Tuesday, 5 November 2019

माझे गुरू:दादासाहेब निंबाळकर



आज गुरूपौर्णिमा ,आपल्या चिखला सारख्या मनाला मडक्याचा आकार देऊन समृद्ध करणाऱ्या कुंभाराच्या पुजेचा दिवस. प्रत्येक जण आयुष्यात शालेय शिक्षका़व्यतिरिक्त कुणाचा तरी शिष्य असतोच ,किंबहुवा त्या शिवाय त्या व्यक्तीची मानसिक व सामाजिक जडणघडण होणे शक्य नसतं,अस माझ वैयक्तिक मत आहे.
              हाच विचार गृहित धरला तर माझे वयाने आणि कर्तृत्वाने सर्वांत ज्येष्ठ गुरू म्हणजे कै.मारूतराव निंबाळकर ,आमच्या आजोबांचे मामा ,लोक त्यांना आदराने दादासाहेबच म्हणत.गावची मुकादमी असणाऱ्या एका 'सत्यशोधक' घराण्याचा वारसा दादासाहेब सांगत होते .सत्यशोधक दत्तोबा पा.निंबाळकर हे दादासाहेंबाचे वडील,दादासाहेब त्यांचे थोरले अपत्य.सातवी पर्यंत शिक्षण घेऊन दादासाहेबा़ंनी शाळा सोडली .एक नाही तर तलाठी,शिक्षक,पोलीस यासारख्या सात नोकऱ्या सोडल्या कारण त्यांचा मुळचा पिंड राजकीय नेत्याचा होता.दादासाहेबांचे वडील  सत्यशोधक दत्तोबा पा.निंबाळकर हे देशभक्त केशवराव जेधे यांचे मित्र त्यामुळे जेध्यांनी शेतकरी कामगार पक्ष सोडून कॉंग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर दत्तोबा पाटलांनीही कॉंग्रेसची वाट धरली.आणि जेधे साहेबांनी दत्तोबा पाटलांकडे गळ घातली की "पाटील तुम्ही तुमच्या पोराला विधानसभेला उभं करा" त्यावेळी शिरूर तालु्क्याने तालुक्यातला माणुस आमदार झालेला पाहिलं न्हवतं,तालुक्याबाहेरची माणसं आमदार होत होती.पण वैयक्तिक नातेसंबंधामुळे दादासाहेबांनी ती संधी नाकारली.नाहीतर आज तालुक्याच्या राजकारणात वेगळी समीकरणे आपल्याला पहायला मिळाली असती.
               मला राजकारणाबद्दल आकर्षण यांच्या मुळच वाटु लागलं,मला माझे जोडीदार म्हणतात"हर्षा ,तुला राजकारणाचा लय नाद" मला त्यांना सांगुशी वाटतं ,"मला राजकारणाचा नाद आहे राजकारण्यांचा नाही" ही शिकवण मला दादासाहेबा़मुळेच मिळाली.राजकारणाच चिंतन व चर्चा नेहमी राजकीय प्रवाहांवर करावी ही मला त्यांनीच दिलेली देणगी.त्यांनीही आपल्या विचारांशी कधीही तजवीज करण्याचा प्रयत्न केला नाही ,पार पृथ्वी जरी पालथी झाली तरी आंबळे गावातुन दोन मते कॉंग्रेसला मिळाली असती ती म्हणजे दादासाहेब अन् त्यांच्या पत्नी !!
       मी कळित होईपर्यंत त्यांच बरंच वय झालं होतं,त्यामुळे मला त्यांचा फार काळ सहवास लाभला नाही.त्यांच्या देहावसनानंतरही ते मला मार्गदर्शन करत राहिले ,ते त्यांच्या कागदपत्रांच्या माध्यमातुन!! गेल्या वर्षी मोडीच्या गोडीमुळे सहज मी त्यांची पेटी उघडली तर मला त्यात कागदपत्र रूपी खजिना सापडला!त्यात इसवी सनाच्या  १८८६ व्या सालापासुन कागद सापडले ते त्यांच्या मृत्युपर्यंत ,अनेक दिवस विविध कारणांनी त्यांनी न्यायालयीन लढा दिला होता आणि सर्वच लढायांत त्यांचा बिनदिक्कत विजय झाला होता. *कोल्हापुरच्या सरलष्कर निंबाळकरांचे जवळचे भाऊबंद* असा उल्लेख मला मोडी कागदपत्रांमधुन मिळाला.नाती संभाळावी ती त्यांनीच अगदी बहीणीबद्दलच असु अथवा धाकट्या भावा़बरोबर इतर कुणाशीही तुलना केली तर ते केव्हाही उजवेच ठरतील.
        दादासाहेबांसमोर आमच्या आजीने कधीच पायात पादत्राणे घातल्याचे मला तरी आठवत नाही ,आमच्या सर्वंं आजींच्या मनात त्यांच्याविषयी आदरयुक्त भीती होती त्यामुळं त्यांचा घोषा अधिकच कडक व्हायचा. दादासाहेंबाच्या गोऱ्या साहेबांच्या राज्यातील शिकारीच्या कहाण्या माणसं आजही जीभेवर चवीने रेंगाळतात.हातात छत्री ,डोक्यावर फेटा ,पायात जोडे असा त्यांचा साधा वेष होता.पण त्याच हातात बंदुक आल्यावर तो भारदस्त वाटायचा.अशा करारी व्यक्तिंत्व असणाऱ्या दादासाहेंबाकडुन मी फार काही शिकलोय आजही शिकतोय त्यांच्या हुशारीच्या ,चातुर्याच्या अन् घरंदाजपणाच्या गोष्टी ऐकत !!

सर्वा़ना गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 

धन्यवाद

हर्षद रमेश हांडे देशमुख
कसबे कर्डे ता.शिरूर जि.पुणे

No comments:

Post a Comment

हांडे देशमुखांच्या शोधात

मला जसं जसं कळु लागलं तसं तसं माझे आजोबा कै. दादाराव हे मला आमच्या घराण्याविषयी ,घराण्यातील चालीरितींविषयी माहिती देत असायचे. गावातील मंडळी ...