Sunday, 8 August 2021

हांडे देशमुखांच्या शोधात



मला जसं जसं कळु लागलं तसं तसं माझे आजोबा कै. दादाराव हे मला आमच्या घराण्याविषयी ,घराण्यातील चालीरितींविषयी माहिती देत असायचे. गावातील मंडळी माझ्यासकट आमच्या कुटुंबातील व्यक्तींना 'राजे' या नावाने संबोधत असत.त्यामुळे मला सुरूवातीपासुन या गोष्टीबद्दल कुतुहल आणि  वाटत होता. त्यामुळे या सर्व ऐतिहासिक गोष्टीत मला रुची होती. या गप्पा सुरू झाल्या की आपोआप माझे कान टवकारले जात.
             आमचे आजोबांनी मला सांगितलेल्या गोष्टी,
"शिरुर तालुक्यातील कर्डे हे आमचं मुळगाव. तिथं आज ज्या जागी हायस्कुलची इमारत उभी आहे त्याजागी आमची गढी होती. गढीत मुंजाबा, जेवत्या आणि मारूती अशा देवतांची मंदिरे होती.त्याचबरोबर पाण्यासाठी आड , कैद्यांना डांबुन ठेवण्यासाठी तळघरे देखिल होती. आमचे पणजोबा कै.कोंडीरामराजे यांना विजयादशमीच्या वेळी शमीपुजनाचा मान असायचा.सन १९५२ पर्यंत आमच्या कुटुंबाला पेन्शन मिळत होती.मावळात गेल्यावर पहिल्या पाटाचा मान हांडे देशमुखांना आहे." 
            या सर्व गोष्टी ऐकल्यामुळे माझ्या मनाला सतत उत्सुकता असायची आपण कोण आहोत ? कुठुन आलो? आपल्या पुर्वजांनी नेमकं काय केलं? याचा शोध घेण्यासाठी वृद्ध व अनुभवी व्यक्तींच्या संपर्कात रहायचो.माझ्या वडिलांच्या जन्मापासून आम्ही मौजे आंबळे गावी वास्तव्य करून आहोत. तिथे आमचा ३६० बिघे म्हणजेच २०८ एकर जमीन देशमुख इनाम आहे. त्याला आजही इनाम या नावाने संबोधतात. थोड्या कळत्या वयात आल्यानंतर मी त्याची कागदपत्रे तहसिल कार्यालयातुन मिळवली.पण मला हवी तशी माहिती मिळत न्हवती. त्याच काळात माझ्याकडे 'स्मार्टफोन' आला , एकप्रकारे संपुर्ण जग माझ्या हातात आलं होतं. जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा तेव्हा मी गुगलवर 'हांडे देशमुख' इंग्रजीत कधी  मराठीत शोधत होतो.त्यात मला दोन ठिकाणी संदर्भ मिळाला.त्यातल्या एकात पेशवे दफ्तरातुन माहिती मिळाल्याचा उल्लेख होता. पुन्हा इंटरनेटवर पेशवे दफ्तर शोधलं. तिथं गेल्यानंतर मला जी माहिती त्यातुन मी योग्य रस्त्यावर असल्याचं जाणवलं.हे साल होत २०१६.मी नुकताच १२ वी पास होऊन प्रथम वर्षात गेलो होतो.
माझा आणि मोडी लिपीचा परिचय लहानपणापासूनच होता परंतु आता कागदपत्रांमुळ मोडीची गोडी लागली होती. मी मोबाईल च्या माध्यमातून मोडी शिकलो.आणि त्याच दरम्यान फेसबुकच्या माध्यमातून विविध व्यक्तींशी माझा परिचय झाला. त्यांची मला मोठ्या प्रमाणात मदत झाली. श्री संतराज बापु साठे यांच्यामुळे पारसनीस कृत 'सनदपत्रांतील माहिती' या पुस्तकातील हांडे देशमुख कैफियत वाचणात आली आणि बरेच मार्ग मोकळे झाले. आतापर्यंत मिळालेले धागे दोरे जुळु लागले. मला सर्व हांडे देशमुख भावकी एका छताखाली आणायची होती सर्वांचा एकमेकांशी परिचय करून द्यायचा होता. पण संधी मिळत न्हवती. पण त्यात पुणे येथे शिवजयंती निमित्त भव्य कार्यक्रम होतो आणि तिथं ऐतिहासिक घराण्यांचे रथ समाविष्ट होतात हे कळलं. दुसरीकडे मी फेसबुक वर दिसेल त्या हांडे, देशमुख आणि हांडे देशमुख व्यक्तीला रिक्वेस्ट पाठवत होतो. ते माझ्याशी जोडले जात होते. शिवजयंती ला आपल्या घराण्याचा रथ समाविष्ट करायचा हे मनाशी पक्कं केलं आणि सर्व हांडे देशमुख बांधवांच्या अहोरात्र मेहनतीनं साकार झालं. परंतु मी माझ्या शोधात अजुन होतो काय करू? काय नको करू ? हे प्रश्न मला पडत होते. शेवटी मी पुणे पुरालेखागार येथे अभ्यास करण्याची परवानगी मिळवली.तिथुन अनेक रुमालांमधील कागद हाताळले आणि अजुन हाताळायचे बाकी आहेत. तरी वरील जवळपास ५-६ वर्षाच्या काळात थोडी माहिती माझ्याकडे गोळा झाली आहे ती खालीलप्रमाणे

" जुन्नर तालुक्यातील उंब्रज हे हांडे परिवाराच मुळगाव. तिथला एक पुरूष देवराव हांडे याने तलवारीच्या जोरावर देशमुखी मिळवली व मौजे नळवणे ता.जुन्नर या गावी कोट बांधुन देशमुखी करू लागला.नळवणे येथेच आमचे कुलदैवत श्री मार्तंड यांचे देवालय आहे. या देवराव हांडे देशमुख याने 'पातशहाची पिछाडी मारली व मालकावर वार केला' अशा प्रकारचा उल्लेख वंशावळींमध्ये आहे. देवराव हांडे देशमुख यांच्याबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. इ.स. १६५७ साली औरंगजेबाचा सरदार मुर्शीदकुलीखान याने जाखोजी हरजी हांडे देशमुख यांना जुन्नर सरकारमधील १७ तरफांतील ३५९ गावची देशमुखी दिल्याचा उल्लेख आहे. छत्रपती शाहु महाराज यांच्या काळात देखिल रायाजी हांडे या लढाऊबाण्याच्या व्यक्तीचा उल्लेख आढळतो. सन १८१८ साली हांडे देशमुख घराण्याकडे ५६२ गावची देशमुखी असल्याचे संदर्भ आहेत आणि ती पुणे , नगर व नाशिक जिल्ह्यात आहेत. त्याचबरोबर मौजे उंब्रज ,मौजे पिंपळगाव जोगा व मौजे रिसे येथील पाटिलक्या हांडे घराण्याकडे होत्या. त्याचबरोबर जुन्नर ,करडे व पुणे पुरालेखागार येथुन वंशावळी प्राप्त झाल्या आहेत.त्यानुसार माझ्यापर्यंत २४ पिढ्यांची वंशवेल उपलब्ध झाली आहे. मौजे नळवणे येथे देवराव हांडे देशमुख यांची समाधी आहे.तसेच पारनेर व पळवे येथे देखिल समाध्या आहेत"

ही माहिती टाकण्याचा उद्देश असा की अजुनही माझा शोध संपलेला नाही.मला तुमच्या सर्वांच्या मदतीची व मार्गदर्शनाची  गरज आहे.

तुम्ही ही पोस्ट वाचली असेल तर कृपया शेअर करा!

✍️ हर्षद रमेश हांडे देशमुख 
मो.नं.८२०८५०९१५५

फोटो- १) देवराव हांडे देशमुख समाधी
            २) हांडे देशमुख वंशवेल
            ३) गणपतराव रामचंद्र हांडे देशमुख सरकार जुन्नर

Tuesday, 25 May 2021

तुकाराम बापु

आंबळ्याचा ९० वर्षाचा तरूण पैलवान!💪

 

त्याकाळी आंबळे गाव हे असं गाव होतं जिथं एकही व्यक्ती असा न्हवता की ज्यानं अंगाला कधी लंगोट लावला न्हवता ,खायला चटणी भाकरी का असंना पण कुस्ती करणार ते म्हणतात ना डीएनए वगैरै तोच पैलवानकीचा डिएनए आंबळे करांच्या रक्तात  होता.मी मागं सांगितल्याप्रमाणे पैलवानकीची ही गाथा सुरू होते ती थेट ६-७ पिढ्या पुर्वी पासुन म्हणजे कै.भगाजी बेंद्रे यांजपासुन!

 

तर एकदा काय झालं , इंग्रजांचा काळ होता ,असेल १९०० च्या आसपासचा या भगाजी बेंद्रेंना अटक करण्यासाठी घोडनदीवरून पोलीस आले होते. पण अटक कशासाठी करणार होते त्याच कारण मात्र मला माहित नाही.पोलीस आले मग त्यांनी चौकशी केली आणि भगाजींना म्हणाले "चला", भगाजी म्हणाले" थांबा गणसपट्टीवरून हुरडा खाऊन जाऊ" गावात गणेशपट्टी नावाचे शेत आहे.तिथं हुरडा खाल्ला भगाजी बेंद्रे जायला निघाले मात्र पोलीस म्हणाले " बेड्या घालाव्या लागतील" भगाजी म्हणाले"आवं, काय बी उप्योग नाही त्याचा" तरी त्यांनी बेड्या घातल्या आणि भगाजींनी त्या साधा जोर लाऊन कडकड मोडल्या ! एव्हढी ताकद त्यांच्या शरिरात होती .शिरुर तालुक्यात त्यांना तोड नव्हती.

 

आज आपण भगाजींच्या नातवाची गोष्ट सांगणार आहे आज त्यांचा नातु फक्त ९० वर्षांचा आहे. पै.तुकाराम कोंडीबा बेंद्रे हे त्यांच नाव पण सगळे त्यांना तात्या किंवा बापु म्हणतात.कै.पंढरीनाथबुआ,कै.दत्तुभाऊ,कै.आनंदराव अण्णा , कै.बबन नाना आणि तुकाराम बापु हे एका पिढीतील पैलवान .सायकलीवरून आखाडे करणारे ते पण एकाच दिवशी तीन -तीन आखाडं असा त्यांचा शिरस्ता असायचा. असं म्हणतात की तुकाराम बापु जेव्हा दंड मारत तेव्हा त्यांच्या पाठीची दोन हाडं एकमेकांना चिटकायची तेव्हा टॉक टॉक असा आवाज यायचा.खाली तुम्ही फोटोत पाहताय तसा त्यांचा पाठीच्या आणि छातीच्या मधला भाग वरवंट्यासारखा तर छाती पाट्यासारखी मजबुत होती. १९५६ साली सुरत येथे तत्कालीन मुंबई राज्य चॅम्पियन ना त्यांनी पाडलं होतं.किस्से मात्र त्यांच्या आखाड्यातल्या कुस्त्यांचे सांगितले जातात .

 

एकदा न्हावरे येथे आखाडा होता.सांगली जवळच्या विटा वरून 'नामा' नावाचा नामवंत पैलवान त्याच्या पठ्ठ्याला घेऊन आला होता.बराच वेळ त्याला जोड मिळत न्हवती खरं सांगायच तर पैलवान त्याला घाबरत होते.मात्र तुकाराम बापुंनी हिम्मत केली आणि समोरच्या राक्षसासारख्या दिसणाऱ्या पैलवानांना त्यांनी क्षणार्धात दुहेरी पट टाकुन गारद केलं.गावकऱ्यांनी त्यांची मिरवणूक काढली.तेव्हापासुन तुकाराम बापुंना लोक 'दुहेरी पटाचा बादशाह' म्हणु लागले.१९५१ ते १९६० हा बापुंचा ऐन उमेदीचा होता.मात्र आज वयाच्या ९० व्या वर्षी देखिल त्यांचा उत्साह तरुणाला लाजवणारा आहे. आजही तालमीत आल्यानंतर त्यांनी घातलेली पकड सहजासहजी सुटत नाही.पैलवान हा आजिवन पैलवानच असतो हे बाप्पुंनी दाखवून दिलंय.

एखाद्याच्या घरात चार पिढ्या पैलवानकी चालली की कायम टिकते आज त्यांच्या घरातील लागोपाठ पाचवी पिढी तालमीत घाम गाळताना दिसत आहे. हे बापुंच्या कष्टाचे फळ आहे असं म्हणावं लागेल.आंबळे गावच्या पैलवानांची कहाणी म्हणजे आंबळे गावची वैभवगाथा आहे.

 

क्रमशः

 

✍ सोनबाराजे तथा हर्षद रमेश हांडे देशमुख.

#क्षत्रियबाणा

 

कै.पंढरीनाथ बुआ यांची कहाणी:

 

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2646807772235014&id=100007174505257

 

#पैलवानांच_आंबळे

#तुकारामबापु

भिमाजी शिंदे

#आणि_तीने_त्याला_मिठीच_मारली..... 
 
हे शिर्षक वाचुन तुम्ही जरा गडबडला असाल नाहीतर मनात आलं असंल की दादारावचा नातु बावचाळला काय ? पण तसं काही नाही हा प्रोपगंडाही नाही आणि मी पुर्ण शुद्धीत आहे .आश्चर्य वाटेल पण ही गोष्ट देखिल एका पैलवानाची आहे. हो !पैलवानाचीच तुम्ही बरोबर वाचलय. 
 
