Tuesday, 25 May 2021

दिनकरराव संकपाळ

#शिक्षकांच्या_गावचा_शिल्पकार

मी ज्या शाळेत शिकलो त्या आमच्या गावातील प्राथमिक  शाळेची इमारत एकाच रेषेत सलग ७ वर्गखोल्या असणारी होती आणि बरोबर मध्ये मुख्याध्यापक कार्यालय होतं आणि त्याला पुर्व पश्चिम अशा दोन्ही बाजुला दारं होती.आणि त्यातल्या पुर्वेकडच्या दरवाजावर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा फोटो लावलेला होता आणि त्याखाली लिहिलेलं होतं श्री.दिनकर ज्योतिबा संकपाळ (माजी मुख्याध्यापक) यांजकडुन.
आता तिथं त्या जागेवर ते कार्यालय राहिलं नाही कारण ती इमारत कधी ना कधी पडणार होती  मात्र त्या फोटोत असणाऱ्या आणि फोटो लावणाऱ्या दोन्ही व्यक्तींच कार्य हे अमुर्त स्वरूपातलं आहे त्यातल्याच दिनकर गुर्जी अर्थात दिना मास्तर यांच्या कार्याचा घेतलेला संक्षिप्त परिचय.सर्वत्र दुष्काळी आणि मागास समजल्या जाणाऱ्या शिरुर तालुक्यातील आंबळे या गावात एका शेतकरी कुटुंबात दिनकर गुरूजींचा जन्म झाला. उत्तम शेती मध्यम धंदा आणि कनिष्ठ नोकरी असा एक समज जनसामान्यात रूजला होता.अशा परिस्थितीत देखिल या आंबळे गावात एक 'जिजाऊ' होती आणि योगायोग म्हणजे खरोखरच त्या मातेच नाव जिजाबाईच होत.शिकुन काय मास्तरकी करायची का ?असा हीन सवाल त्यावेळी विचारला जात असत. अशा वेळी देखिल आपल्या मुलाला शिकवण्याचा विडा त्यावेळी मातोश्रींनी उचलला आणि खरा करून दाखवला.आणि त्यावेळेस काही ४-५ बहुजन मंडळी  संपुर्ण शिरुर तालुक्यातुन शिकली त्यातले एक म्हणजे दिनामास्तर.त्यांच वर्णन करायच म्हणजे फाटकं पण स्वच्छ धोतर ,काखेत  पटका आणि पायी प्रवास तो ही इतका की आंबळे ते तळेगाव रोज ३० किमी ही त्यांची ओळख.सुरूवातीला पाटस मग शिरुरचं पंजाब समजलं जाणाऱ्या मांडवगणमध्ये आणि नंतर संपुर्ण आयुष्य कर्मभुमी आणि स्वभुमी असणाऱ्या आंबळे या गावात.पण आंबळ्यात जिल्हा लोकल बोर्डाची शाळेसाठी स्वतंत्र इमारत न्हवती कुठं धर्मशाळा, मुरली पाटलाचा वाडा ,चावडी मारुती मंदीर इ. ठिकाणी वर्ग भरत असे.मात्र विद्यार्थ्यांची उपस्थिती नगण्य होती कारण शेतीच्या कामांना प्रथम प्राधान्य असायचं.परंतु दिनामास्तर इराद्याचे पक्के होते त्यांनी विद्यार्थी संख्या वाढवण्याच्या हेतुने नाना तऱ्हेचे प्रयत्न केले. अगदी पोऱ्ह गुराकडं तर दिनामास्तर गुरांकडं! विद्यार्थ्यांची जित्राबं स्वतः वळली आणि आणि पोरांना शाळेत पाठवलं तर कधी पोरांना उचलून शाळेत आणत मग पोरांनी नाकानं सदरा भरवला तरी बेहत्तर .मग त्यांना शाळेत बसवण्यासाठी कुठं खडीसाखर ,फुटाणं आणि रेवड्या यांच आमिष दाखवणं इ.गोष्टी चालायच्या.अस करून करून सुरवातीला त्यांनी ६ शिक्षक घडवले आणि नंतर सर्व एकुण मिळुन तब्बल ८०!८० पोरांना त्यांनी त्यावेळच्या भाषेत मास्तर केलं.आंबळं मास्तरांच गाव म्हणुन प्रसिद्ध झालं. पोरांचा घरी अभ्यास होत नसे म्हणुन रात्रशाळा सुरू केली . आंबळं खरं तर पैलवानांच गाव होतं पण दिनामास्तरांनी गावाला मनगटाबरोबर लेखनीची ताकद दाखवुन दिली.आंबळ्यात अगदी आमदार पोपटराव कोकरे ,आंदु महाराज आणि विठ्ठलभाऊ जगदाळे यांनी शिक्षण घेतलं.त्यावेळेस इतरत्र कुठंही आसपास शाळा न्हवती.नंतर त्यांना जिल्हा लोकल बोर्डाने attendance ऑफिसर नेमल पण त्यांचा मुळ पिंड शिक्षकाचा होता आणि पुन्हा तळेगावला शिक्षक म्हणुन नियुक्त झाले.शिक्षक असताना स्वत: शाळा झाडुन घेत असत .त्यांना शिक्षणाचा खरा अर्थ समजला होता आणि शिक्षण क्षेत्रात काम करताना निरपेक्ष पद्धतीने काम करत होते, आंबळे गावात हायस्कुल व्हावं म्हणुन स्वतःची २४ एकर जमीन शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाला द्यायला तयार झाले होते , अगदी विद्याधाम प्रशालेच्या बांधकामावेळी सुद्धा दगडी वाहुन नेण्यात सिंहाचा वाटा दिनामास्तरांचा होता.मी वर उल्लेख केलेल्या शाळेचं बांधकाम त्यांनी १९४८ साली दत्तोबा पाटील निंबाळकर यांच्या मदतीन पुर्ण केल.त्यांच्या कार्याच वर्णन करत असतना माझे शब्द तोकडे पडतायेत कारण त्यांच कार्य इतकं मोठं आहे की ते शब्दात व्यक्त करू शकत नाही मात्र या माध्यमातुन त्यांच्या कार्याची उजळणी करु शकतो. 

दिनामास्तर निवत्त झाल्यानंतर आंबळे गावचे १० वर्षे बिनविरोध सरपंच होते आणि जिल्हा परिषदेची निवडणुक देखिल त्यांनी लढवली होती मात्र शिक्षकांच्या गावचा शिल्पकार याखेरीज दुसरं वर्णन त्यांच होऊ शकणार नाही.

✍️ सोनबाराजे तथा हर्षद रमेश हांडे देशमुख.

टीप: ग.ह.पाटील नामक व्यक्तीने देखिल त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन तो एका शैक्षणिक अंकात प्रसिद्ध देखिल केला आहे मात्र तुर्तास तरी तो माझ्या वाचनात नाही.

No comments:

Post a Comment

हांडे देशमुखांच्या शोधात

मला जसं जसं कळु लागलं तसं तसं माझे आजोबा कै. दादाराव हे मला आमच्या घराण्याविषयी ,घराण्यातील चालीरितींविषयी माहिती देत असायचे. गावातील मंडळी ...