Tuesday, 25 May 2021

तुकाराम बापु

आंबळ्याचा ९० वर्षाचा तरूण पैलवान!💪

 

त्याकाळी आंबळे गाव हे असं गाव होतं जिथं एकही व्यक्ती असा न्हवता की ज्यानं अंगाला कधी लंगोट लावला न्हवता ,खायला चटणी भाकरी का असंना पण कुस्ती करणार ते म्हणतात ना डीएनए वगैरै तोच पैलवानकीचा डिएनए आंबळे करांच्या रक्तात  होता.मी मागं सांगितल्याप्रमाणे पैलवानकीची ही गाथा सुरू होते ती थेट ६-७ पिढ्या पुर्वी पासुन म्हणजे कै.भगाजी बेंद्रे यांजपासुन!

 

तर एकदा काय झालं , इंग्रजांचा काळ होता ,असेल १९०० च्या आसपासचा या भगाजी बेंद्रेंना अटक करण्यासाठी घोडनदीवरून पोलीस आले होते. पण अटक कशासाठी करणार होते त्याच कारण मात्र मला माहित नाही.पोलीस आले मग त्यांनी चौकशी केली आणि भगाजींना म्हणाले "चला", भगाजी म्हणाले" थांबा गणसपट्टीवरून हुरडा खाऊन जाऊ" गावात गणेशपट्टी नावाचे शेत आहे.तिथं हुरडा खाल्ला भगाजी बेंद्रे जायला निघाले मात्र पोलीस म्हणाले " बेड्या घालाव्या लागतील" भगाजी म्हणाले"आवं, काय बी उप्योग नाही त्याचा" तरी त्यांनी बेड्या घातल्या आणि भगाजींनी त्या साधा जोर लाऊन कडकड मोडल्या ! एव्हढी ताकद त्यांच्या शरिरात होती .शिरुर तालुक्यात त्यांना तोड नव्हती.

 

आज आपण भगाजींच्या नातवाची गोष्ट सांगणार आहे आज त्यांचा नातु फक्त ९० वर्षांचा आहे. पै.तुकाराम कोंडीबा बेंद्रे हे त्यांच नाव पण सगळे त्यांना तात्या किंवा बापु म्हणतात.कै.पंढरीनाथबुआ,कै.दत्तुभाऊ,कै.आनंदराव अण्णा , कै.बबन नाना आणि तुकाराम बापु हे एका पिढीतील पैलवान .सायकलीवरून आखाडे करणारे ते पण एकाच दिवशी तीन -तीन आखाडं असा त्यांचा शिरस्ता असायचा. असं म्हणतात की तुकाराम बापु जेव्हा दंड मारत तेव्हा त्यांच्या पाठीची दोन हाडं एकमेकांना चिटकायची तेव्हा टॉक टॉक असा आवाज यायचा.खाली तुम्ही फोटोत पाहताय तसा त्यांचा पाठीच्या आणि छातीच्या मधला भाग वरवंट्यासारखा तर छाती पाट्यासारखी मजबुत होती. १९५६ साली सुरत येथे तत्कालीन मुंबई राज्य चॅम्पियन ना त्यांनी पाडलं होतं.किस्से मात्र त्यांच्या आखाड्यातल्या कुस्त्यांचे सांगितले जातात .

 

एकदा न्हावरे येथे आखाडा होता.सांगली जवळच्या विटा वरून 'नामा' नावाचा नामवंत पैलवान त्याच्या पठ्ठ्याला घेऊन आला होता.बराच वेळ त्याला जोड मिळत न्हवती खरं सांगायच तर पैलवान त्याला घाबरत होते.मात्र तुकाराम बापुंनी हिम्मत केली आणि समोरच्या राक्षसासारख्या दिसणाऱ्या पैलवानांना त्यांनी क्षणार्धात दुहेरी पट टाकुन गारद केलं.गावकऱ्यांनी त्यांची मिरवणूक काढली.तेव्हापासुन तुकाराम बापुंना लोक 'दुहेरी पटाचा बादशाह' म्हणु लागले.१९५१ ते १९६० हा बापुंचा ऐन उमेदीचा होता.मात्र आज वयाच्या ९० व्या वर्षी देखिल त्यांचा उत्साह तरुणाला लाजवणारा आहे. आजही तालमीत आल्यानंतर त्यांनी घातलेली पकड सहजासहजी सुटत नाही.पैलवान हा आजिवन पैलवानच असतो हे बाप्पुंनी दाखवून दिलंय.

एखाद्याच्या घरात चार पिढ्या पैलवानकी चालली की कायम टिकते आज त्यांच्या घरातील लागोपाठ पाचवी पिढी तालमीत घाम गाळताना दिसत आहे. हे बापुंच्या कष्टाचे फळ आहे असं म्हणावं लागेल.आंबळे गावच्या पैलवानांची कहाणी म्हणजे आंबळे गावची वैभवगाथा आहे.

 

क्रमशः

 

✍ सोनबाराजे तथा हर्षद रमेश हांडे देशमुख.

#क्षत्रियबाणा

 

कै.पंढरीनाथ बुआ यांची कहाणी:

 

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2646807772235014&id=100007174505257

 

#पैलवानांच_आंबळे

#तुकारामबापु

No comments:

Post a Comment

हांडे देशमुखांच्या शोधात

मला जसं जसं कळु लागलं तसं तसं माझे आजोबा कै. दादाराव हे मला आमच्या घराण्याविषयी ,घराण्यातील चालीरितींविषयी माहिती देत असायचे. गावातील मंडळी ...