इंग्रजांचा काळ होता. साधारण १९२०-३० च्या काळात या पैलवानाचा सुवर्ण काळ होता.तस या पैलवानाच कुटुंब गुलबर्गा जिल्ह्यातील शाबाजवाडीच.पण पोटापाण्यासाठी आंबळ्यात आले आणि इथंच स्थायिक झाले.वडार समाजातील कुटुंब होतं.दगडी फोडली तरच भाकर तुकडा मिळत होता.अशा परिस्थितीत देखिल त्या कुटुंबानी  आपल्या पोराला पैलवान करायचं ठरवलं 
 
आणि केलं सुद्धा आणि असं केलं की ज्याचं नाव ते थोडक्यात बाहुबली! पण देह उगं बारका साधा ५ फुट पण नसंल. काळं कुट्ट शरीर पण ताकद हे अफाट आणि गोटीगत शरीर हे दगडावानी .असं म्हणतात की बेंबीत तेल सोडलं तरी वाटीभर तेल बसायचं आणि वडाऱ्याच काम करायला लागला की हत्ती एव्हढाले दगड एकटा फोडायचा‌.हातावरल पोट अन् निऱ्ह दुधाचा खुराक तरी एव्हढी प्रगती की जुन्नर खेड पासुन ते थेट कडा आष्टी पर्यंत नाव झालेल. अजुनही म्हणतात की असा पहिलवान होणे नाही 
 
एव्हढी त्यांनी जबर पगडा बसवला होता 
 
त्यात त्यांची एक कुस्ती फार गाजली ती देखील इंग्रजांच्या काळातील.त्यावेळी इंग्रज अधिकाऱ्यांचा भारतीय जनतेवर बऱ्यापैकी वचक होता.गांधीजींचे विचार तळागाळात पोचले न्हवते त्यामुळे रयत इंग्रजांना घाबरून असतं त्यामुळे तसा तो बर्यापैकी शांततेचा काळ होता. सासवड या ठिकाणी आखाडा भरला होता.आणि त्या काळात स्पर्धा कमी असल्यामुळे आखाड्यांना मान होता.त्याच आखाड्यात एक पंजाबी पैलवान आला होता त्याला जोड सापडणं कठीण होत 
 
पण या पैलवानाला जोड दिली ते आंबळ्याच्या वडार समाजातील या ठेंगण्या पोरान.लोकांना कुस्तीचा निकाल स्पष्ट दिसत होता तो पंजाबी सहज कुस्ती मारणार हे स्पष्ट होत. पण आंबळ्याचा हा गडी मात्र अंगावर वाघाचे पट्टे काढुन हे आख्ख्या आखाड्यात कोलांट्या मारीत होता.आखाडा पहायला अफाट गर्दी झाली होती कारण तो आखाडा पहायला इंग्रजांची कुठलीतरी बाई आली होती. तीला मेमसायेब का काहीतरी म्हणत असत कारण तसा तीचा दर्जा वरच्या स्तराचा होता.आजही आखाड्यात सहसा महिला येत नाहीत तर त्या काळातल्या लोकांना तोंडांत बोट घालण्याजोगी गोष्ट होती. 
 
कुस्ती सुरू झाली, मात्र सुरूवातीला एकतर्फी वाटणरी ती कुस्ती क्षणार्धात बदलली आणि एका मराठी मुलखातल्या एका ठेंगण्या पोरान त्या बलदंड पंजाब्याचा कोल्या केला होता सारा आखाडा स्तब्ध होता कारण तो पंजाबी पैलवान मातीवर आदळल्यावर माती फाकली होती आणि यावर कळस म्हणुन की काय ती लुसलुशीत देहाच्या आणि गोऱ्यापान बाईन त्या मराठमोळ्या पोराला आपल्या मिठीत घेतलं होतं .सगळीकड आरोळ्या उठत होत्या त्या मेमसायेबीनीण त्यांना त्या काळात १६ रू.बक्षिस दिलं आणि मिरवणूक काढली. 
 
पण अरे हो या सगळ्या नादात त्याच नाव सांगायचं राहिलं त्याच नाव भिमाजी शिंदे सगळे त्यांना भिमशा वडारी म्हणतात.पुढे अनेक वर्ष त्यांनी लाल मातीची सेवा केली.अनेकांना पैलवान केलं. अखेरच्या काळात बैलानं त्यांची मांडी फाडली होती तरी त्यांनी ते सहज पचवल कदाचित ते बैलाला देखिल म्हणाले असतील , 
 
'थांब तुझा कोल्याच करतो!' 
 
✍सोनबाराजे तथा हर्षद रमेश हांडे देशमुख 
#क्षत्रियबाणा  
मार्गदर्शन:- दत्तात्रेय मुरलीधर बेंद्रे 
#पैलवानांच_आंबळे

शिवाजी पवार (गोपाळ)

#खालील_चित्रात_दिसणारी_गदा_साधीसुधी_नाही

गदा म्हंल की आपल्यासमोर येतो तो राभभक्त हनुमान आणि महाबली भीम अर्थात गदा म्हणजे ताकदीचं चिन्ह.कुस्ती क्षेत्रात गदेला फार महत्व आहे.आज वेगवेगळ्या स्पर्धांमधल्या गदा फार मानाच्या समजल्या जातात.
खालील फोटोत दिसणारी गदा देखिल अशीच मानाची गदा आहे.पुर्वी आंबेगाव तालुक्यातील अवसरी या गावात आखाड्यात ही गदा बक्षीस म्हणुन ठेवली जात होती.पण तीला जिंकणं फार अवघड होत कारण तीला जिंकण्यासाठी अट फार अवघड होती.ती अशी की जो पहिलवान सलग तीन वर्ष निकाली कुस्ती करील तो ती गदा जिंकणार होता.परंतु गेली ५० वर्ष ती गदा अजिंक्य होती.

एक दिवस असा आला की सलग दोन वर्ष एक पैलवान निकाली कुस्ती केली होती तोच गदा नेणार अशी चर्चा होती.पण त्याच वर्षी आंबळ्याच्या पैलवानांचा चमु अवसरीत आला होता आणि आंबळेकरांना अशीच संधी हवी होती.आतापर्यंत आंबळ्यात कुणी गदा आणली न्हवती कारण दुष्काळी परिस्थिती होती लोकांना आणि पैलवानांना सुद्धा मानपानापेक्षा पोटापाण्याचा प्रश्न महत्वाचा होता.पण यंदा गदा जिंकण्यासाठी सुवर्ण संधी चालून आली होती.

आंबळे करांनी शिवाजी पवार नावाच्या पैलवानाला उतरवण्याचा निर्णय घेतला आणि गेली दोन वर्षे सलग जिंकणाऱ्या पैलवानाला चितपट केलं.दुसऱ्या वर्षी परत आखाडा भरला पुन्हा एकदा शिवाजी पवारांनी कुस्ती निकाली केली.आता गावकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या मात्र शिवाजी पवारांची आर्थिक परिस्थिती ढासळली होती त्यात लग्न झालं होत म्हणुन उदरनिर्वाहासाठी गाव सोडलं होत पण त्यांचे बंधु संभाजी पवार यांनी प्रयत्न करून परत गावात आणलं ,शेवटचे दोन महिने राहिले असताना परत तयारी केली आणि सलग तिसऱ्या वर्षी कुस्ती निकाली केली.५० वर्षांचा इतिहास बदलला ,शिवाजी पवार इतिहासकर्ते झाले आणि त्यांनी आंबळे गावासाठी पहिली गदा आणली.आणि त्यांनी ती स्वत: साठी न ठेवता श्री नाथसाहेब चरणी अर्पण केली कारण त्यांनी देवाला सांगितलं होत की जर मी गदा जिंकली तर तुझ्या चरणी अर्पण करील.दरवर्षी जेव्हा छबिना निघायचा त्यावेळेस श्री नाथसाहेबांबरोबरच या गदेची देखिल ग्रामप्रदक्षिणा होत असे.
✍️सोनबाराजे तथा हर्षद रमेश हांडे देशमुख.

 
#पैलवानांच_आंबळे

दिनकरराव संकपाळ

#शिक्षकांच्या_गावचा_शिल्पकार

मी ज्या शाळेत शिकलो त्या आमच्या गावातील प्राथमिक  शाळेची इमारत एकाच रेषेत सलग ७ वर्गखोल्या असणारी होती आणि बरोबर मध्ये मुख्याध्यापक कार्यालय होतं आणि त्याला पुर्व पश्चिम अशा दोन्ही बाजुला दारं होती.आणि त्यातल्या पुर्वेकडच्या दरवाजावर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा फोटो लावलेला होता आणि त्याखाली लिहिलेलं होतं श्री.दिनकर ज्योतिबा संकपाळ (माजी मुख्याध्यापक) यांजकडुन.
आता तिथं त्या जागेवर ते कार्यालय राहिलं नाही कारण ती इमारत कधी ना कधी पडणार होती  मात्र त्या फोटोत असणाऱ्या आणि फोटो लावणाऱ्या दोन्ही व्यक्तींच कार्य हे अमुर्त स्वरूपातलं आहे त्यातल्याच दिनकर गुर्जी अर्थात दिना मास्तर यांच्या कार्याचा घेतलेला संक्षिप्त परिचय.सर्वत्र दुष्काळी आणि मागास समजल्या जाणाऱ्या शिरुर तालुक्यातील आंबळे या गावात एका शेतकरी कुटुंबात दिनकर गुरूजींचा जन्म झाला. उत्तम शेती मध्यम धंदा आणि कनिष्ठ नोकरी असा एक समज जनसामान्यात रूजला होता.अशा परिस्थितीत देखिल या आंबळे गावात एक 'जिजाऊ' होती आणि योगायोग म्हणजे खरोखरच त्या मातेच नाव जिजाबाईच होत.शिकुन काय मास्तरकी करायची का ?असा हीन सवाल त्यावेळी विचारला जात असत. अशा वेळी देखिल आपल्या मुलाला शिकवण्याचा विडा त्यावेळी मातोश्रींनी उचलला आणि खरा करून दाखवला.आणि त्यावेळेस काही ४-५ बहुजन मंडळी  संपुर्ण शिरुर तालुक्यातुन शिकली त्यातले एक म्हणजे दिनामास्तर.त्यांच वर्णन करायच म्हणजे फाटकं पण स्वच्छ धोतर ,काखेत  पटका आणि पायी प्रवास तो ही इतका की आंबळे ते तळेगाव रोज ३० किमी ही त्यांची ओळख.सुरूवातीला पाटस मग शिरुरचं पंजाब समजलं जाणाऱ्या मांडवगणमध्ये आणि नंतर संपुर्ण आयुष्य कर्मभुमी आणि स्वभुमी असणाऱ्या आंबळे या गावात.पण आंबळ्यात जिल्हा लोकल बोर्डाची शाळेसाठी स्वतंत्र इमारत न्हवती कुठं धर्मशाळा, मुरली पाटलाचा वाडा ,चावडी मारुती मंदीर इ. ठिकाणी वर्ग भरत असे.मात्र विद्यार्थ्यांची उपस्थिती नगण्य होती कारण शेतीच्या कामांना प्रथम प्राधान्य असायचं.परंतु दिनामास्तर इराद्याचे पक्के होते त्यांनी विद्यार्थी संख्या वाढवण्याच्या हेतुने नाना तऱ्हेचे प्रयत्न केले. अगदी पोऱ्ह गुराकडं तर दिनामास्तर गुरांकडं! विद्यार्थ्यांची जित्राबं स्वतः वळली आणि आणि पोरांना शाळेत पाठवलं तर कधी पोरांना उचलून शाळेत आणत मग पोरांनी नाकानं सदरा भरवला तरी बेहत्तर .मग त्यांना शाळेत बसवण्यासाठी कुठं खडीसाखर ,फुटाणं आणि रेवड्या यांच आमिष दाखवणं इ.गोष्टी चालायच्या.अस करून करून सुरवातीला त्यांनी ६ शिक्षक घडवले आणि नंतर सर्व एकुण मिळुन तब्बल ८०!८० पोरांना त्यांनी त्यावेळच्या भाषेत मास्तर केलं.आंबळं मास्तरांच गाव म्हणुन प्रसिद्ध झालं. पोरांचा घरी अभ्यास होत नसे म्हणुन रात्रशाळा सुरू केली . आंबळं खरं तर पैलवानांच गाव होतं पण दिनामास्तरांनी गावाला मनगटाबरोबर लेखनीची ताकद दाखवुन दिली.आंबळ्यात अगदी आमदार पोपटराव कोकरे ,आंदु महाराज आणि विठ्ठलभाऊ जगदाळे यांनी शिक्षण घेतलं.त्यावेळेस इतरत्र कुठंही आसपास शाळा न्हवती.नंतर त्यांना जिल्हा लोकल बोर्डाने attendance ऑफिसर नेमल पण त्यांचा मुळ पिंड शिक्षकाचा होता आणि पुन्हा तळेगावला शिक्षक म्हणुन नियुक्त झाले.शिक्षक असताना स्वत: शाळा झाडुन घेत असत .त्यांना शिक्षणाचा खरा अर्थ समजला होता आणि शिक्षण क्षेत्रात काम करताना निरपेक्ष पद्धतीने काम करत होते, आंबळे गावात हायस्कुल व्हावं म्हणुन स्वतःची २४ एकर जमीन शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाला द्यायला तयार झाले होते , अगदी विद्याधाम प्रशालेच्या बांधकामावेळी सुद्धा दगडी वाहुन नेण्यात सिंहाचा वाटा दिनामास्तरांचा होता.मी वर उल्लेख केलेल्या शाळेचं बांधकाम त्यांनी १९४८ साली दत्तोबा पाटील निंबाळकर यांच्या मदतीन पुर्ण केल.त्यांच्या कार्याच वर्णन करत असतना माझे शब्द तोकडे पडतायेत कारण त्यांच कार्य इतकं मोठं आहे की ते शब्दात व्यक्त करू शकत नाही मात्र या माध्यमातुन त्यांच्या कार्याची उजळणी करु शकतो. 

दिनामास्तर निवत्त झाल्यानंतर आंबळे गावचे १० वर्षे बिनविरोध सरपंच होते आणि जिल्हा परिषदेची निवडणुक देखिल त्यांनी लढवली होती मात्र शिक्षकांच्या गावचा शिल्पकार याखेरीज दुसरं वर्णन त्यांच होऊ शकणार नाही.

✍️ सोनबाराजे तथा हर्षद रमेश हांडे देशमुख.

टीप: ग.ह.पाटील नामक व्यक्तीने देखिल त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन तो एका शैक्षणिक अंकात प्रसिद्ध देखिल केला आहे मात्र तुर्तास तरी तो माझ्या वाचनात नाही.

बाबुराव जी पाचर्णे वाढदिवस

#HAPPY_BIRTHDAY_SAHEB
आपल्या सर्वांना माहित आहे की यशस्वी व्हायचं असेल तर एक गोष्ट फार महत्त्वाची आहे ती म्हणजे सातत्य! मी जेव्हा शिरुर विधानसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तेव्हा त्या सगळ्यात एका व्यक्तीनं आपला वेगळा उमटवल्याच मी पाहिलं ती व्यक्ती म्हणजे आदरणीय लोकनेते बाबुरावजी पाचर्णे.

