रावसाहेब दादा बाबुराव पवार. शिरूर तालुक्याचा पहिला भूमिपुत्र जो १९६२ साली तालुक्याचा आमदार झाला. त्यांच्या देखण्या रूपाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आजच्या घडीला टॉल्लिवूड च्या कुठल्याही अभिनेत्याला लाजवेल असा रांगडा मर्द गडी. सदरा,धोतर टोपी अन पिळदार मिश्या असा त्यांचा पोशाख .स्वभावात माधुर्य एवढं की प्रत्येक मित्राला, पाहुण्याला अस वाटणार की दादा फक्त आपल्याशीच अगदी मनमोकळे होऊन बोलतात.
पोलिस खात्यात नोकरी करून तालुक्याचा आमदार होताना आणि त्यानंतरही सहकाराच जाळं विणलं.पंचायत समिती सारख्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा बाजार समिती सारख्या सहकारी संस्था असोत दादा त्या संस्थांचे बळकटकरणासाठी अग्रेसर होते. त्यातूनच शिरूर तालुका खरेदी विक्री संघाची स्थापना दादांनी केली. एव्हढंच न्हवे तर आज रोजी तालुक्याचा राजकीय केंद्रबिंदू असलेला घोडगंगा सहकारी साखर कारखाना याची स्थापना करण्यात दादांचाच पुढाकार होता. ते स्वतः फक्त आमदार होऊन थांबले नाहीत तर आपल्या तालमीत वाढलेले पोपटराव कोकरे व पोपटराव गावडे यांना देखील आमदार बनवलं. एवढं मोठं आणि अचाट त्यांचं कर्तृत्व.त्यांचं कर्तृत्व आणि नेतृत्व सिध्द करणारी घटना स्वातंत्र्यानंतर घडली.
कोरोना सारख्या विषाणू मुळं आपत्ती काय असते हे माझ्या वयाच्या पोरांनी पहिल्यांदाच पाहिलं.पण याआधी नैसर्गिक आपत्ती येत होत्या.अशीच एक आपत्ती शिरूर तालुक्याची जीवनदायिनी असणाऱ्या भिमा नदीमुळे आजुबाजुच्या प्रदेशावर आली होती.बहुतांशी लोकांना वाटत की पुर म्हणजे १९६२ पण नाही त्या आधी ६ वर्ष म्हणजे १९५६ साली भीमा नदीवर महाभयंकर पुर आला होता त्याच नाव महापाणी त्याबद्दल आज अनेक जण अनभिज्ञ आहेत.पानशेत घटनेपेक्षा त्याची तीव्रता कितीतरी अधिक होती. हे आपल्याला पुढील घटनांवरून लक्षात येईल.आज बागायती आणि ऐश्वर्यसंपन्न दिसणारी नागरगाव, वडगाव, मांडवगण सारखी गाव कित्येक पिढ्या मागं गेली.नागरगाव संपुर्ण पाण्याखाली जाऊन नवीन गाव वसवलं. वडगाव ते मांडवगण लोक होडीने प्रवास करत होते. ऐकुन अतिशयोक्ती वाटेल पण सत्य आहे.एव्हढी भीषण तीव्रता त्या प्रलयाची होती.त्याचा सर्वात जास्त धोका दौंड तालुक्यातील हातवळण गावाला होता.त्याच वेळी चाळीशीतील एक व्यक्ती समोर आली. या प्रलयाची चाहुल लागताच त्यांनी हातवळण गाव स्थलांतरित केलं.आणि फार मोठा अनर्थ टाळला.त्या व्यक्तीचं नाव होत रावसाहेब बाबुराव पवार. दादांचं हजरजबाबी व्यक्तीमत्वाची झलक त्यांच्या कर्तृत्वातून दिसून येते.त्यांना आपत्ती व्यवस्थापण क्षेत्रातील दादा म्हणण्यास सुद्धा हरकत नसावी.अशा अनेक घटना दादांच्या आयुष्यात घडल्या असतील पण मला माहित असलेली ही एक.
धन्यवाद.
✍️सोनबाराजे तथा हर्षद रमेश हांडे देशमुख
No comments:
Post a Comment