मनाली......देवदार झाडांच्या गर्दीत बर्फाचा शालु नेसलेलं ,तिबेटच्या अगदी जवळच अन् समुद्रापासुन कितीतरी उंच असलेल एक छोटं टुमदार शहर.गेल्या फेब्रुवारीतील शेवटच्या आठवड्यात निसर्गरम्य शहराला भेट देण्याचा सुवर्णकांचन योग आला तो आमच्या महाविद्यालयाच्या सहलीमुळे ,कसतरी चालढकल करत ,शिक्षकांच्या रेट्यामुळे आम्ही सहलीला जायला तयार झालो.सुरवातीला मी सहलीला जायला उत्साही न्हवतो पण कसाबसा झालो तयार आणि एकदाची महाविद्यालयीन जीवनातली पहिली सहल निघाली.
आम्ही आमचा प्रवास पनवेलपासुन रेल्वेने सुरू केला तो थेट दिल्ली गाठे पर्यंत.आयुष्यात पहिल्यांदाच दिल्ली पाहिली अन् हायसं वाटल जिथुन देशाची सुत्र हालतात ते ठिकाण पाहण्यात काही वेगळाच अभिमान होता.दिल्लीत पोहचल्यावर आम्ही दिल्लीच वर वर दर्शन घेतलं अन् दुसऱ्या दिवशी नट्टापट्टा करून चंदीगडच्या दिशेने प्रवास सुरू केला.त्या दिवशी दिल्लीच तापमान ६° सेल्सिअस होतं.आम्ही आमची गरम कपडे परिधान करून बस मध्ये बसलो.दिल्ली-चंदीगड हायवेवरून जोरदार वेगाने मार्गक्रमण करत होतो,तेव्हढ्यात वाटेत देशाच्या राजकारणात तीनदा बदल घडवुन आणाणार पानिपत लागलं आणि इतिहासाची आठवण झाली.आजच्या समृद्ध हरियाणाला असा रक्तरंजित इतिहास असेल आज कुणालाही वाटणार नाही.सगळीकडे हिरवीगार शेती,मोठमोठी रेस्टॉरंट्सने संपुर्ण हायवे व्यापुन टाकला होता.चंदिगडला पोहचायला उशिर झाल्यामुळ रॉक गार्डनचा फेरफटका टाळुन आम्ही थेट पिंजोरा गार्डनला पोहोचलो,तिथुन गगनचुंबी पर्वत सहज दिसत होते आणि आम्ही बर्फाच्या जवळ आल्याचे जाणवु लागले होतं.२-३ तास मनमुराद भटकल्यामुळे आम्हाला निघायला उशिर झाला होता ,कसंबसं दिवस मावळायच्या वेळी आमची गाडी हालली
आमच्या दोन बस होत्या.एक साऊंडवाली अन् दुसरी बिनासाऊंडची त्यावरून पोरापोरींच्यात भांडण होत होती.आमची गाडी हळुहळु घाट चढु लागली अन् आमचा शिमल्या दिशेने प्रवास सुरू झाला.रात्री ११ वाजता आम्ही शिमल्यात पोचलो. अन् हाड गोठणं म्हणजे काय ते जाणवलं ,शिमल्यात जणु थंडीची लाटच पसरली होती.आम्हाला झोपायला १ वाजले ,रूममध्ये गेलो तर अस वाटली गादीत बर्फ घालुन ठेवलाय ,जसं आपण बर्फाच्या पिशवीत ठेवतो तसा.पाणी प्यायच ते फक्त गरमच कारण गार पाणी तिथ न्हवतच होता तो फक्त बर्फच.एका रूममध्ये ३ पोरं, झोपायला पलंग एक त्यामुळ एकमेकांच्या ऊबीनं कसबस झोपलो म्हणायच तर रात्र काढली.सकाळी उठल्यावर सकयगळ्यांनी एकच केला ये रणछोडदास चांचड कहा रहते है?.आम्ही शिमल्यातुन २५ किमी दुर असलेल्या कुफ्रीच्या हिलस्टेशनकडे.तासाभरानंतर आम्हा कुफ्रीला पोचलो.तिथल्या लोकांशी चर्चा केली .अन सुमो गाडीने वर गेलो तिथुन परत खेचरांवरून निसरड्या वाटेने बर्फाळ पर्वताचा प्रवास फार गमतीशीर होता.कुफ्रीत नवीनच विवाहबंधनात अडकलेली मराठी नवदाम्पत्य मधुचंद्राच्या निमित्ताने आलेली पहायला मिळाली.तिथल्या स्थानिकांनी त्यांना जरा जास्तच लुटण्याचा डाव आखला होता.आमच्या 'जय महाराष्ट्र' अन् 'हर हर महादेवच्या' घोषणांनी
ते सहज आमच्याकडे आकर्षित होत होते व आमची आपुलकीने चौकशी करत होते.आमच्या बरोबर आमच्या वर्गमैत्रिणी थंडीमुळे अधिक गुलाबी पडल्या होत्या ,त्यांच रुपडं अधिकच देखण दिसु लागलं होत.त्यात अचानक तिथ हिमवर्षाव सुरू झाला अन् सर्वांची तारांबळ उडाली ,सगळी मंडळी पटापट गाडीकडे पळु लागली ,तासाभरात सगळी गोळा झाल्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या शिमल्यातील लॉजवर जाऊन विसावलो .