 सन१९५२ पासुन सन २०१९ पर्यंत एकच उमेदवार असा आहे की ज्याने आतापर्यंत विधानसभेच्या ६ निवडणुका लढवल्यात आणि त्यात विजयी किंवा दुसऱ्या क्रमांकावरील सर्वाधिक मते मिळवणारा उमेदवार ठरलेत.खरतर माझ्या सारख्या आज विशीत असणाऱ्या तरुणांचा जेव्हा जन्म झाला त्याआधी २० वर्ष पाचर्णे साहेबांनी आपला राजकीय प्रवास सुरू केला होता. त्यांचा प्रवास सुरू झाला तो तर्डोबाचीवाडी या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबातुन ! त्यामुळे गरिबी अगदी जवळुन पाहिली.मित्रांबरोबर सायकलवर बसुन शाळेत गेले , दुनियादारी पाहिली.

माझ्या माहितीप्रमाणे ते सरपंच झाले, मार्केट कमिटीचे चेअरमन झाले पण त्यांचं खरं लक्ष्य होतं ते म्हणजे विधानसभा.१९९५ साली अपक्ष उभे राहिले अगदी हातावर मोजण्या इतक्या मतांवरुन पराभव स्विकारावा लागला.टरत १९९७ साली जिल्हा परिषद सदस्य झाले.१९९९ साली पुन्हा विधानसभेला पराभव झाला.पण ते म्हणतात ना "सक्सेस मतलब क्या? Failure के बाद का नया चॅप्टर " असं म्हणण्याची वेळ आली म्हणजे सन २००४ साल उजाडलं . 

१९८० साली पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बाबुराव दौंडकर यांनी लावलेल भाजपाचे  रोपटं कै.संभाजी अण्णा भुजबळांनी मोठं केलं होतं , पाचर्णे साहेबांनी तालुक्यातील जनतेचा भाजप विषयीचं प्रेम ओळखलं आणि त्याच वेळी कै.गोपीनाथराव मुंडे यांच्याशी संपर्क आला आणि २००४ साली पाचर्णे साहेब आमदार झाले. बाबुराव दौंडकर यांनी सुरू केलेंल वर्तुळ हे बाबुराव पाचर्णे यांनी पुर्ण केलं होतं.
या सगळ्यात मला एका गोष्टीचं फार कुतूहल वाटतं शिरुर तालुक्यात असं एक गाव नाही जिथं पाचर्णे साहेबांचा मित्र नाही, हीच गोष्ट त्यांना लोकनेता करते.

राजकीय नेतृत्व म्हणलं की विरोध हा आलाच पण साहेबांचा कुणीही व्यक्तिगत विरोधक नाही ही त्यांची जमेची बाजु आहे.

आज साहेबांचा वाढदिवस आहे साहेबांबद्दल लिहू तेव्हढ कमी आहे तरी माझ्या तर्फे
शिरूर तालुक्याच्या लोकनेत्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

©✍ हर्षद रमेश देशमुख
मु.पो.आंबळे ता.शिरुर जि.पुणे.

उमेश रणदिवे

#शाळेतल्या_पुस्तकात_उद्या_या_माणसाचा_धडा_येईल!

लोकं या व्यक्तीला येडा म्हणतात ,कुणी म्हणतय याच्या डोक्यात फरक झालाय म्हणुन मी याची चौकशी केली तर खरंच हा येडा निघाला पण आपल्या ध्येयाबद्दल ! शहाणी लोकं याला रांगडा मर्द म्हणतात .खाली लिहिल्याप्रमाणे याची कहाणी.

पै.उमेश रमेश रणदिवे हे या रांगड्या मर्दाच नाव! रांजणगाव सांडस यांच गाव! घरी बागायती शेती,गड्याचा लहानपणापासून पैलवानी पिंड!स्वभावानं अत्यंत भोळा ,अगदी श्रीसांबसदाशिव. गावातच जेमतेम  शिकला आणि नंतर तालमीत गेला. घरी बागायत असल्यामुळे आपणच पिकवायच आणि आपणच खायचं अस समाधानी जीवन त्यामुळे बाहेर नोकरी करायची गरज भासली नाही.
हळुहळु भिवरेच्या तीरावर फिल्टर पाण्याच प्रस्थ वाढलं , फुकट मिळणाऱ्या पाण्याला मोल द्यावा लागलं.तव्हा याच्या डोक्यात टुप पेटली , यानं विचार केला आज पाणी विकत घ्यावा लागतय उद्या आॅक्सिजन विकत घ्यावं लागंल. या विचाराने त्याला ४ रात्री झोप आली नाही.यानं झाडं लावायचं ठरवलं पण याचा प्रवास सोपा न्हवता ,याला लोकांनी येडं ठरवलं कुणी वाया गेलेलं म्हणलं पण हा गडी मागं हटला नाही आपलं काम करत राहीला. सगळ्या अडथळ्यांवर कळस म्हणजे याला मारहाण करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला तरी हा आपलं काम करतच राहिला.तुम्हाला विश्र्वास बसंल की नाही माहित नाही पण याने एक-दोन नाहीतर  गावभर लावलेली तब्बल १०,००० झाडं वाढवून दाखवली आहेत याशिवाय ५० एकरात रानभाज्यांसमवेत जंगल उभारण्याचा प्रयत्न केलाय.नुसती झाडं लाऊन तो थांबला नाही गावात फिरती लायब्ररी सुरू केलीय, उन्हाळ्यात पाणपोई चालवतो याच्या वरची पायरी की गेले १२० आठवडे हा गावात स्वच्छता अभियान चालवतो आणि सायकलिंग करून विविध गावांत जाऊन व्यायामाच महत्त्व पटवून देतो.या सगळ्या कामांत त्याच्या पत्नीची त्याला विशेष साथ आहे हे महत्त्वाचं.

उद्या या माणसामुळं संतराज महाराजांच रांजणगाव या नावलौकिकाबरोबरच उमेश रणदिवे यांचं रांजणगाव असा गवागवा होणार आहे .आज जी लोकं ठेवतात त्यांचं या जगात काहीच राहणार नाही मात्र पै.उमेश रणदिवे अमर होणार आहे.वेडी माणसंच इतिहास घडवतात असा इतिहास आहे.असा हा येडा माणुस भविष्यात आपल्या शाळेतल्या पुस्तकात धड्याच्या रुपात भेटला तर नवल वाटून घेऊ नका! कारण या माणसाचा नादचं खुळा आहे

#वृक्षपुरूष 
✍️सोनबाराजे तथा हर्षद रमेश हांडे देशमुख 

उमेश रणदिवे --- 93593 67215

Sunday, 25 April 2021

*शिरूरचा आमदार न्हवं सालकरी*
पुणे - अहमदनगर रस्त्यावरून प्रवास करत असताना रांजणगाव गणपती जवळ आपल्याला एक इमारत दिसते. ती म्हणजे बाबुराव दौंडकर स्मारक समिती.माझ्या वयाच्या अनेकांना प्रश्न पडत असेल की ही काय भानगड आहे? त्यांचही बरोबरच आहे म्हणा काळ लोटला की काळाबरोबर माणसं देखील विसरली जातात म्हणुन त्यांच स्सरण राहण्यासाठी आणि त्यांचं कार्य निरंतर चालु राहण्यासाठी स्मारक उभी करावी लागतात. दिवंगत आमदार बाबुराव दौंडकर हे देखील त्यातील एक! संत एकनाथ महाराजांनी सांगितल्याप्रमाणे " सगुण चरित्रे परम पवित्रे| सादर वर्णावी||" म्हणुन कै.बाबुराव दौंडकर यांच्या कार्याचा व जिवन चारित्र्याचा घेतलेला संक्षिप्त आढावा.

भारत देश स्वतंत्र झाला आणि भौगोलिक सीमांनुसार शिरूर तालुक्याची निर्मिती झाली.चार चार नद्या असुन देखिल मागास आणि दुष्काळी होता.राजकीय आणि वैचारिक दृष्ट्या विचार केला तर सत्यशोधक समाजाचा जबरदस्त प्रभाव होता.

याच सगळ्या काळात प्रामुख्यानं कॉंग्रेसचं वर्चस्व असणाऱ्या भागातील करंजावणे गावात बाबुराव दौंडकर यांचा जन्म झाला.जेमतेम चौथीपर्यंत शिक्षण घेतलं.घरी जमीनजुमला भरपुर आणि गावात प्रतिष्ठित कुटुंब त्यामुळं त्यांना गावच्या राजकारणात भाग घेतला. तत्पुर्वी ( इ.स.१९५७ साली श्री.संभाजीवराव पलांडे आणि श्री.रामराव पलांडे यांनी शिरुर येथे जनसंघाच्या शाखेची स्थापना केली. पिंपळे खालसा गावचे श्री.बबनराव धुमाळ यांची जनसंघाच्या तिकीटावर लढुन जिल्हा लोकल बोर्डावर निवड झाली होती.)जनसंघाचे जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्य बबनराव धुमाळ हे बाबुराव दौंडकर यांचे मामा होते. मामांबरोबर ते पुण्याला येत असत त्यामुळं त्यांचा पुण्यातील जनसंघाच्या लोकांबरोबर संपर्क झाला आणि १९६४-६५ सालापासून त्यांनी जनसंघाच्या कामाला सुरुवात केली.

१९६७ साली प्रथमत: ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पंचायत समिती सदस्य झाले.पाच वर्षांचा काळ गेला आणि दुष्काळ पडला तोच हा कुप्रसिद्ध १९७२ चा दुष्काळ! आधीच तालुक्यात पाण्याची टंचाई त्यात या दुष्काळाची भर!परंतु दुष्काळ निवारणासाठी बाबुराव दौंडकर यांनी अनेक प्रयत्न केले जागोजागी तलाव बांधण्यासाठी मागणी असो अथवा दुष्काळग्रस्तांच्या हातांना काम असो बाबुराव दौंडकर कायम आघाडीवर राहिले.

१९७२ साली दिवसामागून दिवस जात होते पण आशेचा किरण दिसत न्हवता‌.शेवटी बाबुराव दौंडकर अनंत चतुर्दशीला पुण्याला गेले तिथं गणपती विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर लक्ष्मी रोडला त्यांनी स्टॉल लावला आणि सबंध पुणेकरांपुढे मदतीची याचना केली. कुणी साड्या दिल्या, कुणी कपडे दिले,कुणी अन्नधान्य तर कुणी पैसे.याच काळात श्री. बिंदुमाधव जोशी यांचा त्यांच्याशी परिचय झाला आणि त्यांना प्रोत्साहन दिलं.त्याच्या मदतीने दुष्काळग्रस्तांच्या उदरनिर्वाहासाठी अनेक योजना सुरू झाल्या होत्या मात्र कधी कधी त्यांना पगार वेळेवर मिळत नसे. एकदा तर संपुर्ण महिनाभर पगार झाला न्हवता.दुष्काळग्रस्तांचे जीव मेटाकुटीला आले होते. मग बाबुराव दौंडकर यांनी शेवटी तहसिल कार्यालयासमोर  उपोषणाचा मार्ग स्विकारला.उपोषणाच्या दिवशी नेमकी एकादशी होती.उपोषणकर्त्यांनी भजन करत उपोषण केले आणि शिरुर तहसिल कार्यालया समोर उपाशी विठ्ठल मंदिराची स्थापना केली. उपोषणाची बातमी शासनापर्यंत पोहोचल्यानंतर तिसऱ्याच दिवशी दुष्काळ निवारणाच्या कामावर असलेल्या लोकांचे पगार झाले.बाबुराव दौंडकरांची जनसामान्यात वेगळी प्रतिमा झाली.

पुढे १९७५ साली आणीबाणी जाहीर झाली.जनसंघातील सर्व कार्यकर्त्यांनी आणीबाणीला विरोध केला आणि त्यांची सगळ्यांची रवानगी तुरुंगात झाली.बाबुराव दौंडकर देखिल त्यात होते ,त्यांनी पुर्ण वेळ शिक्षा भोगली.

बाबुराव दौंडकरांच कार्य सर्व जनता पाहत होती बघता बघता १९७८ साल उजाडलं.विधानसभेची निवडणूक लागली होती.चार पक्षांच्या विलिनीकरणातून तयार झालेला जनता पक्ष हा कॉंग्रेसचा तगडा विरोधक मानला जात होता.सुरुवातीला जनता पक्षाचा उमेदवार हा वेगळा जाहीर झाला होता मात्र बिंदुमाधव जोशींनी दिल्लीपर्यंत  फिल्डींग लावली आणि बाबुराव दौंडकरांना तिकिट मिळालं!

बिंदुमाधव जोशींनी संपुर्ण प्रचार यंत्रणा ताब्यात घेतली! संभाजीराव पलांडे आणि बिंदुमाधव जोशींनी आख्खा तालुका पिंजुन काढला आणि अखेर बाबुराव दौंडकर यांचा विजय झाला.

आमदार झाला तरी बाबुरावांचा पिंड बदलला नाही.ते रांजणगाव वरून शिरुरला एस.टी बसने येत आणि स्टॅंडवरून तहसिल कार्यालयात पायी जात असत.तहसिल कार्यालयात आलेल्या व्यक्तींची कामे मार्गी लावत असत.त्यांच व्यक्तीमत्व अष्टपैलू होतं. भजनात गेलं की भजन्या अन् शेतात गेलं की शेतकरी! ते जनतेला म्हणायचे तुम्ही मला निवडलं म्हणजे मला सालानी ठेवलय! पडेल ते काम सांगत जा.म्हणुन बिंदुमाधव जोशींनी त्यांना शिरूरचे सालकरी ही उपाधी दिली.

✍🏼हर्षद रमेश देशमुख.
(अॅड ्.अशोकराव पलांडे आणि अॅड्.सुमिता दौंडकर यांनी अनेक अनुभव आणि किस्से सांगतले आहेत ते आपण पुढच्या भागात पाहु)

Sunday, 5 July 2020

अर्रर्र..बाळपाटील बाळपाटील!!!



