Tuesday, 5 November 2019

मंदीर कब बनायेंगे?



मी जवळपास ४-५ वर्षे वयाचा होईपर्यंत आमचं कुटुंब आंबळे गावठाण हद्दीत राहत होतं.आजही  ते दिवस पटकण समोर येतात अन् ती माणसंही.त्यावेळेस गावातील बरचसं बांधकाम दगडी होतं.रांजणगावला औद्यौगिक वसाहत झाल्यामुळं गावात पैशाला यायला रस्ता सापडला होता.चासकमान डाव्या कालव्याच काम सुरू होतं,त्यामुळं शेतकरी उज्वल भविष्याच्या आशेवर होता.माझ्या आई-वडील दोघांचाही पेशा शिक्षकांचा असल्यामुळं त्या काळात आजी-आजोबांबरोबर जास्त वेळ घालवायला मिळाला.
                 अंघोळ करून गंध पावडर झाला की मी ,माझे  आजोबा दादाराव तस मी त्यांना बाबा म्हणतो (बाबा म्हणजे 'बा' चा 'बा' असा मी काढलेला अर्थ आहे)त्यांच्याबरोबर फिरायला जायचो.ते आपल्या भजनीमंडळाच्या बैठकीचं नेहमीचं ठिकाण असणाऱ्या राम मंदिरात त्यांच्या मित्र मंडळींबरोबर हितगुज करायचे.आजी मला राम मंदिरात गेल्यावर खायला म्हणुन डबा करुन द्यायची त्यात मिठाची गवार अन् चपाती असायची.बाबांच्या बोटाला धरून माझा गावचा  फेरपटका सुरू व्हायचा.पांडाभाऊंच्या पिठाच्या गिरणी जवळ आलो की पांडाभाऊ म्हणायचे"काय राजं,लावायची का पावडर लावायची?" मी त्यांच्या पीठाने भरलेल्या अवताराकडे पाहून घाबरायचो.त्याला प्रत्युत्तर म्हणुन बाबा म्हणायचे "सांग ना,घरूनच लाउन आलोय.मी मात्र घाबरून फक्त मानंच डोलवत असे.

 हळुहळू नाजुक पावलांनी लुटुलुटु करत राम मंदिर गाठायचो.राम मंदीर म्हणजे खरखुरं रामलक्ष्मणाच्या मुर्त्या असलेलं मंदिर न्हवत,त्याची नियोजित जागा होती.अन् त्याजागेवर दोन खोल्या होत्या त्यातल्या एका खोलीला राम मंदिर म्हणायचे.खोलीच्या आतमध्ये विविध देवदेवतांची छायचित्रे लावलेली असायची त्यातल रामाचं अन् अर्धनारीनटेश्वराचं चित्र अजुनही मला स्पष्ट आठवतय कारण त्या अर्धनारीनटेश्वराच्या अवताराकडं बघुन कुतुहुल व्हायचं म्हणजे भीतीच.पायऱ्या चढता यायच्या नाहीत म्हणुन बाबा मला उचलुन ओट्यावर ठेवायचे.ओट्यावर चिमुकाटा असायचा ,चिमुकाटा टोचणार नाही अशा पद्धतीने मी चप्पल काढुन आत डोकवायचो आणि हसायचो.कारण दारात बसलेले असायचे आमचे पणजोबा कोंडीरामराजे यांचे मित्र माधवराव केशवराव घायतडक.ते माझ्याकडं म्हणुन म्हणायचे "आलं बघा कोंडीरामराजं ,आज आणला का डबा" ,मी म्हणायचो " हा,आणला ना"आत गेल्यावर सर्वांचा राम राम सुरू व्हायचा.राम मंदिरात भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आमच्या बाबांवर जीवापाड प्रेम केलं त्यात जयवंतराव अण्णा ,साहेबराव आबा यांचा उल्लेख आवर्जुन करावा लागेल.तिथं बसणारी बरीच माणसं आठवतात बाबाजी घुंबरे,बाबाजी डाळिंबकर ,दत्तोबा पाटील,जयवंत अण्णा ,साहेबराव आबा हे तीन बंधु,गोलेकर अण्णा,माधवराव घायतडक,दगडु मिस्त्री,तुकाराम तात्या ही माणसं मला ठळक आठवतात.
   
थोडी हितगुज झाल्यानंतर त्यांची गाडी चहाकडे वळायची त्या खोलीत एक रॉकेलवरचा स्टोव्ह देखील होता त्यावर चहा करायचा अन् स्टीलच्या पितळीतुन प्यायचा असा नित्यक्रम एक १०-१२ पितळ्या असतील तिथं.मला मात्र डबा खायला लावायचे मी डबा खात नसं तेव्हा जयवंत अण्णा माझ्या शेजारी बसून स्वत:च्या हाताने मला घास भरवत असायचे मग माझी पाळी आली की मी त्यांना घास भरवायचो.मला चहा दिला नाही की मी मात्र भोंगा पसरवायचो.😅कशीबशी समजुत काढायचे.जसं ऊन चढु लागंल तसतस प्रत्येक जण आपापल्या वाटंनी घराकडे निघत असत.मी वर उल्लेखल्या व्यक्तीपैंकी आज फक्त १-२ व्यक्तीच आज हयात आहेत.त्यांच्यातलं एक एक पान गळु लागलं तशी राम मंदिरातली गर्दी कमी झाली आणि आज त्या खोलीला १२ महिने २४ तास कुलुप असतं .राम मंदिरात बसणाऱ्यांची तीव्र इच्छा होती की गावात एक राम मंदिर व्हाव!! मात्र ते आजतागायत झालं नाही.
त्यानंतरचा एक दिवस मला आठवतोय कदाचित मी ६ वीला असेल बबन गायकवाड(कोळी) पत्रिका वाटत असताना आमच्या घरी आले त्यावेळी दादासाहेब निंबाळकर  पेपर वाचत बसले होते.दादासाहेंबांच गावात जाणं कमी झालं होत  त्यावेळी दादासाहेंबा़नी उच्चारलेलं वाक्य आठवतय "क्यौं बबनराव,राम मंदिर कब बनाये़गे"

समाप्त 

सोनबाराजे तथा हर्षद रमेश हांडे देशमुख

No comments:

Post a Comment

हांडे देशमुखांच्या शोधात

मला जसं जसं कळु लागलं तसं तसं माझे आजोबा कै. दादाराव हे मला आमच्या घराण्याविषयी ,घराण्यातील चालीरितींविषयी माहिती देत असायचे. गावातील मंडळी ...