचे पाटील व कुलकर्णी आपल्याला पाहायला मिळतात. त्यात पाटलाची निशाणी नांगर असल्याचे आपल्याला दिसते. इंग्रजी अंमल सुरु झाल्यापासून पाटीलकीच्या कामात विभागणी होऊन पाटलांचे दोन प्रकार झाल्याचे आपल्याला दिसते १ मुलकी पाटील २ कामगार पाटील .कामगार पाटलालाच पुढे पोलीस पाटील म्हंटले गेले आहे.
आमच्या मौजे आंबळे गावात पाटीलकीच्या दोन तक्षिमा होत्या १ बेंद्रे पाटील २ निंबाळकर पाटील . यातले राजेनिंबाळकर पाटील हे शिवपूर्वकाळापासून पाटीलकी करत होते. बेंद्रे पाटलाअगोदर घुमरे पाटील मौजे आंबळे गावाचे निम्मे मुकादम होते . पण १९व्या शतकाच्या उत्तरार्धात इतिहासाला आजही अपरिचित असलेल्या आंबल्यातील राजे निंबाळकर घराण्याच्या वंशाला दिवा राहिला नाही. म्हणून त्यांच्या घरातील एका जुन्या स्त्रीने त्यांच्याच भावकीतील कोल्हापूरच्या सरलष्कर निंबाळकर खर्डेकरांचे नजीकचे भाऊबंद असलेले मौजे दानोळीच्या बाळासाहेब निंबाळकर खर्डेकर यांना पाचारण केले.बाळासाहेब त्यावेळेस हयात न्हवते मात्र त्यांची तीन मूलं कृष्णराव , गणपतराव ,दत्तोबा हे तीन बंधू आंबाळ्याला आले.वडीलपणामुळं थोरले कृष्णराव यांच्याकडं पाटिलकीची जबाबदारी आली .त्यांच अल्पावधीतच निधन झाल्यामुळं मधले बंधु गणपतराव पाटील झाले ,पुढे गणपतराव निवर्तल्यानंतर सर्वात धाकटे दत्तोबा पाटील पाटीलकी करू लागले. दत्तोबा पाटील यांनी सत्यशोधक समाजाला आपलंस केले अन् गावोगावी ‘जलसा’करत असत (गणपतराव पाटलांच निधन झाल्यानंतर;जयवंतराव पाटील लहान आहेत त्यामुळं तुम्ही पाटीलकी करा अशा आशयाच पत्र थेट कलेक्टरं नच दत्तोबा पाटलांना पाठवलं होत,आजही ते उपलब्ध आहे.ही गोष्ट १९२० सालची आहे).जयवंतराव वयात आल्यानंतर ते पाटील झाले.आणि तिथुन पुढे सुरू झाला निंबाळकर पाटलांचा सुवर्णकाळ !दरारा म्हणजे काय असतो ते त्यांना बघुन कळतं'पाटील म्हणजे एक घाव अन् 100 तुकड' हे वाक्य ज्यांना तंतोतंत लागु होतं ते जयवंतराव पाटील निंबाळकर (पाटीलदादा) न्हावरे, आंबळे आणि कर्डे गावचे पाटील राहिलेले व संपुर्ण तालुक्यात पाटील म्हणल की ज्यांच नाव येत ते पाटील दादा. त्यांची जीवनगाथा माझ्या मित्रांना आख्यायिका किंवा दंतकथा वाटतात एव्हढी ती अविश्वसनिय आहे.लोकांना त्यांच्याविषयी आदरयुक्त भीती होती,पाटीलदादा दिसले की लोक बाजुला पळुन जात म्हणलं तरी वावगं ठरणार नाही.स्त्रिया त्यांना पाहून आपली वाट बदलीत.त्यांचे तीनही चुलतबंधु त्याच तोडीचे माझे गुरू .दादासाहेब निंबाळकरांनी तर आदर्श जीवनाची ओळख करून दिली.त्यांचे धाकटे बंधु शंकरराव हे महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त.पाटील दादांची दोन्ही मुलं गावची सरपंच राहिली थोरले श्री .विजयकुमार (बाळपाटील)यांनी गावातील सरपंच,सोसायटीचे चेअरमन नि पोलीस पाटील अशा सर्व पदांवर काम केलं.आज त्यांची चौथी पिढी समाजकारणात आहे गावानेही त्यांना त्याच आपुलकीनं स्विकारलय.हे विशेष!
शिवपुर्वकाळापासुन ते आतापर्यंत महाराष्ट्रात फार थोडी करावी असतील ज्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जीवावर समाजात आपलं मानाचं पान राखलय त्या सर्व घराण्यांना मानाचा मुजरा !!
कृपा लोभ असो दीजे ही विनंती
सोनबाराजे तथा हर्षद रमेश हांडे देशमुख

हांडे देशमुखांच्या शोधात

मला जसं जसं कळु लागलं तसं तसं माझे आजोबा कै. दादाराव हे मला आमच्या घराण्याविषयी ,घराण्यातील चालीरितींविषयी माहिती देत असायचे. गावातील मंडळी ...