दि.२६ जुन !अश्र्विन शु षष्ठी !कुमारषष्ठीचा दिवस! दुपार टळून गेली होती , पावसाची कुठेही आशा न्हवती! साडेतीन पावणेचारची वेळ ! यमदुत आला अन् सुरवातीला तोही कचरला की आता म्हणायचं कसं की "पाटील..चला, मृत्युलोक सोडायची वेळ आलीय" पण शेवटी यमदुतानं हिम्मत केली नि एका युगाचा अंत झाला....त्या युगाची  पुर्वपिठिका अशी
                 आमच्या शिरुर तालुक्यात स्वातंत्र्याच्या मागच्या पुढच्या काळात काही गावच्या पाटील मंडळींचा रूबाब काही खास होता त्यात गणेगाव दुमाला चे पाटील, नागरगावचे पाटील, न्हावऱ्याचे बुआकाका पाटील (शामरावांचे चुलते) आणि या सगळ्या पाटलांच्या आघाडीवर होते आंबळ्याचे जयवंतराव पाटील निंबाळकर!!हे निंबाळकर मुळचे दानोळीचे खर्डेकर निंबाळकर! कोल्हापूर च्या सरलष्करांचे नजिकचे भाऊबंद.
करडे, आंबळे आणि न्हावऱ्याची देखिल काही दिवस पाटीलकी भुषवली होती.
करंजावण्यापासुन निमोण्यापर्यंतचे खटले ज्यांच्या पुढाकारान मिटत होते ते जयवंतराव पाटील यांना उपास-तापास आणि नवसाने झालेलं अपत्य  म्हणजे विजयकुमार! त्यांचा जन्म विजयादशमीचा म्हणुन नाव विजयकुमार. हे जग मात्र त्यांना 'बाळपाटील' म्हणुन ओळखतं.चेहरा अगदी वडीलांसारखा , धारदार नाक , साऊथचा हिरो महेशबाबु सारखी परफेक्ट jawline, गोरा नितळ वर्ण, मोठे घारे  डोळे शरीर तर इतकं बलदंड की तरूणपणी कोरड्या विहिरीत पडून सुद्धा काही झालं नाही अगदी थोडक्यात 'राजससुकुमार मदनाचा पुतळा' बघताच क्षणी कुणीही माया करावी!
                  सगळ्याच बाबतीत वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून काम केलं पण दोघांच्या काम करण्याच्या पद्धती वेगळ्या होत्या. जयवंतराव पाटील हे सर्वांना धाकात ठेऊन काम करत पण बाळपाटील सर्वांना आपला माणुस वाटायचा , कुठलंही गाऱ्हाण असं सोडवल की गाऱ्हाण करणार्याला वाटावं आईच्या कोर्टात दावा मांडलाय की काय एव्हढं निव्वळ!धुतल्या तांदळासारख म्हणुन गावानी त्यांना गावची सर्व पद भुषविण्याची संधी दिली.

श्री.विजयकुमार जयवंतराव राजेनिंबाळकर यांची कारकीर्द

•शिवकाळापासुन ते १९६२ पर्यंत गावची मुकादमी निंबाळकर कुटुंबाकडे

•सरपंच ग्रामपंचायत आंबळे १९७८ ते १९८३ 

•चेअरमन आंबळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित आंबळे 

•पोलिस पाटील आंबळे
            एव्हढी पद भुषविण्याची संधी मिळाल्यानंतरही लोकांचं त्यांच्याविषयीच प्रेम काकणभर देखील कमी झालं न्हवत ! त्यांनी एखाद्या घरात प्रवेश करणार असं दिसताच, तोच घराचे मालक मालकीण कावरे बावरे व्हायचे मालक वरडून सांगायचा बायकुला "ए चहा ठेव ए चहा ठेव बाळ अण्णा आल्यात बाळ अण्णा!" ती गृहलक्ष्मी देखील कमरंला खोचलेला पदर डोक्यावर घ्यायची लगबगीनं चहा ठेवायची ! या सगळ्या प्रसंगात घरच्या यजमानांचे डोळ्यातील भाव बघण्याजोगे असत!
               २०-२५ वर्षापुर्वी असा एक काळ होता की त्यावेळी पैशावर नाही तर शब्दावर निवडणूका लढल्या आणि लढवल्या जायच्या ! त्यावेळी अशी एक समजूत झाली होती की बाळपाटलांनी एखाद्याच्या गळ्यात नुसता हात जरी टाकला तरी समोरच्याला वाटायच "अर्रर्र च च च फुटला गड्या" आता असं ते काय बोलायचे त्यांच त्यांनाच माहिती.
               मला लहानपणापासून त्यांच्या बंद्दल आकर्षण वाटायचं जेव्हा मी त्यांना गावची होळी पुजताना पहायचो मला ते माझे आयडॉल वाटत.
त्याच आयुष्य एका सफल जीवनाच मुर्तीमंत उदाहरण आहे कारण ते केवळ तीन अपत्यांचे जनक असले मात्र त्यांनी संपूर्ण गावच पालकत्व आपल्या खांद्यांवर स्विकारल होत
त्यांच जीवन म्हणजे अहोरात्र गावच्या कल्याणासाठी जगणार धगधगत अग्निकुंड होत!बाळपाटील म्हणजे तळपता सुर्य!

बाळपाटील म्हणजे झंझावात! असा झंझावात की ज्याला फक्त मृत्युच शमवू शकला!

अण्णाबाबांना भावपूर्ण श्रद्धांजली!!💐💐💐

✍️ सोनबाराजे तथा हर्षद रमेश हांडे देशमुख

Tuesday, 28 April 2020

२०२१ च्या गोष्टी.

इसवी सन २०२१ च्या आसपास ची ही कथा.ही हर्षदराजे आणि त्यांचा मित्र मंगु धनवटे याची.हर्षदराजे जरी स्वतःला राजे उपाधी लावत असले तरी बाकीचे त्यांना सोन्या , हर्षा अशा नावाने हाक मारत मात्र गावातील वयोवृद्ध त्यांच्या घराण्याच्या आदरापोटी त्यांना सोनबाराजे म्हणत.दस्तुरखुद्द हर्षदराजे ज्यांना मंगु म्हणतात त्यांना सारा गाव मंग्या म्हणायचा अगदी त्याची माऊली सुद्धा! हर्षदराजे आणि मंगु ची जोडी अगदी जयवंत पाटील आणि दतु कोतवालांसारखी हे ही केवळ हर्षदराजेच म्हणत.
तर सगळ्यांचा मंग्या अगदी हर्षदराजे यांचाही तो मंग्याच. सर्वांचा लाडका. ज्यावेळची ही कथा आहे म्हणजे अजमासे ५७-५८ वर्षापुर्वी मंग्या हातासरशी ३-४ तालुक्यातील २०-२५ जणांचा जावई असेल इतका तो प्रेमशास्त्रपारंगत होता.त्यावेळी त्याला आलेली अनेक स्थळ त्यांनी या प्रकरणी धुडकावून लावली होती.असा वीर आमचा मंग्या होता.त्यावेळी एक फॅशन होती इलेक्शन आलं की सणवार मोठे साजरी करायची.त्यामुळ शेजारच्या गावात दहीहंडीच्या निमित्ताने तमाशा होता.आमचं निम्म गाव तिकडं तमाशाला  त्यात  आम्ही दोघेही आलोच. तमाशा सुरू होणारच होता तेव्हढ्यात त्यांची म्होरकी नर्तकी समोर आली नि म्हणली" आमच्या कॅसिओ वाल्याला चक्कर आलीय.तुमच्यात कुणाला कॅसिओ वाजवता येतो का ?" आमच्या मंग्यानी डायरेक्ट माझा हात धरला नि वर केला. माझी तारांबळ उडाली .मी ऐकत नाही म्हणल्यावर ती खाली येऊन माझ्या दिशेने चालु लागली .मी भवितव्याचा विचार करून गाडीला किक मारुन धुम ठोकली माझ्या जीवानं सुटकेचा निःश्वास सोडला,जणु ती येऊन माझ्या मांडीवरच बसणार होती.
असा त्या मंग्यामुळं माझा बीपी वाढुन मी जिवाला मुकलो असतो.
असेच चांगले मजेत दिवस चालले होते तेव्हढ्यात कोरोना नावाचा विषाणू आला नि साऱ्या जगाला घरात कोंडुन ठेवलं केवळ भारताचा ग्रामीण भाग सोडला तर कारण त्यावेळीसुद्धा काहीअंशी खेडी स्वयंपुर्ण होती.गावातल्या गरजा गावात भागत होत्या.उन्हाळ्याचे दिवस होते त्यामुळं आमचा पव्हायचा बजत ठरला.पण गावात मोजक्याच विहीरींना पाणी होतं कारण चासकमानच पाणी अजुन आलं नव्हतं.ज्या विहीरीवर गेलो तर या विहीरीचा मालक लै चक्सु होता कोरोनाची सगळी पथ्ये पाळायचा.त्यात त्याला सुगावा लागला होता की आपल्या विहीरीत पव्हायला पोरं आल्यात अन् त्यांना सर्दी खोकला पण झालाय. आम्ही पाण्यातच होतो तोच पव्हायला येत नसल्यामुळे आमची कपडे सांभाळणारा मंग्याकुणालख तरी हाक मारत होता पाहीलं तर विहीरीचा मालक होता. जवळ आल्याबरोबर त्यानी दगडी मारायला सुरुवात केली तसा मंग्या बुडाला पाय लाऊन पळाला आमच्या कपड्या सकट. त्या प्रकरणाची बातमी शिळी झाल्यावर आम्हाला कळलं की विहीरीच्या मालकाला व्हाॅट्स अप वर चहाडी करणारा मंग्याच होता.

अशीच एक कहाणी नंतर कधीतरी!

©सोनबाराजे तथा हर्षद रमेश हांडे देशमुख.

टीप : जो कुणी ही पोस्ट वाचून देखील लाईक करणार नाही त्याला...............

आमच्या संदीपमामाला विचारा.

Monday, 13 April 2020

आठवणीतले रावसाहेबदादा



रावसाहेब दादा बाबुराव  पवार. शिरूर तालुक्याचा पहिला भूमिपुत्र जो १९६२ साली तालुक्याचा आमदार झाला.  त्यांच्या देखण्या रूपाच्या बाबतीत सांगायचं झालं तर आजच्या घडीला टॉल्लिवूड च्या कुठल्याही अभिनेत्याला लाजवेल असा रांगडा मर्द गडी. सदरा,धोतर टोपी अन पिळदार मिश्या असा त्यांचा पोशाख .स्वभावात माधुर्य एवढं की प्रत्येक मित्राला, पाहुण्याला अस वाटणार की दादा फक्त आपल्याशीच अगदी मनमोकळे होऊन बोलतात. 

पोलिस खात्यात नोकरी करून तालुक्याचा आमदार होताना आणि त्यानंतरही सहकाराच जाळं विणलं.पंचायत समिती सारख्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा बाजार समिती सारख्या सहकारी संस्था असोत दादा त्या संस्थांचे बळकटकरणासाठी अग्रेसर होते. त्यातूनच शिरूर तालुका खरेदी विक्री संघाची स्थापना दादांनी केली. एव्हढंच न्हवे तर आज रोजी तालुक्याचा राजकीय केंद्रबिंदू असलेला घोडगंगा सहकारी साखर कारखाना याची स्थापना करण्यात दादांचाच पुढाकार होता. ते स्वतः फक्त आमदार होऊन थांबले नाहीत तर आपल्या तालमीत वाढलेले पोपटराव कोकरे व पोपटराव  गावडे यांना देखील आमदार बनवलं. एवढं मोठं आणि अचाट त्यांचं कर्तृत्व.त्यांचं कर्तृत्व आणि नेतृत्व सिध्द करणारी घटना स्वातंत्र्यानंतर घडली.

कोरोना सारख्या विषाणू मुळं आपत्ती काय असते हे माझ्या वयाच्या पोरांनी पहिल्यांदाच पाहिलं.पण याआधी नैसर्गिक आपत्ती येत होत्या.अशीच एक आपत्ती शिरूर तालुक्याची जीवनदायिनी असणाऱ्या भिमा नदीमुळे आजुबाजुच्या प्रदेशावर आली होती.बहुतांशी लोकांना वाटत की पुर म्हणजे १९६२ पण नाही त्या आधी ६ वर्ष म्हणजे १९५६ साली भीमा नदीवर महाभयंकर पुर आला होता त्याच नाव महापाणी त्याबद्दल आज अनेक जण अनभिज्ञ आहेत.पानशेत घटनेपेक्षा त्याची तीव्रता कितीतरी अधिक होती. हे आपल्याला पुढील घटनांवरून लक्षात येईल.आज बागायती आणि ऐश्वर्यसंपन्न दिसणारी नागरगाव, वडगाव, मांडवगण सारखी गाव कित्येक पिढ्या मागं गेली.नागरगाव संपुर्ण पाण्याखाली जाऊन नवीन गाव वसवलं. वडगाव ते मांडवगण लोक होडीने प्रवास करत होते. ऐकुन अतिशयोक्ती वाटेल पण सत्य आहे.एव्हढी भीषण तीव्रता त्या प्रलयाची होती.त्याचा सर्वात जास्त धोका दौंड तालुक्यातील हातवळण गावाला होता.त्याच वेळी चाळीशीतील एक व्यक्ती समोर आली. या प्रलयाची चाहुल लागताच त्यांनी हातवळण गाव स्थलांतरित केलं.आणि फार मोठा  अनर्थ टाळला.त्या व्यक्तीचं नाव होत रावसाहेब बाबुराव पवार. दादांचं हजरजबाबी व्यक्तीमत्वाची झलक त्यांच्या कर्तृत्वातून दिसून येते.त्यांना आपत्ती व्यवस्थापण क्षेत्रातील दादा म्हणण्यास सुद्धा हरकत नसावी.अशा अनेक घटना दादांच्या आयुष्यात घडल्या असतील पण मला माहित असलेली ही एक.

धन्यवाद.

