#आणि_तीने_त्याला_मिठीच_मारली.....
हे शिर्षक वाचुन तुम्ही जरा गडबडला असाल नाहीतर मनात आलं असंल की दादारावचा नातु बावचाळला काय ? पण तसं काही नाही हा प्रोपगंडाही नाही आणि मी पुर्ण शुद्धीत आहे .आश्चर्य वाटेल पण ही गोष्ट देखिल एका पैलवानाची आहे. हो !पैलवानाचीच तुम्ही बरोबर वाचलय.
इंग्रजांचा काळ होता. साधारण १९२०-३० च्या काळात या पैलवानाचा सुवर्ण काळ होता.तस या पैलवानाच कुटुंब गुलबर्गा जिल्ह्यातील शाबाजवाडीच.पण पोटापाण्यासाठी आंबळ्यात आले आणि इथंच स्थायिक झाले.वडार समाजातील कुटुंब होतं.दगडी फोडली तरच भाकर तुकडा मिळत होता.अशा परिस्थितीत देखिल त्या कुटुंबानी आपल्या पोराला पैलवान करायचं ठरवलं
आणि केलं सुद्धा आणि असं केलं की ज्याचं नाव ते थोडक्यात बाहुबली! पण देह उगं बारका साधा ५ फुट पण नसंल. काळं कुट्ट शरीर पण ताकद हे अफाट आणि गोटीगत शरीर हे दगडावानी .असं म्हणतात की बेंबीत तेल सोडलं तरी वाटीभर तेल बसायचं आणि वडाऱ्याच काम करायला लागला की हत्ती एव्हढाले दगड एकटा फोडायचा.हातावरल पोट अन् निऱ्ह दुधाचा खुराक तरी एव्हढी प्रगती की जुन्नर खेड पासुन ते थेट कडा आष्टी पर्यंत नाव झालेल. अजुनही म्हणतात की असा पहिलवान होणे नाही
एव्हढी त्यांनी जबर पगडा बसवला होता
त्यात त्यांची एक कुस्ती फार गाजली ती देखील इंग्रजांच्या काळातील.त्यावेळी इंग्रज अधिकाऱ्यांचा भारतीय जनतेवर बऱ्यापैकी वचक होता.गांधीजींचे विचार तळागाळात पोचले न्हवते त्यामुळे रयत इंग्रजांना घाबरून असतं त्यामुळे तसा तो बर्यापैकी शांततेचा काळ होता. सासवड या ठिकाणी आखाडा भरला होता.आणि त्या काळात स्पर्धा कमी असल्यामुळे आखाड्यांना मान होता.त्याच आखाड्यात एक पंजाबी पैलवान आला होता त्याला जोड सापडणं कठीण होत
पण या पैलवानाला जोड दिली ते आंबळ्याच्या वडार समाजातील या ठेंगण्या पोरान.लोकांना कुस्तीचा निकाल स्पष्ट दिसत होता तो पंजाबी सहज कुस्ती मारणार हे स्पष्ट होत. पण आंबळ्याचा हा गडी मात्र अंगावर वाघाचे पट्टे काढुन हे आख्ख्या आखाड्यात कोलांट्या मारीत होता.आखाडा पहायला अफाट गर्दी झाली होती कारण तो आखाडा पहायला इंग्रजांची कुठलीतरी बाई आली होती. तीला मेमसायेब का काहीतरी म्हणत असत कारण तसा तीचा दर्जा वरच्या स्तराचा होता.आजही आखाड्यात सहसा महिला येत नाहीत तर त्या काळातल्या लोकांना तोंडांत बोट घालण्याजोगी गोष्ट होती.
कुस्ती सुरू झाली, मात्र सुरूवातीला एकतर्फी वाटणरी ती कुस्ती क्षणार्धात बदलली आणि एका मराठी मुलखातल्या एका ठेंगण्या पोरान त्या बलदंड पंजाब्याचा कोल्या केला होता सारा आखाडा स्तब्ध होता कारण तो पंजाबी पैलवान मातीवर आदळल्यावर माती फाकली होती आणि यावर कळस म्हणुन की काय ती लुसलुशीत देहाच्या आणि गोऱ्यापान बाईन त्या मराठमोळ्या पोराला आपल्या मिठीत घेतलं होतं .सगळीकड आरोळ्या उठत होत्या त्या मेमसायेबीनीण त्यांना त्या काळात १६ रू.बक्षिस दिलं आणि मिरवणूक काढली.
पण अरे हो या सगळ्या नादात त्याच नाव सांगायचं राहिलं त्याच नाव भिमाजी शिंदे सगळे त्यांना भिमशा वडारी म्हणतात.पुढे अनेक वर्ष त्यांनी लाल मातीची सेवा केली.अनेकांना पैलवान केलं. अखेरच्या काळात बैलानं त्यांची मांडी फाडली होती तरी त्यांनी ते सहज पचवल कदाचित ते बैलाला देखिल म्हणाले असतील ,
'थांब तुझा कोल्याच करतो!'
✍सोनबाराजे तथा हर्षद रमेश हांडे देशमुख
#क्षत्रियबाणा
मार्गदर्शन:- दत्तात्रेय मुरलीधर बेंद्रे
#पैलवानांच_आंबळे
No comments:
Post a Comment