आज माझ्या शरिरात मला ताप जाणवु लागला होता.मी एक गोळी खाऊन झोपण्याचा प्रयत्न केला.सकाळी लवकरच आवरून आम्ही मनालीच्या दिशेने कुच केली.शिमला ते मनाली अंतर होत फक्त २५० किलोमीटर ,सगळा रस्ता घाटाचा दोन पदरी तरी काहीतरी नॅशनल हायवेचा नंबर होता.तिथल्या घरांच्या रचना पाहून हसु यायचं अन पार्किंगची व्यवस्था पाहून कींव ,कशी काय लोक इथं राहतात हा प्रश्न पडायचा !! खळखळणारं पाणी ,कोसळलेल्या दरडी ,वेडेवाकडे रस्ते अन् एकमेकांची पापडयुक्त चेष्टा करत आमचं मार्गक्रमण सुरू होतं ,२५० किलोमीटरच फार थोड वाटणार अंतर आमच्या सहनशक्तीचा कस पाहत होतो.तब्बल बारा तासांचा प्रवास करून आम्ही मनालीत पोचलो.मनालीतल्या हॉटेल मध्ये अंगावर घ्यायला गादीसारखं कापड होतं सुरूवातीला मला ती गादीच वाटली त्यामुळ माझ थोडं हसुच झालं.पण दुसऱ्या दिवशी मनाली पाहणार असल्यामुळ सगळ विसरून गेलो. पाहतोतर काय आमच्या खोलीच्या बालकनीत देखील बर्फ होता.आम्ही सुमो गाडीत बसून बर्फाळ वाट काढत वशिष्ठ मुनींच्या मंदिरात,सप्तताऱ्यांपैकी एक ,कितीतरी घराण्यांचे गोत्र असलेले अन् रघुकुलभुषण प्रभु रामचंद्राचे गुरू असलेले वशिष्ठ मुनी तिकड का गेले कुणास ठाऊक पण भक्तांच्या अंघोळीची सोय मात्र केली ती गरम पाण्याच्या झऱ्याच्या माध्यमातुन.नंतर आम्ही मार्गस्थ झालो ते मनालीची राणी हिडिंबादेवीच्या मंदिराकडे ,बी.आर.चोपडा साहेबांच्या मालिकेत पहिल्यांदा हिडिंबाच नाव ऐकल होत.मंदिराच्या चारही बाजुला याकची शिंग लटकवलेली होती.मंदिरात हिडिंबादेवीचा पायाचा मोठा ठसा होता.बाहेर आल्यानंतर घटोत्कचाचे मंदीर होते .त्याच दर्शन घेऊन मनालीच निसर्ग सौंदर्य न्याहाळत आम्ही पुन्हा हॉटेलवर आलो.परत मागं फिरण्याचा दिवस आला होता.पण मन त्याला राजी होत न्हवत कसबस आम्ही मनावर ताबा ठेऊन परतीच्या प्रवासाला लागलो अन् चंदीगढवरून रेल्वेने घरी परतलो.३ वर्षात कुणात कधीही न मिसळणारा मी आज माझ्या वर्गमित्रमैत्रिणींचा होऊन गेलो होतो.
आणि ठरवल होतं परत पाच वर्षानी मी इथ येणार म्हणजे येणार!!!!
धन्यवाद
सोनबाराजे उपाख्य हर्षद रमेश हांडे देशमुख