✍️सोनबाराजे तथा हर्षद रमेश हांडे देशमुख 
#क्षत्रियबाणा

Wednesday, 18 March 2020

समतेचा पुरस्कर्ता वारकरी संप्रदाय

भारतीय राज्यघटनेच्या पंधराव्या कलमानुसार प्रत्येक भारतीय नागरिकाला केवळ धर्म , वंश,जात ,लिंग किंवा जन्म ठिकाण या कारणांमुळे राज्य कोणत्याही नागरिकाविरुद्धा भेदभाव करणार नाही अशी तरतूद करण्यात आली नि भारताला सामाजिक समतेची कायदेशीर देणगी मिळाली.परंतु सामाजिक समतेची खरी सुरुवात वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून झाल्याचं आपल्या सर्वांना पाहायला मिळतं.शिंपी समाजात जन्म घेतलेले संत नामदेव महाराज यांना अभंगाचे प्रणेते मानलं जातं .समाजातील जातिव्यवस्थे मुळे निर्माण झालेली माणसांमधील दरी त्यांनी ओळखली होती.त्यांना स्वतः याचा फटका बसलेला असणार त्यामुळं संत नामदेव महाराज म्हणतात;

कुत्थळ जागी उगवली तुळशी ।अपवित्र तयेशी म्हणू नये ।
नामा म्हणे आता जातीचा मी शिंपी ।उपमा जातीची देऊ नये।।

संत नामदेव महाराजांनी भारतभ्रमण करून भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन भागवत धर्माचा प्रसार केला तो थेट पंजाब पर्यंत. पंजाब मधील घुमान येथे त्यांचे मंदिर आहे .त्याची कवणे शीख धर्मग्रंथ असलेल्या गुरूग्रंथसहेब यात देखील आहेत. त्याच काळात अत्यंत हीन समजल्या जाणाऱ्या महार समाजात सुद्धा वारकरी संप्रदायातील संत निर्माण झाले त्यात संत चोखा मेळा अग्रगण्य. ते निरक्षर असल्या कारणाने त्यांचे अभंग अनंतभट या व्यक्तीने लिहिले.समाजातील आपल्या स्थानाला उद्देशून संत चोखामेळा म्हणतात ;

ऊस डोंगा परि रस नव्हे डोंगा। नदी ढोंगी परि जळ नव्हे डोंगे ।
चोखा डोंगा परि भाव न्हवे डोंगा ।काय भुललासि वरलिया रंगा।।

 या सर्व उहापोहात त्यांच्या पत्नीने देखील अभंगरचना केली. संत नामदेव आणि संत चोखामेळा हे दोन्ही खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीत जन्माला येऊन सुद्धा वारकरी संप्रदायाच्या आणि त्यांच्या अभंग रचनेच्या माध्यमातून त्यांना वेगळ्या उंचीवर नेलं.पंढरपूरला भगवान पांडुरंग परमात्म्याचे दर्शन घेण्याअगोदर या दोन्ही संतांचं दर्शन घ्याव लागत यातून आपल्याला वारकरी संप्रदायाची समता लक्षात येते.
वारकरी संप्रदायाचे शिरोमणी आणि अवघ्या मानव जातीचे 'माऊली' कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानदेव महाराज देखील सांगतात 

"जे जे भेटे भूत । ते ते मानिजे भगवंत।"

एव्हढेच नाही तर १६ व्या शतकात होऊन गेलेले संत शेख महम्मद हे मुस्लिम समाजातील संत देखील वारकरी संप्रदायाने स्विकारून आपली सहिष्णुता दाखवली.

संत तुकाराम महाराज म्हणतात " कोणा ही जीवाचा न घडो मत्सर ।वर्म सर्वेश्वर पुजनाचे।।
शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील वारकरी संप्रदायाच्या याच समतेच्या वृत्तीचे अनुकरण करत " अठरा वर्ण ,चाऱ्ही जाती यांस आपआपले धर्मा प्रमाणे चालवून त्यांचा संघह करून ठेवावे" असा मनसुबा केला आणि तो तडीस नेला. सतराव्या शतकात अवघ्या अठरा अलुतेदार, बारा बलुतेदार समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली एकत्र करणारा जरीपटका या मराठी मुलखात प्रथम कुणी रोवला असेल तर तो वारकरी संप्रदायाने. 

दरवर्षी तुकाराम बीजेच्या वेळी काही पुरोगामी म्हणवणाऱ्या लोकांकडून ब्राह्मण समाजाला कलंकित करण्यासाठी वावड्या उठवल्या जातात परंतु संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनानंर तुकाराम महाराजांचा धावा करणारे हे संत निळोबा राय हे ब्राम्हण जातीत जन्म घेणारे होते हे विसरता कामा नये.
अशा प्रकारे ब्राम्हणापासून मुसलमानांपर्यंत सर्वसमावेशक असलेला वारकरी संप्रदाय आपल्याला सर्वप्रथम सामाजिक समतेचा पुरस्कर्ता वाटतो. भगव्या पताकेच्या मागे एकटवलेला वारकरी हा प्रत्येक दुसऱ्या वारकऱ्यास माऊली म्हणुनच संबोधतो.

#रामकृष्णहरी🚩

✍️सोनबाराजे तथा हर्षद रमेश हांडे देशमुख
#क्षत्रियबाणा

Thursday, 27 February 2020

घोडगंगेच्या तीरावरून

.आमचा शिरूर तालुका पूर्वेकडे घोड कुकडी तर पश्चिमेकडे भीमा नदी या दोन नद्यांमधला प्रदेश.आज हा भाग पंचतारांकित रांजणगाव एमआयडीसी क्षेत्र तसेच चासकमान डावा कालवा तसेच डिंभा कालव्यामुळे संपन्न झालेला आपल्याला पाहायला मिळतो.प्रत्येक मनुष्य दोन वेळेस सोन्याचा घास खाऊ शकतो एव्हढी आर्थिक सुबत्ता प्रत्येकाकडे आहे.या भागाचा इतिहास समजावा म्हणून आजचा लेख लिहिण्याचा माझा बालिश उपद्व्याप आहे.


शिरूर तालुक्याला इतिहास नेऊन सोडतो आपल्याला थेट  ताम्रपाषणयुगीन कालखंडात.घोडगंगेच्या तीरावर असलेले 'मौजे इनामगाव' हे शेतकऱ्यांच्या आद्य वसाहती पैकी एक.या गावाने ताम्र पाषाण युगातील इतिहास संशोधनाला वेगळं वळण दिलं.  एक दीड वर्षापूर्वी मौजे तळेगाव ढमढेरे येथील एका वाड्यात १३व्या शतकातील शिलालेख सापडला त्यातून हा भाग त्या काळात  पारनेर च्या अख्यात्यारित येत असल्याचे समजले.त्याच दरम्यान  यादव काळात पश्चिम पट्ट्यातील मौजे केंदुर या गावी कान्होराज महाराज पाठक हे संत होऊन गेले.नंतरचा जवळपास ३ शतकांचा इतिहास मला तरी ज्ञात नाही. नंतर येतो मग निजामशाहीचा कालखंड.याच कालखंडात या भागाला विशेष स्थान प्राप्त झाल्याचे दिसून येते. निजामशाहीच्या काळात ५  पिरांची स्थापना झाली. ते पिरसाहब करडे, निर्वी ,न्हावरे ,दहिवडी , पारोडी, उरळगाव या गावांमध्ये आहेत. आपल्या भौगोलिक स्थानामुळे करडे आणि पाबळ या गावांना परगण्याची अथवा तर्फेची गावे होण्याचा मान मिळाला.या सततच्या राजकीय  स्थितंतराच्या काळात या भागाला हाल सोसत असताना आपली धार्मिक ओळख विसरावी लागली अनेक मंदिर याच काळात नामशेष झाली.नंतर हा भाग फर्जंद शहाजीराजे भोसले सरलष्कर यांच्या जहागिरीचा भाग होता.त्याचवेळी या भागाला राजकीय वजन प्राप्त होण्यास सुरुवात झाली.मात्र शककर्ते राजा शिवछत्रपती यांचा कैलासवास होईपर्यंत  या भागाचा राजकीय उल्लेख फारसा आढळत नाही पण मराठेशाहीच्य. इतिहासातील सोनेरी पान असलेल्या सरदार ढमढेरे घराण्यातील बाबाजी ढमढेरे हे राजा शिवछत्रपती यांचे अंग रक्षण करत होते.प्रतापगड मोहीम राबवली जात होती त्यावेळी कान्होजी जेधे यांच्या कुटुंबाची जबाबदारी याच तळेगाव ढमढेरे च्या ढमढेरे कुटुंबावर होती.संत तकोबारायांच्या समकालीन संतोबा पवार नावाचे क्षत्रिय परमार कुळातील एक संत या नागरगावात जन्मले त्यांनी मुळा-मुठा-भीमा संगमावर त्यांची समाधी आहे.'पवारांचे वंशी उजळला दीप ।नरदेहा येऊनी सार्थक केले।।' अशा प्रकारे तुकाराम महाराज याांचे पुुत्र नारायण बुआ देहुकर यांनी त्यांचं वर्णन केलेलं आहे. पुढे छ्त्रपती संभाजी महाराजांच्या कालखंडात इ. स.१८४-८५ च्या दरम्यान मराठा सैन्याने या भागातील मुघल सैन्यावर हल्ला करून त्यांची पळता भुई थोडी केली होती.या दरम्यान अनेकदा समोरासमोर येऊन लढाई झाल्याचे उल्लेख आपल्याला पाहायला मिळतात. छत्रपती संभाजी महाराज यांना कैद केल्यानंतर पेडगावतील बहादूरगड पासून ते तुळापूर पर्यंतचे हाल आणि औरंगजेबाचे क्रौर्य याच मातीने पाहिले आणि ते पचवले. स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींना अग्निसंस्कार देखील याच मातीत मिळालेहे या भूमीच दुर्भाग्य !नंतरच्या काळातला इतिहास आपल्याला स्पष्ट पणे वाचायला मिळतो तो केवळ त्या घटनेच्या मागोव्यामूळे कारण दस्तुरखुद्द आलमगीर औरंगजेब या भागात वस्ती करत होता. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तो तांदळी - इनामगाव - शिरसगाव - निर्वी - न्हावरा- उराळगाव- दहिवडी या मार्गे दोनदा मार्गस्थ झाला. याच काळात करडे परगण्यातील मौजे शिरूर या गावात संत निळोबा राय होऊन गेले.पण हा भाग अजूनही स्वराज्यात न्हवता शंभूपुत्र शाहू महाराजांच्या काळात हा भाग मराठेशाहीत आला. बाळाजी विश्वनाथ पेशवे यांना हा भाग जहागीर म्हणून देण्यात आला होता. पेशव्यांनी आपले बस्तान पुण्याला मांडल्यानंतर या भागावर पेशव्यांचे लक्ष अधिक झाले हा भाग पेशव्यांच्या अगदी जिव्हाळ्याचा होता.या प्रदेशाचा न्याय , महसूल देवस्थान आदी कामे करण्यात पेशव्यांना हुरूप येई. मराठा सैन्यात लष्कर भरती देखील याच भागातून होई.
त्याच फळ म्हणून या भागातील  अनेक अस्सल क्षत्रिय घराण्याच्या तलवारी अधिक तळपू लागल्या.त्यात तळेगाव च्या ढमढेरे घराण्याचं नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल बाबाजी ढमढेरे पासून जयसिंगराव ढमढेरे पर्यंत असंख्य वीर या ढमढेरे घराण्याने मराठी दौलतीला दिले. साताऱ्यातील  अपशींगे  मिलिटरी या गावातून जसा सैनिक जन्माला येतो तसा तळेगावात एकेकाळी वीर जन्माला येत होते.त्यापैकी नारायणराव ढमढेरे या सरदारांनी अनेक गावचे मोकासे मिळवले. मुखईच्या बाळोजी पलांडे इनामदार यांनी लाल किल्ल्याची किल्लेदारी केली.त्यांच्या मुखई या गावी त्यांना शाहू महाराजांनी इनाम दिलेला आहे. रांजणगाव चे संताजी रणदिवे पाटील हे पानिपतच्या तिसऱ्या युध्दात भाऊसाहेबांच्या सैन्यात होते.त्याचबरोबर आलेगावचे वाघचौरे, न्हावऱ्याचे निंबाळकर, निर्विचे सोनवणे ,मांडवगणचे फराटे , वडगावचे शेलार , शिरसगाव चे कदम , पिंपळयाचे धुमाळ यांनी देखील आपल्या तलवारीची धार दुष्मनाना दाखवली होती.त्यात मलठणच्या पवारांनी विशेष पराक्रम करून मध्यप्रदेशात आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं.इनामगाव येथील मालजी माचाले यांना देखील मोकासा होता. पेशवाईच्या काळात अनेक मंदिरांचा जिर्णोद्धार झाला त्यात शिरूरचे रामलिंग, न्हावरा येतील मल्लिकार्जुन , कारेगवचा कारेश्र्वर यांचा समावेश होतो. थोरल्या बाजीराव पेशव्यांनी केन्दुर व पाबाळ ही दोन गाव मस्तानीला जहागीर म्हणून दिली होती.त्याच पाबळला मस्तानीची समाधी आहे.मौजे आलेगाव पागा हे पेशव्यांच्या गृहकलहाचे साक्षी आहे. रांजणगाव गणपती येथील महागणपतीच्या मंदिराचा जिर्णोद्धार देखील पेशव्यांनीच केला.मराठेशाहीच्या अस्ताला कारणीभूत ठरलेली भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक लढाईला देखील हीच भूमी साक्ष आहे. 
इंग्रज काळात  रघुजी भांगरे या कोळी युवकाने घोडनदी गावात इंग्रज अधिकाऱ्याच्या खून केला. सावकारकीला कंटाळून पेटून उठेलेल्या शेतकऱ्यांनी इ. स.१८७५ साली जगाला दखल घ्यायला लावणारे दख्खनचे दंगे याच शिरूर तालुक्यातील करडे गावात सुरू झाले त्याच लोण संपूर्ण दक्खन प्रांतात पसरलं.

लोककला विश्वात सुद्धा विठाबाई नारायणगावकर, जगताप पाटील पिंपळे कर यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे.अशा प्रकारचं आमच्या तालुक्याच्या पूर्वजांचा पराक्रम आणि कर्तृत्व आहे ते अबाधित राखण्याची जबाबदारी आमच्या तालुक्यातील तरुणांवर आहे.

धन्यवाद🙏

©सोनबाराजे तथा हर्षद रमेश हांडे देशमुख

टीप :- यामध्ये काही चुका अथवा दुरुस्ती असल्यास अवश्य कळवा.

Tuesday, 31 December 2019

३१ डिसेंबरच्या रात्री

तो दिवस होता ३१ डिसेंबरचा दिवस म्हणणण्यापेक्षा रात्र म्हणलेली बरी !!तर रात्र ,तीच  नियोजन काही ठरलं न्हवतं पण काहीतरी करायच हे निश्चित होतं कारण आमचं पुण्यातलं पहिलच वर्ष होतं त्यामुळं उत्सुकता शिगेला पोहोचली होती!त्या दिवशी मी आणि सुहास जरा लवकरच रुमवर आलो !रोजच्यासारखाच दिवस होता !विशेष काही घडतच न्हवतं !तरी आमची (सुहास,मंग्या,बोक्या ,माऊली नि मी ) पुण्यातल्या MPSC शांघायच्या शेजारी होती! त्यामुळं तिथ राहण्याचा सुद्धा एक वेगळाच थरार होता त्याबरोबर ऐतिहासिक आंबिल ओढ्याचा सहवास तो तर वेगळाच!  त्याचा गंध थेट आमच्या खोलीपर्यंत यायचा.तिथं पाणी वेळेवर येत नसे म्हणुन टाकीत वरून पाईप टाकुन पाणी भरावं लागत होत.एकसलग तीन खोल्या अशी त्या सदविकेची रचना होती आत प्रवेश केला तरी तिसऱ्या खोली तील दृश्य दिसत असे.त्या दिवशी सुद्धा आम्ही पाईप टाकित टाकला होता.बघता बघता संध्याकाळ झाली. पाऊणेआठ वाजता जेवण करायला गेलो कारण लवकर गेल्या की चपात्या गरम असायच्या आणि तो दिवसही वेगळा.जेवण करून तसंच हा नाय हा नाय करत आम्ही तसंच FC Road ला गेलो.निर्णय होत न्हवता कारण आम्ही पाच जण होतो नि मोटारसायकली दोनच ,१ जण जास्त होत होता तरी आम्ही डेरिंग करून पोलीसांना न घाबरता पोलिस आपल्याला काय करणार आहेत या अविर्भावात आम्ही  कुणीतरी सांगितलं होत की तिथ डॉल्बी लाऊन नाचतात म्हणुन !पण तिथ गेल्यावर वेगळीच परिस्थिती होती ,येशु ख्रिस्तांचे सगळे भाविक भक्त तिथ गोळा झाले होते त्यात भावी कुटुंब असलेल्यांचा जास्त सहभाग होता.आम्ही भारतीय संस्कृतीचे रक्षणकर्ते म्हणुन त्यांपासुन जरा लांबच आणि त्यात भिकारी या व्यवसाय क्षेत्रात मोडणारी लहान बालकांपासुन तर अजुनच लांब पण चमकणारी हिरवळ देखील तिथं जास्त होती ,फुगेवाल्यांची रेलचेल होती मध्येच आमच्या सारखे कॉलेजकुमार तोंडात भोंगा वाजवत फिरत होते तशी हळुहळु गर्दी होत चालली होती.आम्हाला तिथुन निघावसं वाटत होतं पण तेव्हढ्यात आमच्या लक्षात आलं की आपल्या जुन्या वर्गमैत्रिणी याच परिसरात राहतात त्यांच भेट कम दर्शन होण्याची शक्यता होती. पण आमच्या नशिबानी आम्हाला गणपती आणि दहिहंडी अशा दोन्ही वेळी हुलकावणी दिली होती परंतु त्या दोघी तथाकथित आधुनिक विचारांच्या असल्यामुळं आज दर्शन होण्याची शंका बळावली होती.त्यामुळं आम्ही आमच्या दुचाक्या  कॅफे गुडलकच्या अगदी समोर जिथे मुलींचे टॉप ५०/- रू.प्रतिनग मिळतात त्याच्या बाहेर लावल्या नि पर्यटनाला निघालो रुपाली ,वैशाली करत ‍FC College च्या मुख्यदरवाजाशी पोहोचलो तिथं एस.पी.कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा चमु नृत्य करत होता.ते पाहुन आम्ही पुढच्या आडवाटंनं जंगली महाराज रस्त्यावर गेलो पण तिथं सुद्घा काहीही दिसलं नाही (इथं काहीही चा अर्थ कुणीही असा घ्यावा) आमच्या मंग्या बोक्याचा हिरमुड झाला ,त्यात बोक्या आणखी थांबायला तयारच न्हवता(नेहमीप्रमाणे).कर्वेनगरला डॉल्बी असतो हे आता आम्हाला नवीन कळलं त्यामुळं आम्ही आमचा मोर्चा तिकडं वळवला.मंग्या आणि बोक्या परत खोलीवर गेले.प्रभात रोडनी जायचा विचार होता पण गर्दी पाहून कर्वे रस्त्याची वाट धरली आणि व्हायच न्हवतं तेच घडलं .खंडोजीबाबा चौकात आमच्या समोर पोलिस उभे राहिले त्या वेळेस कदाचित ११ वाजले होते ,आमच्या कपड्यांचा ग्रामीण बाज अन् हिरवळीकडे बघणारी आमची गावरान नजर त्यावेळेस आम्हाला बेवडं सिद्ध करत होती.त्यांनी आमची गाडी बाजुला घ्यायला लावली नि लायसन्स मागितलं नेहमी प्रमाणे आम्ही ते रुमवरच ठेवलं होत.आम्ही फोटो दाखवण्याचा प्रयत्न केला तर ते म्हणाले फोटो चालत नाही .हे ऐकुन आमचे मित्र माऊली कोकडे यांच्यातला भावी अधिकारी तथा स्पर्धा परिक्षा विद्यार्थी जागा झाला नि पोलीस मामांनाच कायदा शिकवु लागला .त्यामुळे पोलीस शिपाई अधिकच भडकले त्यांनी आमच्या कडे १७०० रू पावती मागितली आमची अक्कल तिथेच बंद पडली.माऊल्याचा अतिशहाणपणा नेहमीप्रमाणेच चांगलाच नडला होता काय कराव ते सुचत न्हवतं तेव्हढ्यात आमच्या न्हावरे  गावातल्या API साहेबांची आठवण झाली पण त्यांचा मोबाईल नंबरच माहित न्हवता मग आम्ही त्यांच्या फेसबुक खात्यावरून त्यांचा नंबर घेतला ,करू का नको करू का नको असं करत एकदाचा त्यांना फोन लावला त्यांनीही लगेच आमचा फोन उचलला हे महत्वाचे !त्यांच बोलण त्या पोलीस शिपायाशी करूनदिल तरी पण ते ऐकत न्हवते.त्यांनी बळेच १२ वाजेपर्यंत ताणुन धरलं कारण १२ वाजल्या पासुन हेल्मेट सक्ती होती .आमचं Happy New Year तिथच साजरं झालं .परत हेल्मेटचा दंड भरावा लागला.असं निराश मन घेऊन आम्ही तिघं (सुहास,माऊल्या नि मी) रुमवर पोचलो .तर तिथं आणखी मोठं दिव्य पार करायच होत.पाण्याचा नळ बंद करताच आम्ही निघुन गेलो होतो त्यामुळं पाणी टाकीच्या बाहेर येऊन पुर्ण तीन खोल्यांत गच्च भरलं होत आमच्या गाद्या भिजल्या होत्या दप्तर ,वह्या पाण्यात पोहत होत्या ,नशिब म्हणुन लॅपटाॅप उंचावर ठेवला होता म्हणुन बचावला .मंग्या आणि बोक्या पाणी बाजुला करत होते.कशीबशी रूम स्वच्छ झाली होती.पण झोपायचा यक्ष प्रश्न आमच्या समोर होता.निमओल्या चादरी आम्ही अंथरूण म्हणुन टाकल्या होत्या.तसच रात्री कुडकुडत आम्हाला झोपाव लागलं याचा परिणाम दुसऱ्या दिवशी अंगाात कणकण भरली.३१ डिसेंबर होऊन दोन दिवस झाले तरी त्या दिवसाचा हँगआऊट उतरला न्हवता
टीप:फोटो त्यारात्रीचा अर्थात ३१ डिसेंबर २०१८ चा फ.म.रोडवरची आहे
ताक.-त्या दोघी फक्त काल्पनिक आहेत.


--सोनबाराजे तथा हर्षद रमेश हांडे देशमुख

Sunday, 15 December 2019

निंबाळकर पाटलांची हकिकत

पाटीलकी.....

राजेभोसले घराण्याने सुद्धा छत्रपती झाल्यानंतर देखील अभिमानानं चालवलेलं वतन,यावरूनच आपल्याला पाटील या शब्दाचा आवाका लक्षात येतो आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणात देखील महाराष्ट्रात विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर सुद्धा पाटलांचीच ‘दादा’गिरी असल्याचे लक्षात येते.महादजी बाबा शिंदे पाटील अलिजाबहाद्दर यांना 'हिंदुस्थानचे पाटील' म्हणून गौरवण्यात येते. .इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनांमधून पाटील या शब्दाची जादू दाखवून देतात एवढा हा आपल्या समाजातील जिव्हाळयाचा शब्द. समाजमाध्यमांवर आणि लग्नपत्रिकेत पाटील शब्दाचीच रेलचेल दिसून येते . आज देखील प्रत्येक जण स्वतःला पाटील म्हणून घेऊ इच्छितो .कारण पाटील या शब्दाला इतिहासच फार मोठा आहे .सरकार आणि सामान्य रयतेमधील दुआ म्हणजे पाटील . गावाच्या मिरासदारांपैकी प्रमुख अथवा वरिष्ठ घराण्याला पाटीलकीचा बहुमान मिळत असे . काही गावांमध्ये एक पेक्षा अधिक पाटीलकीच्या तक्षिमा असत तेव्हा पाटीलकीच्या मानाच्या वाटण्या होत असत.होळीची पोळी,पोळ्याचा बैल , लग्नाची वाटी ,मांडव टिळा ,दसऱ्याचा मान ,पासोडी ,राबता महार, चांभाराकडून जोडे,तेल्याकडून तेल, देवाकडे बकरे पडतात त्याची मुंढी अशा प्रकारचे मान गावाच्या पाटलांना असत ,प्रत्येक गावानुसार पाटलाचा मानपानात थोडा फार फरक होत असे. मौजे रांजणगाव सांडस तर्फ कर्डे ,येथे रणदिवे पाटील बंधूंमध्ये पाटीलकीच्या वडिलपणावरून वाद होऊन थेट पेशव्याच्या दरबारात गेल्याचे आपल्याला पाहायला मिळते. यात आपली सत्यता सिद्ध करण्यासाठी दिव्य करावे लागले होते . अनेक मजहरांमध्ये अनेकदा साक्षीदार म्हणून विविध गावाचे पाटील व कुलकर्णी आपल्याला पाहायला मिळतात. त्यात पाटलाची निशाणी नांगर असल्याचे आपल्याला दिसते. इंग्रजी अंमल सुरु झाल्यापासून पाटीलकीच्या कामात विभागणी होऊन पाटलांचे दोन प्रकार झाल्याचे आपल्याला दिसते १ मुलकी पाटील २ कामगार पाटील .कामगार पाटलालाच पुढे पोलीस पाटील म्हंटले गेले आहे.
आमच्या मौजे आंबळे गावात पाटीलकीच्या दोन तक्षिमा होत्या १ बेंद्रे पाटील २ निंबाळकर पाटील . यातले राजेनिंबाळकर पाटील हे शिवपूर्वकाळापासून पाटीलकी करत होते. बेंद्रे पाटलाअगोदर घुमरे पाटील मौजे आंबळे गावाचे निम्मे मुकादम होते . पण १९व्या शतकाच्या उत्तरार्धात इतिहासाला आजही अपरिचित असलेल्या आंबल्यातील राजे निंबाळकर घराण्याच्या वंशाला दिवा राहिला नाही. म्हणून त्यांच्या घरातील एका जुन्या स्त्रीने त्यांच्याच भावकीतील कोल्हापूरच्या सरलष्कर निंबाळकर खर्डेकरांचे नजीकचे भाऊबंद असलेले मौजे दानोळीच्या बाळासाहेब निंबाळकर खर्डेकर यांना पाचारण केले.बाळासाहेब त्यावेळेस हयात न्हवते मात्र त्यांची तीन मूलं कृष्णराव , गणपतराव ,दत्तोबा हे तीन बंधू आंबाळ्याला आले.वडीलपणामुळं थोरले कृष्णराव यांच्याकडं पाटिलकीची जबाबदारी आली .त्यांच अल्पावधीतच निधन झाल्यामुळं मधले बंधु गणपतराव पाटील झाले ,पुढे गणपतराव निवर्तल्यानंतर सर्वात धाकटे दत्तोबा पाटील पाटीलकी करू लागले. दत्तोबा पाटील यांनी सत्यशोधक समाजाला आपलंस केले अन् गावोगावी ‘जलसा’करत असत (गणपतराव पाटलांच निधन झाल्यानंतर;जयवंतराव पाटील लहान आहेत त्यामुळं तुम्ही पाटीलकी करा अशा आशयाच पत्र थेट कलेक्टरं नच दत्तोबा पाटलांना पाठवलं होत,आजही ते उपलब्ध आहे.ही गोष्ट १९२० सालची आहे).जयवंतराव वयात आल्यानंतर ते पाटील झाले.आणि तिथुन पुढे सुरू झाला निंबाळकर पाटलांचा सुवर्णकाळ !दरारा म्हणजे काय असतो ते त्यांना बघुन कळतं'पाटील म्हणजे एक घाव अन् 100 तुकड' हे वाक्य ज्यांना तंतोतंत लागु होतं ते जयवंतराव पाटील निंबाळकर (पाटीलदादा) न्हावरे, आंबळे आणि कर्डे गावचे पाटील राहिलेले व संपुर्ण तालुक्यात पाटील म्हणल की ज्यांच नाव येत ते पाटील दादा. त्यांची जीवनगाथा माझ्या मित्रांना आख्यायिका किंवा दंतकथा वाटतात एव्हढी ती अविश्वसनिय आहे.लोकांना त्यांच्याविषयी आदरयुक्त भीती होती,पाटीलदादा दिसले की लोक बाजुला पळुन जात म्हणलं तरी वावगं ठरणार नाही.स्त्रिया त्यांना पाहून आपली वाट बदलीत.त्यांचे तीनही चुलतबंधु त्याच तोडीचे माझे गुरू .दादासाहेब निंबाळकरांनी तर आदर्श जीवनाची ओळख करून दिली.त्यांचे धाकटे बंधु शंकरराव हे महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त.पाटील दादांची दोन्ही मुलं गावची सरपंच राहिली थोरले श्री .विजयकुमार (बाळपाटील)यांनी गावातील सरपंच,सोसायटीचे चेअरमन नि पोलीस पाटील अशा सर्व पदांवर काम केलं.आज त्यांची चौथी पिढी समाजकारणात आहे गावानेही त्यांना त्याच आपुलकीनं स्विकारलय.हे विशेष!
शिवपुर्वकाळापासुन ते आतापर्यंत महाराष्ट्रात फार थोडी करावी असतील ज्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जीवावर समाजात आपलं मानाचं पान राखलय त्या सर्व घराण्यांना मानाचा मुजरा !!
कृपा लोभ असो दीजे ही विनंती
सोनबाराजे तथा हर्षद रमेश हांडे देशमुख

Friday, 8 November 2019

पुर्व शिरूरचे कोर्ट :स्व.माधवराव अण्णा फराटे इनामदार


मला लहान असताना जेवणाचा लै कंटाळा यायचा (आताही आहे)त्यामुळं मला जेवण भरवण्यासाठी माझे आजी बाबा मला गोष्टी सांगुन मला घास भरवायचे.मोठ्या माणसांच्या मोठ्या गोष्टी आमच्या बाबांना सांगायला फार आवडत मी पण मोठ्या कुतुहुलाने त्या ऐकायचो त्यामुळं मला तोडक्या मोडक्या का होईना त्या लक्षात राहिल्यात.असच एकदा मी आमचे बाबा कै.बापुराव देशमुख यांच्या बरोबर गप्पा मारत बसलो होतो.त्यांनी मला एक धाडसी किस्सा सांगितला तो किस्सा होता पुर्व शिरूरचे कोर्ट :स्व.माधवराव (अण्णा) फराटे यांच्या बद्दलचा.स्व.माधवराव अण्णा म्हणजे शिरूर तालुक्याच्या तत्कालीन राजकारणातील एक मोठं प्रस्थ. मांडवगण फराटा या गावातील इनामदार कुटुंबातील कारभारी व्यक्तिमत्व.मांडवगण हे त्या काळातील शिरूर तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या मोजक्या गावांपैकी भीमथडीच्या तटावरच  एक मोठं गाव. तो सालस ,सुसंस्कृत,प्रेमळ आणि मायाळु असल्याचा  लौकिक  मांडवगणकरांनी आजही जपुन ठेवलाय.शिरूर तालुक्याच्या पुर्व पट्ट्यातील भांडणतंटे घोडनदीच्या कोर्टात येत नसत त्याचं एकमेव कारण म्हणजे स्व. माधवराव अण्णा. त्यांना मोलाची साथ होती ती श्री.एन्.डी.दादा फराटे यांची.त्यांच्या साहसाचा अनुभव मात्र मला माझ्या बाबांनी सांगितलेल्या अनुभवातून आला.
   
एकदा स्व.माधवराव अण्णा कामानिमित्त पुण्याला का मुंबईला गेले होते.या घटनेचा काळ मला माहीत नाही.एस.टी.स्टँड वर उतरल्यानंतर त्यांनी पुढचा इच्छित स्थळी जाण्याचा प्रवास रिक्षाने करण्याचा ठरवलं.स्व.माधवराव अण्णांच डोळ्यात भरणारं व्यक्तिनत्व रिक्षावाल्यानी हेरलं होत.प्रथमदर्शी पाहता कुणीही स्व.माधवराव अण्णांची पारख करू शकत होतं.तरी पण रिक्षा चालवणाऱ्याने  फसवुन स्व.माधवराव अण्णांना एका अंधाऱ्या बोळीत नेलं तिथ गेल्यावर आणखी ४-५ जणांनी  अण्णांना घेरलं आणि चाकुचा धाक दाखवुन पैशांची मागणी केली.स्व.अण्णांनी परिस्थीती ओळखुन लगेचच आपल्या कोपरीच्या आतल्या खिशातुन पिस्तुल बाहेर काढला.पिस्तुलाकडे पाहताच त्या भुरट्या चोरांची पळताभुई थोडी झाली.त्या चोरांनी अण्णांची माफी मागुन अण्णांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहचवलं.आता जरी मांडवगणच्या ऊसात बिबटे सापडत असले तरी पुर्वी या मातीनी वाघांना घडवलय हे नक्की!!
तर असा होता आमच्या बाबांनी मला सांगितलेला किस्सा .हा किस्सा ऐकताना मी अगदी तल्लीन होऊन ऐकत होतो. बाबा एखाद्या वेळी थांबले की मी म्हणायचो "मंग ओ बाबा पुढं काय झालं?"
अशा साहसाच्या गोष्टी माझ्या वीररसात्मक साहित्या पेक्षा कमी नाहीत

#हर्षवाणी
#दादारावचानातु
#मोठीमाणसंमोठ्यागोष्टी

✍सोनबाराजे तथा हर्षद रमेश हांडे देशमुख

छायाचित्र :Balasaheb Pharate यांजकडुन

Tuesday, 5 November 2019

कार्यसम्राट सरपंच

 

सन १९६२ साली वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्था अस्तित्वात आली .त्याचा मुख्य हेतु होता सत्तेचे विकेंद्रीकरण.त्याला अपयश आले असे म्हणता येणार नाही,विविधांगी स्वरूपातुन महाराष्ट्राच नेतृत्व याच पायऱ्या चढुन आल्याच आपल्याला दिसतं.ग्रामीण नेत्यांनी  शहरी लोकांना देखील भुरळ पाडली .यात ग्रामपंचायत आणि त्या माध्यमातुन होणारा  विकास देखील महत्वपुर्ण ठरतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात तर सरपंच आणि त्याच्या अधिकारात अमुलाग्र बदल झाले.पंचायत समितीचा निधी कमी करून  तो निधी थेट ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्याचा निर्णय कौतुकास्पद आहे

शिक्षणाने व आधुनिकतेने प्रेरित झालेले तरूण यात सहभागी होताना दिसतात ही फार मोठी समाधानाची बाब आहे.त्याचाच प्रत्यय मला आमच्या नळावणे गावात आला जुन्नर तालुक्यातील ईशान्य भागात वसलेले नळवणे म्हणजे निजामशाही काळापासुन जुन्नर प्रांताचे देशमुख असलेले हांडे देशमुखांच मुळ गाव .नळवणे गाव हे नळवणे पठार म्हणुन जुन्नर तालुक्यात फार प्रसिद्ध आहे .कुलस्वामी श्री मार्तंड भैरवाचा वास त्या नळवणे गावाला लाभलेला आहे.जुन्नर तालुक्यात ५ धरणांचा कुकडी प्रकल्प असुनही नळावण्याला दुष्काळाचा सामना करावा लागत होता.तीर्थक्षेत्र असुनही गावाला जोडणारे रस्ते मात्र नाममात्र शिल्लक होते.पण २०१५ साली एक इंजिनीअर तरूण पुण्यातील मासिक ७०,००० पगाराची नोकरी सोडुन गावात येतो काय अन् गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गेली २५ वर्ष राजकारणात मातब्बर असणाऱ्या व्यक्तीला निवडणुकीच्या आखाड्यात चितपट करतो काय !!हा सगळा चमत्कार करतो काय !!हा चमत्कार करणाऱ्याच नाव आहे श्री.तुषार तान्हाजी देशमुख आजचा तिशीतला तरूण वयाच्या २७ व्या वर्षी गावचा सरपंच झाला अन् गावचा चेहरामोहरा बदलला.

तुषार दादा उच्चशिक्षित अन् वयाने तरूण असल्यामुळ तरूणांचा त्यांच्यावर फार लोभ असल्याचे मला जाणवलं. आपल्या मधुरवाणीचा उपयोग करून अगदी मुख्यमंत्र्यापर्यंत भेटीचा मजल मारली व गावासाठी निधी उपलब्ध केला.गेल्या ४ वर्षात तब्बल ७ कोटींचा निधी त्यांनी उपलब्ध केलाय .आज गावात जाण्यासाठी मुख्य रस्त्याला जोडणारा डांबरी रस्ता झालाय ,वाड्या वस्त्या देखील पक्क्या रस्त्यानी जोडल्या गेलेल्या आपल्याला दिसतात याचं श्रेय फक्त तुषार दादांना जातं.गावात पावसाळ्याचे ४ महिने सोडले की पाण्याची वाणवा भासायची ,दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण व्हायची.पण गावात उत्कृष्टरित्या पाणीपुरवठा योजना राबवत गावातील महिलांच्या डोक्यावरचा हंडा तुषार दादांनी खाली उतरवला आणि मायमाऊलींच वात्सल्यरूपी प्रेम मिळवण्यात यश प्राप्त केल.

तुषार दादांच्या कार्याची दखल अनेक वर्तमान पत्रांनी देखील घेतली आहे.लोकमत वृत्तसमुहाचा आदर्श सरपंच पुरस्कार देखील तुषारदादांनी पटकवला आहे .त्यांच्याबरोबरच नळवणे गावच व संपुर्ण हांडे देशमुख परिवाराच नाव त्यांनी उज्वल केलं आहे.त्यांनी याच प्रकारे गावच व आपल्या घराण्याच नाव उज्वल कराव ही श्री मार्तंड चरणी प्रार्थना करतो.

आपलाच 
हर्षद रमेश हांडे देशमुख 
कसबे कर्डे ता.शिरूर जि.पुणे

माझे गुरू:दादासाहेब निंबाळकर



आज गुरूपौर्णिमा ,आपल्या चिखला सारख्या मनाला मडक्याचा आकार देऊन समृद्ध करणाऱ्या कुंभाराच्या पुजेचा दिवस. प्रत्येक जण आयुष्यात शालेय शिक्षका़व्यतिरिक्त कुणाचा तरी शिष्य असतोच ,किंबहुवा त्या शिवाय त्या व्यक्तीची मानसिक व सामाजिक जडणघडण होणे शक्य नसतं,अस माझ वैयक्तिक मत आहे.
              हाच विचार गृहित धरला तर माझे वयाने आणि कर्तृत्वाने सर्वांत ज्येष्ठ गुरू म्हणजे कै.मारूतराव निंबाळकर ,आमच्या आजोबांचे मामा ,लोक त्यांना आदराने दादासाहेबच म्हणत.गावची मुकादमी असणाऱ्या एका 'सत्यशोधक' घराण्याचा वारसा दादासाहेब सांगत होते .सत्यशोधक दत्तोबा पा.निंबाळकर हे दादासाहेंबाचे वडील,दादासाहेब त्यांचे थोरले अपत्य.सातवी पर्यंत शिक्षण घेऊन दादासाहेबा़ंनी शाळा सोडली .एक नाही तर तलाठी,शिक्षक,पोलीस यासारख्या सात नोकऱ्या सोडल्या कारण त्यांचा मुळचा पिंड राजकीय नेत्याचा होता.दादासाहेबांचे वडील  सत्यशोधक दत्तोबा पा.निंबाळकर हे देशभक्त केशवराव जेधे यांचे मित्र त्यामुळे जेध्यांनी शेतकरी कामगार पक्ष सोडून कॉंग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर दत्तोबा पाटलांनीही कॉंग्रेसची वाट धरली.आणि जेधे साहेबांनी दत्तोबा पाटलांकडे गळ घातली की "पाटील तुम्ही तुमच्या पोराला विधानसभेला उभं करा" त्यावेळी शिरूर तालु्क्याने तालुक्यातला माणुस आमदार झालेला पाहिलं न्हवतं,तालुक्याबाहेरची माणसं आमदार होत होती.पण वैयक्तिक नातेसंबंधामुळे दादासाहेबांनी ती संधी नाकारली.नाहीतर आज तालुक्याच्या राजकारणात वेगळी समीकरणे आपल्याला पहायला मिळाली असती.
               मला राजकारणाबद्दल आकर्षण यांच्या मुळच वाटु लागलं,मला माझे जोडीदार म्हणतात"हर्षा ,तुला राजकारणाचा लय नाद" मला त्यांना सांगुशी वाटतं ,"मला राजकारणाचा नाद आहे राजकारण्यांचा नाही" ही शिकवण मला दादासाहेबा़मुळेच मिळाली.राजकारणाच चिंतन व चर्चा नेहमी राजकीय प्रवाहांवर करावी ही मला त्यांनीच दिलेली देणगी.त्यांनीही आपल्या विचारांशी कधीही तजवीज करण्याचा प्रयत्न केला नाही ,पार पृथ्वी जरी पालथी झाली तरी आंबळे गावातुन दोन मते कॉंग्रेसला मिळाली असती ती म्हणजे दादासाहेब अन् त्यांच्या पत्नी !!
       मी कळित होईपर्यंत त्यांच बरंच वय झालं होतं,त्यामुळे मला त्यांचा फार काळ सहवास लाभला नाही.त्यांच्या देहावसनानंतरही ते मला मार्गदर्शन करत राहिले ,ते त्यांच्या कागदपत्रांच्या माध्यमातुन!! गेल्या वर्षी मोडीच्या गोडीमुळे सहज मी त्यांची पेटी उघडली तर मला त्यात कागदपत्र रूपी खजिना सापडला!त्यात इसवी सनाच्या  १८८६ व्या सालापासुन कागद सापडले ते त्यांच्या मृत्युपर्यंत ,अनेक दिवस विविध कारणांनी त्यांनी न्यायालयीन लढा दिला होता आणि सर्वच लढायांत त्यांचा बिनदिक्कत विजय झाला होता. *कोल्हापुरच्या सरलष्कर निंबाळकरांचे जवळचे भाऊबंद* असा उल्लेख मला मोडी कागदपत्रांमधुन मिळाला.नाती संभाळावी ती त्यांनीच अगदी बहीणीबद्दलच असु अथवा धाकट्या भावा़बरोबर इतर कुणाशीही तुलना केली तर ते केव्हाही उजवेच ठरतील.
        दादासाहेबांसमोर आमच्या आजीने कधीच पायात पादत्राणे घातल्याचे मला तरी आठवत नाही ,आमच्या सर्वंं आजींच्या मनात त्यांच्याविषयी आदरयुक्त भीती होती त्यामुळं त्यांचा घोषा अधिकच कडक व्हायचा. दादासाहेंबाच्या गोऱ्या साहेबांच्या राज्यातील शिकारीच्या कहाण्या माणसं आजही जीभेवर चवीने रेंगाळतात.हातात छत्री ,डोक्यावर फेटा ,पायात जोडे असा त्यांचा साधा वेष होता.पण त्याच हातात बंदुक आल्यावर तो भारदस्त वाटायचा.अशा करारी व्यक्तिंत्व असणाऱ्या दादासाहेंबाकडुन मी फार काही शिकलोय आजही शिकतोय त्यांच्या हुशारीच्या ,चातुर्याच्या अन् घरंदाजपणाच्या गोष्टी ऐकत !!

सर्वा़ना गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 

धन्यवाद

हर्षद रमेश हांडे देशमुख
कसबे कर्डे ता.शिरूर जि.पुणे

सैर मनालीची

मनाली......देवदार झाडांच्या गर्दीत बर्फाचा शालु नेसलेलं ,तिबेटच्या अगदी जवळच अन् समुद्रापासुन कितीतरी उंच असलेल एक छोटं टुमदार शहर.गेल्या फेब्रुवारीतील शेवटच्या आठवड्यात  निसर्गरम्य शहराला भेट देण्याचा सुवर्णकांचन योग आला तो आमच्या महाविद्यालयाच्या सहलीमुळे ,कसतरी चालढकल करत ,शिक्षकांच्या रेट्यामुळे आम्ही सहलीला जायला तयार झालो.सुरवातीला मी सहलीला जायला उत्साही न्हवतो पण कसाबसा झालो तयार  आणि एकदाची महाविद्यालयीन जीवनातली पहिली सहल निघाली.
 
आम्ही आमचा प्रवास पनवेलपासुन रेल्वेने सुरू केला तो थेट दिल्ली गाठे पर्यंत.आयुष्यात पहिल्यांदाच दिल्ली पाहिली अन् हायसं वाटल जिथुन देशाची सुत्र हालतात ते ठिकाण पाहण्यात काही वेगळाच अभिमान होता.दिल्लीत पोहचल्यावर आम्ही दिल्लीच वर वर दर्शन घेतलं अन् दुसऱ्या दिवशी नट्टापट्टा करून चंदीगडच्या दिशेने प्रवास सुरू केला.त्या दिवशी दिल्लीच तापमान ६° सेल्सिअस होतं.आम्ही आमची गरम कपडे परिधान करून बस मध्ये बसलो.दिल्ली-चंदीगड हायवेवरून जोरदार वेगाने मार्गक्रमण करत होतो,तेव्हढ्यात वाटेत देशाच्या राजकारणात तीनदा बदल घडवुन आणाणार पानिपत लागलं आणि इतिहासाची आठवण झाली.आजच्या समृद्ध हरियाणाला असा रक्तरंजित इतिहास असेल आज कुणालाही वाटणार नाही.सगळीकडे हिरवीगार शेती,मोठमोठी रेस्टॉरंट्सने संपुर्ण हायवे व्यापुन टाकला होता.चंदिगडला पोहचायला उशिर झाल्यामुळ रॉक गार्डनचा फेरफटका टाळुन आम्ही थेट पिंजोरा गार्डनला पोहोचलो,तिथुन गगनचुंबी पर्वत सहज दिसत होते आणि आम्ही बर्फाच्या जवळ आल्याचे जाणवु लागले होतं.२-३ तास मनमुराद भटकल्यामुळे आम्हाला निघायला उशिर झाला होता ,कसंबसं दिवस मावळायच्या वेळी आमची गाडी हालली 

आमच्या दोन बस होत्या.एक साऊंडवाली अन् दुसरी बिनासाऊंडची त्यावरून पोरापोरींच्यात भांडण होत होती.आमची गाडी हळुहळु घाट चढु लागली अन् आमचा शिमल्या दिशेने प्रवास सुरू झाला.रात्री ११ वाजता आम्ही शिमल्यात पोचलो. अन् हाड गोठणं म्हणजे काय ते जाणवलं ,शिमल्यात जणु थंडीची लाटच पसरली होती.आम्हाला झोपायला १ वाजले ,रूममध्ये गेलो तर अस वाटली गादीत बर्फ घालुन ठेवलाय ,जसं आपण बर्फाच्या पिशवीत ठेवतो तसा.पाणी प्यायच ते फक्त गरमच कारण गार पाणी तिथ न्हवतच होता तो फक्त बर्फच.एका रूममध्ये ३ पोरं, झोपायला पलंग एक त्यामुळ एकमेकांच्या ऊबीनं कसबस झोपलो म्हणायच तर रात्र काढली.सकाळी उठल्यावर सकयगळ्यांनी एकच केला ये रणछोडदास चांचड कहा रहते है?.आम्ही शिमल्यातुन २५ किमी दुर असलेल्या कुफ्रीच्या हिलस्टेशनकडे.तासाभरानंतर आम्हा कुफ्रीला पोचलो.तिथल्या लोकांशी चर्चा केली .अन सुमो गाडीने वर गेलो तिथुन परत खेचरांवरून निसरड्या वाटेने बर्फाळ पर्वताचा प्रवास फार गमतीशीर होता.कुफ्रीत नवीनच विवाहबंधनात अडकलेली मराठी नवदाम्पत्य मधुचंद्राच्या निमित्ताने आलेली पहायला मिळाली.तिथल्या स्थानिकांनी त्यांना जरा जास्तच लुटण्याचा डाव आखला होता.आमच्या 'जय महाराष्ट्र' अन् 'हर हर महादेवच्या' घोषणांनी
ते सहज आमच्याकडे आकर्षित होत होते व आमची आपुलकीने चौकशी करत होते.आमच्या बरोबर आमच्या वर्गमैत्रिणी थंडीमुळे अधिक गुलाबी पडल्या होत्या ,त्यांच रुपडं अधिकच देखण दिसु लागलं होत.त्यात अचानक तिथ हिमवर्षाव सुरू झाला अन् सर्वांची तारांबळ उडाली ,सगळी मंडळी पटापट गाडीकडे पळु लागली ,तासाभरात सगळी गोळा झाल्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या शिमल्यातील लॉजवर जाऊन विसावलो .

आज माझ्या शरिरात मला ताप जाणवु लागला होता.मी एक गोळी खाऊन झोपण्याचा प्रयत्न केला.सकाळी लवकरच आवरून आम्ही मनालीच्या दिशेने कुच केली.शिमला ते मनाली अंतर होत फक्त २५० किलोमीटर ,सगळा रस्ता घाटाचा दोन पदरी तरी काहीतरी नॅशनल हायवेचा नंबर होता.तिथल्या घरांच्या रचना पाहून हसु यायचं अन पार्किंगची व्यवस्था पाहून कींव ,कशी काय लोक इथं राहतात हा प्रश्न पडायचा !! खळखळणारं पाणी ,कोसळलेल्या दरडी ,वेडेवाकडे रस्ते अन् एकमेकांची पापडयुक्त चेष्टा करत आमचं मार्गक्रमण सुरू होतं ,२५० किलोमीटरच फार थोड वाटणार अंतर आमच्या सहनशक्तीचा कस पाहत होतो.तब्बल बारा तासांचा प्रवास करून आम्ही मनालीत पोचलो.मनालीतल्या हॉटेल मध्ये अंगावर घ्यायला गादीसारखं कापड होतं सुरूवातीला मला ती गादीच वाटली त्यामुळ माझ थोडं हसुच झालं.पण दुसऱ्या दिवशी मनाली पाहणार असल्यामुळ सगळ विसरून गेलो. पाहतोतर काय आमच्या खोलीच्या बालकनीत देखील बर्फ होता.आम्ही सुमो गाडीत बसून बर्फाळ वाट काढत वशिष्ठ मुनींच्या मंदिरात,सप्तताऱ्यांपैकी एक ,कितीतरी घराण्यांचे गोत्र असलेले अन् रघुकुलभुषण प्रभु रामचंद्राचे गुरू असलेले वशिष्ठ मुनी तिकड का गेले कुणास ठाऊक पण भक्तांच्या अंघोळीची सोय मात्र केली ती गरम पाण्याच्या झऱ्याच्या माध्यमातुन.नंतर आम्ही मार्गस्थ झालो ते मनालीची राणी हिडिंबादेवीच्या मंदिराकडे ,बी.आर.चोपडा साहेबांच्या मालिकेत  पहिल्यांदा हिडिंबाच नाव ऐकल होत.मंदिराच्या चारही बाजुला याकची शिंग लटकवलेली होती.मंदिरात हिडिंबादेवीचा पायाचा मोठा ठसा होता.बाहेर आल्यानंतर घटोत्कचाचे मंदीर होते .त्याच दर्शन घेऊन मनालीच निसर्ग सौंदर्य न्याहाळत आम्ही पुन्हा हॉटेलवर आलो.परत मागं फिरण्याचा दिवस आला होता.पण मन त्याला राजी होत न्हवत कसबस आम्ही मनावर ताबा ठेऊन परतीच्या प्रवासाला लागलो अन् चंदीगढवरून रेल्वेने घरी परतलो.३ वर्षात कुणात कधीही न मिसळणारा मी आज माझ्या वर्गमित्रमैत्रिणींचा होऊन गेलो होतो.

आणि ठरवल होतं परत पाच वर्षानी मी इथ येणार म्हणजे येणार!!!!

धन्यवाद
सोनबाराजे उपाख्य हर्षद रमेश हांडे देशमुख

मंदीर कब बनायेंगे?



मी जवळपास ४-५ वर्षे वयाचा होईपर्यंत आमचं कुटुंब आंबळे गावठाण हद्दीत राहत होतं.आजही  ते दिवस पटकण समोर येतात अन् ती माणसंही.त्यावेळेस गावातील बरचसं बांधकाम दगडी होतं.रांजणगावला औद्यौगिक वसाहत झाल्यामुळं गावात पैशाला यायला रस्ता सापडला होता.चासकमान डाव्या कालव्याच काम सुरू होतं,त्यामुळं शेतकरी उज्वल भविष्याच्या आशेवर होता.माझ्या आई-वडील दोघांचाही पेशा शिक्षकांचा असल्यामुळं त्या काळात आजी-आजोबांबरोबर जास्त वेळ घालवायला मिळाला.
                 अंघोळ करून गंध पावडर झाला की मी ,माझे  आजोबा दादाराव तस मी त्यांना बाबा म्हणतो (बाबा म्हणजे 'बा' चा 'बा' असा मी काढलेला अर्थ आहे)त्यांच्याबरोबर फिरायला जायचो.ते आपल्या भजनीमंडळाच्या बैठकीचं नेहमीचं ठिकाण असणाऱ्या राम मंदिरात त्यांच्या मित्र मंडळींबरोबर हितगुज करायचे.आजी मला राम मंदिरात गेल्यावर खायला म्हणुन डबा करुन द्यायची त्यात मिठाची गवार अन् चपाती असायची.बाबांच्या बोटाला धरून माझा गावचा  फेरपटका सुरू व्हायचा.पांडाभाऊंच्या पिठाच्या गिरणी जवळ आलो की पांडाभाऊ म्हणायचे"काय राजं,लावायची का पावडर लावायची?" मी त्यांच्या पीठाने भरलेल्या अवताराकडे पाहून घाबरायचो.त्याला प्रत्युत्तर म्हणुन बाबा म्हणायचे "सांग ना,घरूनच लाउन आलोय.मी मात्र घाबरून फक्त मानंच डोलवत असे.

 हळुहळू नाजुक पावलांनी लुटुलुटु करत राम मंदिर गाठायचो.राम मंदीर म्हणजे खरखुरं रामलक्ष्मणाच्या मुर्त्या असलेलं मंदिर न्हवत,त्याची नियोजित जागा होती.अन् त्याजागेवर दोन खोल्या होत्या त्यातल्या एका खोलीला राम मंदिर म्हणायचे.खोलीच्या आतमध्ये विविध देवदेवतांची छायचित्रे लावलेली असायची त्यातल रामाचं अन् अर्धनारीनटेश्वराचं चित्र अजुनही मला स्पष्ट आठवतय कारण त्या अर्धनारीनटेश्वराच्या अवताराकडं बघुन कुतुहुल व्हायचं म्हणजे भीतीच.पायऱ्या चढता यायच्या नाहीत म्हणुन बाबा मला उचलुन ओट्यावर ठेवायचे.ओट्यावर चिमुकाटा असायचा ,चिमुकाटा टोचणार नाही अशा पद्धतीने मी चप्पल काढुन आत डोकवायचो आणि हसायचो.कारण दारात बसलेले असायचे आमचे पणजोबा कोंडीरामराजे यांचे मित्र माधवराव केशवराव घायतडक.ते माझ्याकडं म्हणुन म्हणायचे "आलं बघा कोंडीरामराजं ,आज आणला का डबा" ,मी म्हणायचो " हा,आणला ना"आत गेल्यावर सर्वांचा राम राम सुरू व्हायचा.राम मंदिरात भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आमच्या बाबांवर जीवापाड प्रेम केलं त्यात जयवंतराव अण्णा ,साहेबराव आबा यांचा उल्लेख आवर्जुन करावा लागेल.तिथं बसणारी बरीच माणसं आठवतात बाबाजी घुंबरे,बाबाजी डाळिंबकर ,दत्तोबा पाटील,जयवंत अण्णा ,साहेबराव आबा हे तीन बंधु,गोलेकर अण्णा,माधवराव घायतडक,दगडु मिस्त्री,तुकाराम तात्या ही माणसं मला ठळक आठवतात.
   
थोडी हितगुज झाल्यानंतर त्यांची गाडी चहाकडे वळायची त्या खोलीत एक रॉकेलवरचा स्टोव्ह देखील होता त्यावर चहा करायचा अन् स्टीलच्या पितळीतुन प्यायचा असा नित्यक्रम एक १०-१२ पितळ्या असतील तिथं.मला मात्र डबा खायला लावायचे मी डबा खात नसं तेव्हा जयवंत अण्णा माझ्या शेजारी बसून स्वत:च्या हाताने मला घास भरवत असायचे मग माझी पाळी आली की मी त्यांना घास भरवायचो.मला चहा दिला नाही की मी मात्र भोंगा पसरवायचो.😅कशीबशी समजुत काढायचे.जसं ऊन चढु लागंल तसतस प्रत्येक जण आपापल्या वाटंनी घराकडे निघत असत.मी वर उल्लेखल्या व्यक्तीपैंकी आज फक्त १-२ व्यक्तीच आज हयात आहेत.त्यांच्यातलं एक एक पान गळु लागलं तशी राम मंदिरातली गर्दी कमी झाली आणि आज त्या खोलीला १२ महिने २४ तास कुलुप असतं .राम मंदिरात बसणाऱ्यांची तीव्र इच्छा होती की गावात एक राम मंदिर व्हाव!! मात्र ते आजतागायत झालं नाही.
त्यानंतरचा एक दिवस मला आठवतोय कदाचित मी ६ वीला असेल बबन गायकवाड(कोळी) पत्रिका वाटत असताना आमच्या घरी आले त्यावेळी दादासाहेब निंबाळकर  पेपर वाचत बसले होते.दादासाहेंबांच गावात जाणं कमी झालं होत  त्यावेळी दादासाहेंबा़नी उच्चारलेलं वाक्य आठवतय "क्यौं बबनराव,राम मंदिर कब बनाये़गे"

समाप्त 

सोनबाराजे तथा हर्षद रमेश हांडे देशमुख

हांडे देशमुखांच्या शोधात

मला जसं जसं कळु लागलं तसं तसं माझे आजोबा कै. दादाराव हे मला आमच्या घराण्याविषयी ,घराण्यातील चालीरितींविषयी माहिती देत असायचे. गावातील मंडळी ...